कृष्ण भेटलाच पाहिजे!

0
310

  • सौ. नीता महाजन
    (विजयनगर-खोर्ली)

लहान मुलांसारखं, कृष्णासारखं जगा. असं छोटं बाळ कायम जिवंत ठेवा व असा कृष्ण तुम्हा सर्वांना भेटावा, जो मला भेटला. मग तो तो आहे की ती याचा काहीच फरक पडत नाही. तुम्हीसुद्धा कुणाच्यातरी आयुष्यात कृष्ण किंवा लहान बाळाची भूमिका साकारावी ही कृष्णचरणी प्रार्थना!!

खरं पाहायला गेलं तर आपल्या सगळ्यांमध्ये एक बाळ लपलेलं असतं. फक्त त्याला जागृत करणं गरजेचं असतं. नाहीतर जीवन निरस व कंटाळवाणं होऊ लागतं. तुम्हाला जर आनंदी राहायचंय तर – ‘ऑलवेज बी लाईक ए चाईल्ड’, लहान मुलांसारखे रहा. त्यांना पाहताच तुम्ही तुमची निराशा, दुःख विसरून जाता. म्हणूनच म्हणतात ना की दिवसातले काही क्षण तरी लहान मुलांसोबत किंवा म्हातार्‍या माणसांसोबत घालवा. म्हातारपण म्हणजे सुद्धा दुसरं बालपणंच म्हणतात. पण हे बालपण वयाच्या वार्धक्यामुळे आलेलं असतं. ते जाणून बुजून आलेलं नसतं. पण ते इतरांना ओझं वाटू लागतं.

पण लहान बाळ, लहान मुले बघाल तर किती ऊर्जा असते त्यांच्याकडे! ते अगदी तुम्हाला तुमचे सारे कष्ट, थकवा, दुःख, यातना विसरायला लावतात. माझ्या घराच्या शेजारी असाच एक बाळ राहतो. वय असेल २ वर्षे. मला तो खूप आवडतो. मला बघताच त्याला फार आनंद होतो. अगदी आर्ततेने तो मला स्वतःला धरण्यास सांगतो. किती प्रेम व जिव्हाळा आहे.! त्याची हाक ऐकताच मी सारे माझे काम सोडून त्याला बघायला जाते. काय जादू आहे त्याच्याकडे? काय ऋणानुबंध आहे माहीत नाही. त्याला मला बघताच खूप काही बोलायचं असतं. सांगायचं असतं. पण खंत या गोष्टीची वाटते की मला त्याची भाषा समजत नाही. पण त्याच्या डोळ्यात पाहिल्यावर वाटतं की त्याला मी खूप आवडते. आपलीशी वाटते. हे् आपण कुणालातरी आवडणं ही भावना खूप सुखावून जाते. जगण्याची ऊर्मी देते. लहान मुल म्हणजे देवाचंच दुसरं रूप. म्हणूनच म्हणतात ना, ‘बालपणा देगा देवा, मुंगी साखरेचा रवा.’

म्हणूनच तर गोकुळात बाळकृष्ण सर्वांना प्रिय होता. खरंच हे बालपण देवाने पुन्हा दिलं तर…खूप बरं होईल. कसलीच चिंता नाही, व्यथा नाही, मनावर ओझं नाही, जबाबदारी नाही. अगदी स्वच्छंदी फुलपाखरासारखं आयुष्य. ना भूतकाळाचं ओझं ना भविष्याची चिंता. वर्तमानात जगत असतात ती. आपल्यालाही असं जगता आलं पाहिजे. आपण आपले आयुष्यातले सारे क्षण व्यर्थ घालवतो. वर्तमानात आहे त्या क्षणात जगता आलं पाहिजे. कायम भूतकाळ व भविष्यकाळाचंच भूत मानगुटीवर बसलेलं असतं आपल्या. आयुष्य खरंच क्षणभंगूर आहे. म्हणून आहे त्या प्रत्येक क्षणात जगता आलं पाहिजे असं आमचे योगगुरू श्री ऋषी प्रभाकर सांगतात. त्यांच्या या विचारांमुळे अनेकांच्या जीवनाचा कायापालट झाला आहे. असं जगा की मृत्यू जरी आला तरी असं नाही वाटलं पाहिजे, की अरे… मी आयुष्य जगलोच नाही!
माझ्या कामाचे स्वरूप असे आहे की मी सतत मुलांमध्ये असते. मला लहान मुले खूप आवडतात. आजच्या या परिस्थितीमुळे ही मुले माझ्या आवतीभवती नाहीत, याचे मात्र खूप दुःख वाटते. त्यांनीच मला लहान मूल होऊन जगायला शिकवलं. आपणच मात्र त्यांच्यावर मोठेपणाचं ओझं लादतो. अनेकदा वाटतं की आपण त्यांचं बालपण हिरावून तर घेत नाही ना?
या मुलांसारखं, कृष्णासारखं जगा. काही दिवसांपूर्वी ‘कृष्ण भेटलाच पाहिजे’ अशी एक संकल्पना वाचनात आली. ती मनाला खूपच भावली. असा ‘कृष्ण’ प्रत्येकालाच भेटलाच पाहिजे. तो कृष्ण मग तो असो वा ती, त्याच्याकडे व्यक्त होता आलं पाहिजे. मनात काहीही न ठेवता. तो तुमचा हक्काचा कृष्ण असतो. जो तुमचे राग, लोभ, खोड्या, वेडेपणा सारं काही ऐकून घेतो. असा कृष्ण तुमच्या आयुष्यात असेल तर खरंच तुम्ही भाग्यवान आहात. खरं तर असा कृष्ण असतोच प्रत्येकाच्या आयुष्यात, आपणही कुणाच्यातरी आयुष्यात कृष्ण होणं मात्र फार महत्त्वाचं व किती सुखदायक भावना!
असं छोटं बाळ कायम जिवंत ठेवा व असा कृष्ण तुम्हा सर्वांना भेटावा, जो मला भेटला. मग तो तो आहे की ती याचा काहीच फरक पडत नाही. तुम्हीसुद्धा कुणाच्यातरी आयुष्यात कृष्ण किंवा लहान बाळाची भूमिका साकारावी ही कृष्णचरणी प्रार्थना.