बदल हाच निसर्गाचा नियम

0
448
  • मंजीता हरिश्चन्द्र गावस

माणसाने सृष्टीचा पुरेपूर वापर केला. विकासाच्या नावाखाली केलेल्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषणाचे प्रमाण बरेच वाढले. प्रकृतीतून मिळालेल्या साधन-सुविधांचा, नैसर्गिक स्रोतांचा अतिवापर झाला. त्यातच सृष्टीच्या कोपातून कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसची उत्पत्ती झाली.

भारतीय धर्माचे व संस्कृतीचे मूलाधार ग्रंथ वेदांप्रमाणे त्रीदेव ब्रह्मा, विष्णू आणि महादेवांनी सृष्टी निर्माण केली. सृष्टीतील प्रत्येक जीव, सजीव आणि निर्जीव ब्रह्मदेवांची रचना आहे, हे जरी खरं असलं तरी वैज्ञानिकदृष्ट्या पृथ्वीवर पहिला जीव हा ३.७ दशलक्ष वर्षांपूर्वी विकसीत झाल्याचे पुरावे सांगतात. एका पेशीपासून निर्मित झालेल्या ह्या सजीवाची उत्पत्तीची प्रक्रिया खूपच खडतर आणि सातत्यपूर्ण अशी. कालांतरानी कित्येक सजीवांची निर्मिती झाली. पण काळाच्या ओघात काही सजीव नष्ट झाले. काहींची उत्पत्तीची प्रक्रिया पूर्णत्वास आलीच नाही. काही सजीवांना वातावरणाशी जुळवून घेता आले नाही. पण त्याला मनुष्यजात म्हणजेच आजचा मानव अपवाद ठरला. काळचक्राच्या दृष्टचक्रात मानवाने आपली जुळवाजुळव केली. अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या तीन मूलभूत गरजा निसर्गाने पुरवल्या आणि अजूनही पुरवत आहे. ह्या एवढ्या कालांतरात काही बदललं तर तो माणूस आणि त्याचा वाढता स्वार्थ. सृष्टी ही प्रेमळ आणि दानी. माणसाला पंचतत्व, साधन-सुविधा सर्व काही पुरवते. बदल्यात काहीच मागत नाही. पण आशा, अपेक्षांचं ओझं पाठीवर लादून चाललेल्या मनुष्य जातीने विकासाच्या नावाखाली पृथ्वीच्या मुळावरच घाव घातला आहे. विकासाच्या नावाखाली झालेली जंगलतोड, अफाट शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि त्यातून मग प्रदूषण ह्या सर्व गोष्टी आज पृथ्वीच्या विनाशास कारणीभूत ठरल्यात. याच्या मुळाशी मनुष्य जातीचा स्वार्थच आहे. सृष्टीचक्र भरकटत चालले आहे. कालावधी वर्धमान होत आहे. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूंचा कालावधी हळूहळू बदलत चालला आहे. ऋतुमानातील हा बदल सृष्टीचक्र भरकटत चालल्याचे उत्तम उदाहरण आहे. सृष्टीचक्रातील हा बदल मनुष्याच्या मुळावर आलेला पहायला मिळतोय. इबोला, हंता आणि आता कोरोना महामारीने मनुष्यजातीचे कंबरडे मोडून ठेवलें आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले.

कोरोना महामारीमुळे पहिल्यांदाच मनुष्यजात घरात कैद झाली. निसर्गाला थोडी उसंत मिळाली. पशूपक्षांना मोकळ्या हवेत श्वास घेण्याची संधी मिळाली. थोडेफार का होईना भरकटलेले सृष्टीचक्र पुन्हा जाग्यावर आले. वातावरणातील कार्बन उत्सर्जन कमी झाले. ओझोनचा थर पुन्हा दाटून आला. कोरोना व्हायरसने मनुष्याला त्याची जागा दाखवून दिली असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. मुळात हा कोरोना आला कुठून? जागतिक तंत्रज्ञांच्या मते कोरोनाची उत्पत्ती चीनच्या एका प्रयोगशाळेत झाली. पण चीनने हे मान्यच केलं नाही. आर्थिक, वैज्ञानिक आणि इतर सर्वच बाबतीत महासत्ता झालेल्या या देशानं सगळे आरोप फेटाळून लावले. जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉक्टरांची एक टिम हल्लीच चीन दौर्‍यावर आहे. त्यांच्या अभ्यासातून त्यांना असे दिसून आले की, हा व्हायरस चीनच्या प्रयोगशाळेतून पसरला नाही. मग व्हायरस आला कुठून हा मुळात प्रश्न आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. आणि निसर्गापुढे सगळ्या गोष्टी फिक्या पडतात हे वेळोवेळी आपण पाहिले आहे. निसर्ग कोपला ही काय होते हे याठिकाणी वेगळेपणाने सांगण्याची गरज नाही. हा व्हायरस आला सृष्टीचक्रात होत असलेल्या परिवर्तनातून. निसर्ग परिवर्तन हे याच्या मुळाशी आहे. अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणजेच अतिनील किरण जेव्हा कोणत्याही पेशीवर पडतात तेव्हा जेनेटिक मटेरियल म्हणजेच डीएनए आणि आरएनए शक्यतो म्युटेट म्हणजेच आनुवंशिक बदल होण्याचे संकेत जास्त असतात. व्हायरस हा आरएनए म्हणजे रायबोन्युक्लिक ऍसिडपासून बनलेला असतो. जेव्हा जेव्हा युव्ही रेडिएशन या व्हायरसवर पडतात तेव्हा त्याच्यात वेगानं आनुवंशिक बदल होतो. आणि नवीन व्हायरसची उत्पत्ती होतें. कोरोना व्हायरससुद्धा ‘एसआरएस’ आणि ‘एमआरएस’ व्हायरस जो प्राण्यांमध्ये आढळतो त्यापासून निर्माण झाला आहे. अर्थात हा जीवघेणा व्हायरस प्रकृतीच्या पोटीच जन्माला आलेला आहे. आता असा प्रश्न निर्माण होतो की, इतक्या प्रेमाने सर्वांचा सांभाळ करणारी प्रकृती इतकी निर्दयी कशी बनू शकते? प्रसिद्ध वैज्ञानिक सर आयजॅक न्यूटन यांच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक क्रियेसाठी समान प्रतिक्रिया होते.

माणसाने सृष्टीचा पुरेपूर वापर केला. फक्त वापरच केला नाही तर अतिवापर केला. विकासाच्या नावाखाली केलेल्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषणाचे प्रमाण बरेच वाढले. प्रकृतीतून मिळालेल्या साधन-सुविधांचा, नैसर्गिक स्रोतांचा अतिवापर झाला. त्यातच सृष्टीच्या कोपातून कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसची उत्पत्ती झाली. माणूस आपल्याच कृतीतून, नकळत का होईना पण इबोला, कोरोना, बर्ड फ्लू, निपाफ अशा जीवघेण्या व्हायरसांच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत ठरला. कोरोनामुळे आज जी काही परिस्थिती ओढवली तिला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मनुष्यच जबाबदार आहे.
असे म्हणतात की सर्वश्रेष्ठ अशा सृष्टीचे जीवनचक्र चालविणारा स्वतः महाकाल आहे. तोच आदी तोच अंतही आहे. तात्पर्य एवढेच की प्रकृती जेवढ्या मायेने सर्वांचा सांभाळ करते त्याच वेगाने ती विध्वंस घडवण्याची क्षमतासुद्धा ठेवते.