‘‘एक धागा सुखाचा…

0
288
  • ज. अ. रेडकर
    (सांताक्रूझ)

संपतराव आणि शारदाबाई यांना कर्ते-सवरते दोन पुत्र असताना आयुष्याच्या संध्यासमयी दुर्दैवाचे असे कठोर आघात सहन करावे लागले. याचा परिणाम म्हणून संपतराव यांचे मानसिक संतुलन बिघडले. अधूनमधून त्यांना वेडाचे झटके येऊ लागले. त्यांना सावरता सावरता शारदाबाईंची त्रेधातिरपीट उडायची.

१९६०च्या दशकात मराठी भाषेतील उत्तमोत्तम कौटुंबिक चित्रपट निर्माण झाले. समाजप्रबोधन हे त्यावेळी चित्रपटांचे उद्दिष्ट होते. त्यावेळचे अभिनेते आणि आघाडीचे दिग्दर्शक राजा परांजपे यांचा असाच एक मराठी चित्रपट म्हणजे ‘जगाच्या पाठीवर’ हा होय. त्यावेळचा प्रेक्षकवर्गदेखील अत्यंत भावुक होता. चित्रपटात एखादा करुण प्रसंग आला की चित्रपटगृहातील अंधारातून स्त्री-प्रेक्षकांचे हुंदके ऐकू यायचे. प्रेक्षक इतके चित्रपटाशी एकरूप व्हायचे. राजा परांजपे यांच्या या चित्रपटाची आठवण व्हायचे कारण म्हणजे खूप दिवसांनी त्यातील ‘‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे| एक धागा सुखाचा…’’ हे सार्थ गाणे कानावर पडले.

हे गाणे ऐकता ऐकता माझे मन दहा वर्षांपूर्वी एका परिचित कुटुंबात घडलेल्या घटनेत गुंतून गेले. संपतराव, त्यांची पत्नी शारदाबाई व त्यांची दोन मुले असे हे चौकोनी कुटुंब. परंपरा, रीतीरिवाज पाळणारे कोंकणस्थ ब्राह्मण कुटुंब! संपतराव बी.एससी. बी.एड. झाले होते आणि ते आपल्याच गावातील एका हायस्कूलमध्ये विज्ञानाचे शिक्षक होते. शारदा साधी सरळ गृहिणी. दोन्ही मुले आई-वडिलांच्या सुसंस्कारात वाढलेली. अभ्यासात हुशार! शालान्त परीक्षेत उत्तम गुण मिळवलेला थोरला मुलगा सुनील पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात दाखल झाला. तर त्याच्या दुसर्‍याच वर्षी धाकट्या चिरंजीवाने – सचिनने आपल्या आवडीनुसार मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट या संस्थेत प्रवेश घेतला. दोघांच्याही शिक्षणाचा व त्यांच्या हॉस्टेलचा खर्च संपतरावांच्या मिळणार्‍या मासिक वेतनात बसणारा नव्हता. म्हणून त्यांनी फावल्या वेळात कोचिंग क्लासेसची सुरुवात केली. काहीही करून त्यांना आपल्या मुलांचे उज्ज्वल भवितव्य घडवायचे होते. त्यांच्या हुशारीचे चीज करायचे होते.

काळ वेगाने पुढे सरकत होता. उच्च शिक्षणासाठी गेलेल्या दोन्ही मुलांपैकी एकटा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर तर दुसरा जे जे स्कूल ऑफ आर्टचा पदवीधर झाला. पदवी मिळताच त्यांना मुंबईत चांगल्या वेतनाच्या नोकर्‍यादेखील मिळाल्या. मुंबईसारख्या शहरात नोकरी मिळाली की छोकरी मिळायला वेळ लागत नाही. विसाव्या शतकाने कात टाकली होती. याच काळात आधुनिकतेचे वारे वाहू लागले होते. प्रेमविवाहांना उधाण आले होते. सुनील आणि सचिनतरी याला अपवाद कसे ठरतील? त्यांनीही आपापला जोडीदार निवडला. परंतु त्यांनी निवडलेल्या दोन्ही मुली परप्रांतीय व परभाषीय होत्या. एक सिंधी तर दुसरी पंजाबी. राधिका आणि परमजीत! त्याही नोकरीसाठी मुंबईत आल्या होत्या आणि सुनील व सचिन अनुक्रमे ज्या आस्थापनात नोकरी करीत त्याच ठिकाणी त्या नोकरीला होत्या. साहचर्यामुळे त्यांचे प्रेम जुळले. संपतराव व शारदाबाई या दोघांनाही हे प्रेमप्रकरण मंजूर नव्हते. आपले कोंकणस्थ संस्कार व रीतीरिवाज सांभाळणार्‍या आपल्याच ज्ञातीवर्णातील महाराष्ट्रीयन मुली त्यांना सुना म्हणून हव्या होत्या. संपतरावांनी नाही, परंतु शारदाबाईनी खूप अकांडतांडव केले. रडल्या. मुलांशी अबोला धरला. पण काही उपयोग झाला नाही. सुनील आणि सचिन यांच्या विचारात काही बदल झाला नाही. मुले लहान असेपर्यंतच वडीलधार्‍यांच्या आज्ञेत राहतात. एकदा मोठी झाली, स्वतःच्या पायावर उभी राहिली की ती आई-बापाचा उपदेश / सल्ला मानीत नाहीत. आई-वडील त्यांना जुन्या मागासलेल्या विचारांचे वाटू लागतात. त्यात आणखी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घरापासून दूर गेली तर मग काय विचारूच नका! त्यांच्या वागण्या-बोलण्यात फरक पडतो. शेवटी मुलांच्या हट्टापुढे संपतराव आणि शारदाबाई या दोघांनाही शरणागती पत्करावी लागली सुनील आणि सचिन यांचे दोन महिन्यांच्या अंतराने विवाह संपन्न झाले.

