बस्स्… टू मिनिट्‌स…

0
132

  • अनुराधा गानू
    (आल्त सांताक्रूझ, बांबोळी)

सध्या सगळंच झटपट – ‘बस्स् २ मिनिट्स’चा फंडा चालू आहे. लोक सगळीकडेच त्याचा वापर करताहेत. शिक्षण झटपट, गुण झटपट, डिग्री प्रमाणपत्रं झटपट, भली मोठी देणगी दिली की ऍडमिशन झटपट, भली मोठी लाच दिली की नोकरी झटपट. बघा ना, लोक विशेषतः नव्या पिढीतील तरुणवर्ग आज झटपट पैसा मिळवण्याच्या मार्गावर चालतो आहे.

घरात संध्याकाळी खायला काय करुया… असा विचार चालू होता. नातू म्हणाला, ‘‘अगं विचार काय करायचा? घरात नूडल्सची पाकिटं आहेत. नूडल्सच करुया ना. दोन मिनिटांत होतील. काही करण्यासाठी उगाच दगदग कशाला करायची?’’ आणि असंही सगळा पसारा करत बसायची आवड तरी कोणाला उरलीय हल्लीच्या दिवसात? म्हटलं, ‘‘हो रे बाबा. जमानाच ‘टू मिनट्‌स… नूडल्सचा आलाय!’’ आताच बघा ना, पोहे, शिरा, उपमा, थालीपीठ , पराठा करायचा म्हटलं की २० मि.- अर्धा तास तरी जातोच. परत ते कांदे चिरा, टोमॅटो चिरा… हे सगळं कोण करत बसतंय! त्यापेक्षा एका भांड्यात पाणी घ्या. ते उकळलं की त्यात नूडल्स आणि मसाल्याचं पाकीट फोडून घाला. २ मिनिटात डिश तयार. तसाच पिझ्झा. पिझ्झा-बेस विकत मिळतात. त्याच्यावर घालायचं एकदा करून फ्रीजमध्ये ठेवलं की कधीही पाच मिनिटात झटपट पिझ्झा खाण्यास तयार. आता बघा… इडली- डोसा काहीही खायची इच्छा होऊ दे, कामावरून घरी येता येता इडली-डोशाचं पीठ विकत आणलं की घरी आल्यावर दहा मिनिटात इडली, डोसा काय पाहिजे ते तयार. पण तेच घरी करायचं म्हटलं की डाळ-तांदूळ भिजत घाला. वाटा. रात्रभर ठेवा. तेव्हा कुठे इडली मिळणार. कशाला करायचा खटाटोप इतका? हे फक्त खाण्याच्याच बाबतीत नाही हं, सगळ्याच बाबतीत गोष्टी झटपट व्हायला हव्यात.

हल्ली ना, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कष्ट करायला नको असतात. खूप थोडी मुलं अशी असतात की धडे वाचून, त्यातल्या प्रश्‍नांची उत्तरं आपणहून शोधून, काढून विचार करून लिहिणारी. अशाच मुलांचं शाळेत शिक्षक शिकवताना नीट लक्ष असतं. पण बहुतांशी मुलांचं शाळेत शिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्षच नसतं आणि तशी गरजही नसते. कारण प्रत्येक विषयाची गाइड्‌स असतात. मग आपली विचारशक्ती यात खर्च करण्यापेक्षा (कारण ती शक्ती मुलांना दुसर्‍या नको त्या गोष्टीत वापरायची असते) ती उत्तरं पाठ केली… परीक्षेत जशीच्या तशी लिहिली की गुण झटपट मिळून जातात.
पूर्वी गाइड वापरली की शिक्षक रागवायचे आणि गाइड वापरण्यात मुलांनाही कमीपणा वाटायचा. पण आता शिक्षकच सांगतात की मुलांनी विचार करून आपली उत्तरे लिहायची गरज नाही. पाठ केलेली उत्तरे जशीच्या तशी लिहिली तरी चालतं. आजकाल शाळेतच न जाण्याचा नवा कल (ट्रेंड) निर्माण झालाय. कारण पूर्वीसारखी शाळेत ठरावीक दिवसांची उपस्थितीची गरज नसतेच. इतकंच कशाला, हल्ली डिग्रीचे प्रमाणपत्रही झटपट मिळण्याची सोय झालीय.. कुठे कुठे असं ऐकलंय.

