बेलगाम कोरोना….

0
359
  • डॉ. राजेंद्र साखरदांडे

लोक एवढे घाबरलेत, बिथरलेत की वेडे व्हायचे राहिलेत. माझ्या मते वर्षभरात हायपरटेन्शन, मधुमेह, हृदयविकार, वेडेपणा, डिप्रेशनचे रोगी वाढणार. वावटळ ही येणारच. स्वतःची काळजी घ्या. घरी रहा. चाकरमानी लोकांनी सांभाळायला हवे. दुसर्‍यांसाठी धोकादायक बनू नका.

कोरोनाने सर्वांना रक्तबंबाळ केले आहे. जगाची घडी विस्कळीत झाली आहे. कुणाचा पायपोस कुणाच्या पायांत नाही. जनता जणुकाही बिथरलेली आहे. एकापाठोपाठ एक अशी नाना संकटे येताहेत व आपण गर्भगळीत झालो आहोत. आज तर परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. आज पुढे काय होणार यावर जग स्तब्ध आहे. चॅनेलवर जगभरातील बातम्या, भारतातील परिस्थिती, गोव्यावर चर्चा सकाळ ते झोपेपर्यंत… तुम्ही त्या पाहात राहिलात… फक्त दिवसभर् बघत रहा व मग स्वतःला रात्री आरशासमोर ठेवा… बघा. तुम्हाला तुमचेच तोंड बघवणार नाही. तुम्ही झोपू शकत नाही… जेवण पचणार नाही… जेवलेले गळ्यापर्यंत येणार…
दवाखान्यात लोक फक्त अंग दुखले तर धावत येतात… ‘डॉक्टरसाहेब माझे रात्रीपासून डोके दुखतेय… मला संडासला होतेय… थंडी वाजते… मला कोविड तर झाला नाही ना?’ एवढे प्रश्‍न?… कुणालाही कोरोना घरी आलेला नकोय… मरायचे नाही. कोविडने लोकांची गंगाजळी संपलेली आहे.
येन केन प्रकारेण प्रत्येक जण स्वतःला वाचवण्यासाठी पळतोय. औषधांच्या कंपन्यांचे चांगले फावलेय. मास्कवाले, सॅनिटायझरवाले, ऑक्सीजनवाले, व्हेंटिलेटरवाले यांचे चांगले फावलेय. अव्वाच्या सव्वाला माल विकला जातोय. डेटॉलवाल्यांची चंगळ चाललेली आहे. हजारो प्रकारच्या प्रतिकारशक्ती वाढवायच्या गोळ्या बाजारात येताहेत.

जो कोणी सांगतोय, डॉक्टर आम्ही घरातील सर्व मंडळी इन्‌हेलेशन (वाफ घेतो) करतो, दररोज कढत पाण्याच्या गुळण्या करतो… एवढे की घसा लाल लाल झालाय… घसा बोंबललाय.. काढे तर चालूच आहेत. श्रीपादभाऊ मणिपालला गेल्यानंतर भारतभर चाललेली श्रीपादभाऊंच्या आयुषच्या काढ्याची जाहिरात, त्या त्यांच्या गोळ्या, घराघरात फिरणारे कार्यकर्ते तर गायब झाले आहे. च्यवनप्राशचा तर आवाजच नाही. मोजक्याच लोकांना च्यवनप्राश मोठ्या वशिल्याने मिळाला होता, तेही नाही. आयुषचे भाऊ जे दररोज आयुषच्या गोळ्या, काढे, च्यवनप्राश खात होते, ते जर झोपले तर सामान्यांचे काय! तेव्हा वाटप बंद झाले. आयुषच्या प्रकल्पाची अगदी रेवडी उडाली. कसातरी जीव वाचवलाच पाहिजे. पण कसा? हे तर कुणालाच कुणी सांगत नाही… कुणाला काहीच माहीत नाही.
आरोग्यखात्याचे संचालक तेही हॉस्पिटलांत. तेही मणिपालात… सगळे व्ही.आय.पी. दोनापावलाला धावतात. सामान्य जनता ई.एस.आय. हॉस्पिटलात…गोमेकॉत… जसजसे कोरोनाग्रस्त वाढताहेत तसतशी नवनवी हॉस्पिटलं तयार होतात… नव्या कॉट्‌स, गाद्या, साइड लॉकर… कोरोना कीट… व्हेंटीलेटरच्या ऑर्डरी ठोकल्या जातात.