सुनीलने मुंबईच्या उपनगरात विक्रोळी इथे दुहेरी शयनगृहाची सदनिका घेतली होती तर सचिनच्या बायकोची स्वतःची एक शयनगृहाची सदनिका मुलुंड इथे होती. म्हणजे दोघेही भाऊ मुंबईत आता स्थिर झाले होते. याच दरम्यान संपतराव शिक्षकी पेशातून निवृत्त झाले. त्यांना निवृत्ती वेतन मिळत होते. शिवाय कोचिंग क्लासचे उत्पन्न होतेच. दोघांच्याही गरजा त्यात भागात होत्या. पैशासाठी आपल्या मुलांच्यापुढे हात पसरायची त्यांना गरज नव्हती. सुनीलचा विवाह झाला त्याच वर्षी कंपनीने त्याला व त्याच्या बायकोला अमेरिकेतील आपल्या कार्यालयात एका वर्षासाठी पाठविले. ती तिकडे निघून गेली. तर सचिनच्या बायकोला – परमजीतला लंडनच्या एका चांगल्या प्रकाशन संस्थेत आर्टिस्टची मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. ती तिकडे निघून गेली. सचिन एकटाच मुंबईत राहिला. त्याचे जेवणा-खाणाचे हाल होऊ लागले. प्रकृती बिघडू लागली. म्हणून संपतराव आणि शारदाबाई दोघेही गाव सोडून मुंबईत गेली. राहायला सुनीलची सदनिका होतीच. सचिनही तिथेच राहायला आला. मात्र लंडनला नोकरी मिळवून तिकडे जाण्याचे त्याचे प्रयत्न चालूच होते. पण प्रयत्नांना यश येत नव्हते. करता करता एक वर्ष संपले आणि सुनील व त्याची बायको राधिका अमेरिकेतून परत आली.

काही दिवस बरे गेले. परंतु नंतर सासू-सून यांत खटके उडू लागले. मुळातच शारदाबाईना सून म्हणून राधिका पसंत नव्हतीच. त्यात ती परजातीय, परभाषीय आणि मॉडर्न! म्हणजे आगीत तेल! सासू-सुनेच्या भांडणात सुनीलची अवस्था मृदंगासारखी झालेली. आईची बाजू घ्यावी तर राधिकेचा पारा चढणार आणि राधिकेची कड घेतली तर आई नाराज होणार! अशा रीतीने गृहकलह वाढतच गेला. घराची शांती बिघडली.

वयोमानानुसार संपतराव यांना निद्रानाशाचा आजार जडला होता. त्यामुळे रात्री त्यांना नीट झोप लागत नसे. पहाटे पहाटे त्यांचा डोळा लागे. त्यामुळे त्यांचे सकाळी उशिरा उठणे होई. तर घरात आपली लुडबुड सूनबाईला पसंत नाही म्हणून शारदाबाई उशिरापर्यंत अंथरुणात लोळत पडत आणि सूनबाई सकाळी नऊ वाजता नोकरीला गेल्यावर त्या उठत. एके सकाळी राधिकेने कमालच केली सकाळी उठून तिने संपतराव व शारदाबाई ज्या खोलीत झोपल्या होत्या त्या दरवाजावर लाथा घालायला सुरुवात केली आणि तोंडाचा पट्टा सुरू केला, दिवसभर लोळत पडता, आयतं बसून खाता, काम धंदा काही नाही, आमच्या जिवावर जगता वगैरे वगैरे… सुनील आणि सचिन या तोंडाळ बाईचा हा रुद्रावतार आणि तिची बेताल बडबड ऐकून चक्रावूनच गेले!