परवाच कोणाकडेतरी बघितलं. त्यांच्या मुलाला इतिहासातले काही प्रश्‍न पडले होते. वडिलांनी सांगितलं, ‘‘अरे, आपल्याकडे याबद्दल माहिती देणारी पुस्तके आहेत. ती वाचून बघ ना. पुस्तकाचं नावसुद्धा वडिलांनी सांगितलं… की या पुस्तकात तुला सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे मिळतील आणि आणखी माहितीही असेल’’. कारण वडिलांनी ती पुस्तकं वाचलेली होती. पण त्या मुलानं उत्तर दिलं, ‘‘बाबा, आता पुस्तकाच्या कपाटातून ते पुस्तक शोधा… वाचा. एवढं करण्यापेक्षा मोबाइलवर उत्तर शोधायला आपल्याला २ मिनिटे लागतील फक्त..’’ असे म्हणत त्यानं मोबाइल चालू केला. गुगलवर प्रश्‍न विचारले. दोन मिनिटात उत्तरं मिळाली. सगळं किती सोपं झालंय ना आजकाल.
नातवाला म्हटलं पाढे पाठ कर. एकदा पाढे पाठ असले की गणितं कशी पटकन सुटतात. तर त्याने मला कॅलक्युलेटर दाखवला.

म्हणाला, ‘‘आजी, पाढे पाठ करायची गरजच नाही. हा कॅलक्युलेटर बघितलास का? यावर आकडे दाबले की कितीही मोठा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी सगळा हिशोब २ मिनिटात होतो. पण मला वाटतं, सगळ्यात चांगला आणि सक्षम कॅलक्युलेटर आपला मेंदू नाहीये का, मग त्याचा वापर आपण का करत नाही? अहो, वापराविना हा कॅलक्युलेटर गंजणार नाही? आणि एकदा जर तो गंजून निकामी झाला तर २ मिनिटात आयुष्य संपेल त्याचं काय?
समोरच्या बंगल्यातला माणूस सकाळी आपल्या बागेत फुलझाडं लावत होता. तेवढ्यात त्याचा तरुण मुलगा आला. म्हणाला, ‘‘बाबा, कशाला एवढं खणताय आणि मातीत हात घालताय? तुम्हाला कसली फुलं पाहिजेत?… आता ५ मिनिटात बाजारातून आणून देतो.’’ वडील म्हणाले, ‘‘नको रे. स्वतः कष्ट करून लावलेल्या झाडांची फुले बघताना जो आनंद मिळतो ना, त्याची किंमत नाही करता येणार रे.’’
सध्या सगळंच झटपट – ‘बस्स् २ मिनिट्स’चा फंडा चालू आहे. लोक सगळीकडेच त्याचा वापर करताहेत. शिक्षण झटपट, गुण झटपट, डिग्री प्रमाणपत्रं झटपट, भली मोठी देणगी दिली की ऍडमिशन झटपट, भली मोठी लाच दिली की नोकरी झटपट. बघा ना, लोक विशेषतः नव्या पिढीतील तरुणवर्ग आज झटपट पैसा मिळवण्याच्या मार्गावर चालतो आहे. महिनाभर काम करून मिळणार्‍या पैशापेक्षा जास्त पैसा नुसती इकडची वस्तू तिकडे पोहोचवून मिळत असेल तर का करायचे एवढे कष्ट? असा झटपट पैसा मिळवण्यासाठी माणूस पटकन कितीही खालच्या थराला जायला तयार असतो. एका रात्रीत श्रीमंत होण्याची स्वप्नं बघू लागलाय. नशीब… काही गोष्टी मात्र निसर्गानं आपल्या हातात ठेवल्यात. तिथं मात्र ‘२-मिनिट्‌स झटपट’चा फंडा चालत नाही.

राजकारणात चांगले, नीतिमत्तेने चालणारे लोकही आहेत. पण त्यांचं प्रमाण कमी आहे आणि कमी होत चाललंय. त्या क्षेत्रात झटपट पैसा कमावता येतो असा एक खरा (खोटा?) समज लोकांमध्ये निर्माण झालाय. त्याची एक गंमत सांगते आणि दोन मिनिटात संपवते. एकदा एका ७-८ वर्षांच्या मुलाला विचारलं, ‘‘मोठा झाल्यावर तू कोण होणार?’’ त्यानं २ मिनिटांत पटकन उत्तर दिलं, ‘‘आमदार, खासदार किंवा मंत्री’’. का रे? तर त्यानं पटकन सांगितलं, ‘‘तिथंच तर झटपट श्रीमंत होता येतं ना?’’