चलारे, पळा पळा… मिळेल तिथून ह्या वस्तू आणा… अंगावर घालायचे कपडे आणा… मास्क आणा… सॅनिटायझर आणा… मिळेल त्या पैशांनी आणा… कुणीही कुणाला काहीही विचारू शकत नाही, आणीबाणी आहे. ऑडिट नाही. बातम्या येताहेत लाखाच्या वस्तू पाच लाखात घेतल्या. चोडणकर महाराज दररोज बोंबलतोय… बकासूर गाड्याच्या गाडे जेवतोय… जनतेच्या पैशांवर सगळे ऑल वेल चाललेय. नाहीतर दर महिन्याला कर्ज काढणारे हात पसरून तयार…! हे रामा तू तरी बघतोय ना… का तू तिथे अयोध्येतच स्थित आहेस!!
कोरोनाचे प्रकरण भयानक वाढतेय… जंगल पेटलेय… अगदी फोफाटून पेटलेय. कोरोनाचे आकडे फुगताहेत. नाना प्रकारच्या वावड्या, गंड्या यांना मुक्तद्वार लाभलेय. व्हॉट्‌सऍप, चॅनेलवाले तर तयार आहेत. दर संध्याकाळी बातम्या येतात- आज एवढे नवीन कोरोनाग्रस्त सापडले… एवढे मरण पावले… एवढे सँपल तपासून झाले. त्यावर प्रत्येकाचे हजारो… किती… याचे प्रमाण… मग ते गोव्याचे प्रमाण.. महाराष्ट्र व भारतात कसे चांगले आहे यावर सविस्तर माहिती… मग त्यावर माननीय मुख्यमंत्री यांचे ते करत असलेल्या अथक प्रयत्नांबद्दलचे हार्दिक आभार. ह्याने पोट भरतेय का?
कोरोना गोव्याच्या कानाकोपर्‍यात पसरलाय. आरोग्यमंत्री चार दिवसांपूर्वी म्हणाले, ‘कम्युनिटी ट्रान्समिशन’ सुरू झालेय. कम्युनिटी ट्रान्समिशन म्हणजे नेमके काय हे कुणी सांगेल का? आज कोरोना माणसा-माणसांत पसरतोय… कुणाकडून आला माहीत नाही. पूर्वी आम्ही म्हणायचो अमुक अमुक मांगोरहिलवरून घोडेमळ, मोर्लेला आता तसे आता नाही. गावागावांतून रोग पसरतोय…. जोराचा फैलाव चालू आहे. गोव्यातील प्रत्येक माणसाला दुसर्‍या माणसापासून धोका आहे.

आज दिवसा कोरोनापीडितांची संख्या ६०० वर गेली आहे. परवा मी एका प्रसिद्ध डॉक्टर प्रणव बुडकुलेकडे बोलत होतो. ते म्हणाले, ‘‘६०० पेशंट्‌स जर दिवसा आपल्याला भेटतात तर दिवसाचा आकडा तीन हजार तरी नक्कीच असणार…’’
अबब… चला बोंबलत. ते पुढे म्हणतात, ‘‘माझ्याकडे दररोज २० तरी कोरोनाचे रुग्ण येतात… ज्यांची टेस्टिंग व्हायला हवी, पण त्यापैकी प्रत्येकजण म्हणतो मी बरा आहे, डॉक्टरसाहेब त्याची गरज नाही. दम लागतोय, श्‍वास घ्यायला जमत नाही, ऑक्सिमीटरवर ओटू ७२% दाखवतोय. तरीही टेस्टिंग करत नाही. दोन दिवसात तो दगावतो. २० पैकी १० टेस्टिंग करतात. राहिलेले गोवाभर हिंडत राहतात. असिम्प्टोमॅटिक कोरोना प्रसार चालूच राहतो. …
साखळी हॉटस्पॉट. दररोज ही बातमी साखळीकरांची बाजारात पत वाढवते. मी डॉक्टरना विचारले, कोरोनाने शिखर गाठलेय का? .. म्हणाले, ‘‘हेच ते शिखर, मला अजून शिखर गाठायचेय’’. म्हणजे हे थांबणार तरी केव्हा व कुठवरपर्यंत हा आलेख वाढत राहणार! अरे बाबांनो, शिखर गाठल्यावर तीन-चार आठवड्यांचा प्लेटू … मग उतार येणार… तोवर हे असेच.