खरं तर सुनील आणि राधिका अमेरिकेतून माघारी आल्यावर संपतराव शारदाबाईसह पुन्हा आपल्या गावी जायला निघाले होते. परंतु सुनील व सचिन यांनीच त्यांना जाऊ दिले नाही. आपण सर्व एकत्र राहू. या वयात गावी तुम्ही एकटे राहणार. तुम्ही तिकडे आजारी पडलात तर कोण बघेल अशी त्यांची समजूत काढली म्हणून ती दोघं मन मारून इथे राहिली होती. परंतु राधिकेला हे आवडलेले नव्हते. एक दिवस तर तिने कहरच केला. स्वतःवर केरोसीन ओतून किंवा विष पिऊन आत्महत्या करण्याची व आपल्या आत्महत्येला सासू-सासरे जबाबदार असतील अशी चिठ्ठी लिहून ठेवण्याची तिने धमकी दिली. सुनील तर रडकुंडीला आला. शेवटी संपतराव, शारदा आणि सचिन यांनी त्याच्या बायकोच्या – परमजीतच्या सदनिकेत काही दिवस मुलुंडला जाऊन राहण्याचा निर्णय घेतला.
राधिकेच्या अशा आक्रस्ताळी वागण्याने सुनील दुखावला. आपल्या आई-वडिलांचा तिने केलेला अपमान त्याच्या जिव्हारी लागला. तिच्यामुळे स्वतःच्याच सदनिकेतून त्यांना रडत जावे लागले याचे परम दुःख त्याला झाले. राधिकेला एवढे चिडण्याचे कारण म्हणजे तिला अमेरिका सोडून पुन्हा भारतात यावे लागले हे होते. अमेरिकेतील चंगळवादी राहणीमानाची तिला चटक लागली होती. काहीतरी खटपटी लटपटी करून तिला अमेरिकेतच कायमचे राहायचे होते परंतु सुनील या गोष्टीला तयार नव्हता. कारण आपल्या वृद्ध माता-पित्यापासून त्याला इतक्या दूर राहायचे नव्हते. राधिकेला याच गोष्टीचा राग होता आणि म्हणून ती एवढी आक्रस्ताळी झाली होती.
शेवटी सुनीलने राधिकेला सोडचिट्ठी देण्याचा निर्णय घेतला. राधिका यासाठी आधी तयार नव्हती पण नंतर तिने काय विचार केला कोण जाणे, तिने सुनीलला अट घातली की, घटस्फोट हवा असेल तर सदनिका आणि कार तिच्या नावे करावी. तिला कदाचित असेही वाटले असेल की या अटी घातल्या तर सुनील घटस्फोटाचा विचार करणार नाही. कारण मुंबईत आपली जागा कुणी वाट्टेल ते झाले तरी सोडीत नाही हे तिला माहीत होते. परंतु सुनीलने विचार केला की सदनिका आणि कार काय कधीही पुन्हा घेता येतील पण आपणाला दुसरे आई-बाबा मिळणार नाहीत. शिवाय असल्या मूर्ख कैदाशिणीपासून तरी आपली कायमची सुटका होईल. कुटुंबन्यायालयात अर्ज दाखल झाला. कौन्सिलिंग झाले आणि तीन सुनावणीतच घटस्फोट मंजूर झाला. सुनील आपली सदनिका व कार सोडून आपले आई-वडील व भाऊ जिथे राहत होता तिथे काही दिवस राहावे म्हणून आला. आपल्यामुळे आपल्या मुलाचा संसार मोडला याचे दुःख संपतराव आणि शारदाबाईना वाटत होते. अपराधी झाल्यासारखे वाटत होते. पण इलाज नव्हता.

इकडे सचिनला लंडनला जायची काही संधी मिळत नव्हती. एक दिवस परमजीत लंडनहून मुंबईला आली. सचिनला म्हणाली, ‘तुला काही लंडनला नोकरी मिळत नाही आणि मला तिथली नोकरी सोडायची नाही. त्यापेक्षा आपण परस्पर सहमतीने विभक्त होऊ’. संपतराव, शारदा, सुनील व सचिन यांना हा दुसरा मोठ्ठा धक्का होता. दोन्ही मुलांचे प्रेमविवाह अशा प्रकारे वर्ष दीड वर्षातच असफल ठरले होते. परमजीतने सदनिकेची चावी आपल्या ताब्यात घेतली आणि ती पुनश्च लंडनला रवाना झाली. लग्नापूर्वी आपण आपल्या आई-वडिलांचा सल्ला मानला नाही याचा पश्चाताप दोन्ही मुलांना आता होत होता.

सुनील आणि सचिन मुंबईतील आपल्या चुलत बंधुसोबत तात्पुरते राहायला गेले तर संपतराव आणि शारदाबाई आपल्या गावच्या मूळ घरी! संपतराव आणि शारदाबाई यांना कर्ते-सवरते दोन पुत्र असताना आयुष्याच्या संध्यासमयी दुर्दैवाचे असे कठोर आघात सहन करावे लागले. याचा परिणाम म्हणून संपतराव यांचे मानसिक संतुलन बिघडले. अधूनमधून त्यांना वेडाचे झटके येऊ लागले. त्यांना सावरता सावरता शारदाबाईंची त्रेधातिरपीट उडायची. या सगळ्या प्रकाराने शारदाबाई पार खचून गेल्या. झाल्या प्रकाराने त्यांचे डोळे वारंवार भरून यायचे.
‘‘एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे..’’- हे गीत किती सार्थ आहे नाही ?