लोक घाबरलेत. डॉक्टरवर्ग घाबरलाय. मीही घाबरलोय… मास्क, हातमोजे, अंगभर कपडे परिधान करूनच पेशंट तपासतोय. गरम होतेय. घाम येतो. सोसवत नाही… मग कोरोना येणार… काय करणार..!
माझे पेशंट कोरोनाग्रस्त झालेत, दवाखान्यात येऊन बसतात… सांगतात… याचा फोन आला…मला कोरोना झालाय. परवा एक म्हातारी दगावली. पणजीलाच चक्क गुंडाळी करून जाळून टाकली… घरात मंडळी तीस- चाळीस… आजुबाजूला घराला घरं टेकलेली… वाड्यावर… ५००-६०० लोक… पण घरच्याच लोकांनी टेस्टिंग करून घेतले नाही. त्यांतला काल एकटा दवाखान्यात आला… टेस्टिंग केलेली नाही. तो म्हणाला, प्राथमिक खात्याचे कर्मचारी अजून आले नाहीत. सॅनिटाइझ केले नाही. आता आठ दिवसात १४ दिवस होतील…. करून तरी काय फायदा? त्यांना भय वाटते. पॉझिटिव्ह झाला तर मग हजारो… लाखो काढावे लागतील. गोमेकॉवर विश्‍वास नाही. व्हिआयपींचा, राजकारणी लोकांचा जर विश्‍वास नाही तर सर्वसामान्य जनतेचा काय राहणार? गोमेकॉत ऍडमिट केलेल्या कोरोनाचा पेशंट घेऊन खानापुरला पळाले.
परवा एकटा क्वारेंटाइन झालेला… म्हापशाला पेडेवर चौदा दिवस राहिलेला म्हणाला, ‘काढा, गरम चहा, साधे जेवण व झोपायचे फक्त एवढेच? मग ते आम्ही घरी करू. आम्हाला इथे ठेवून आमच्यावर आलेले दर माणशी पैसे कुणी बकासुर तरी खाणार नाही. ही वावडी गोवाभर झालेली आहे. शेवट मुख्यमंत्र्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. मध्येच श्रीमती नीला मोहनन बदलीवर गेल्या. अगदी तडकाफडकी का? कुणी काही बोलले नाही. गव्हर्नर गेले, सगळे बोंबलले. सगळेजण फक्त आणि फक्त कोरोनाचेच भय घेऊन राहिलेत.

आपल्या घरात क्वारंटाईन करायचे हे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण… व त्यांना सरकारतर्फे जनतेच्याच पैशातून बॅग भरून किट देणेही आत्ताच सुचले. आग लागल्यावर चला रे पळा.. पळा.. विहिरी खणा… हीच का ती आणीबाणी… डिझास्टर मॅनेजमेंट बॉडी… उत्तर व दक्षिण गोवा कुठे गेला? कोरोनाच्या नावे दिल्लीवरून पैशे येताहेत… खणा खणा विहिरी खणा… रणांगण पेटलेय… राजपुत्राने सरदारची वल्कले धारण केलीत… दररोज एक वेगळाच विचार… वेगळाच फतवा, बेभान सुटलेय… त्यातला नोकरवर्ग, परिचारिका, डॉक्टर्स मरायला टेकलेत. केव्हा कुणावर हल्ला बोलेल सांगता येणार नाही.

आरोग्य खात्याचे दररोजचे कोरोना पत्रक वाचून मजाच येते… आज एवढे कोरोना पीडित सापडलेत… एवढे सँपल घेतले… एवढे तपासलेत… एवढे राहिले… एवढे पॉझिटिव्ह… एवढे मरण पावले… मरणार्‍यांपैकी एवढे को-मॉर्बिड होते… राहिलेल्यापैकी चार तरुण पोरे वारली… कशी वारली… त्यांना काय झाले होते?… त्याविषयी खाते मौन… मागे कुडणेचा आठवड्यापूर्वी लग्न झालेला ३२ वर्षे वयाचा मुलगा कोरोनाने वारला… चांगला ठणठणीत होता…कसा वारला… आरोग्यखाते परत एवढे मौन धारण केलेले. कुणी कोरोनाचा पेशंट सापडला… त्याच्या घरी कुणीही आरोग्यखात्यातील माणूस गेला नाही. सॅनिटायझेशन नाही. घरच्या लोकांची टेस्टिंग नाही. पण दिवस पत्रकावर त्या भाषांतील त्या भागातील तिन्हीही आरोग्याधिकार्‍यांवर कौतुकाची फवारणी… वा.. वा.. खरेच किती किती काम करताहेत… मला हसू आले. कारण त्यांना मी जोपासलेय. कुठल्याही सरकारी खात्यात कुठलीही फाईल ‘काम करायचे नाही’ म्हटल्यावर अडगळीत कुजत ठेवतात. काही झाले तर ‘गहाळ’ होतात.

तर मंडळी कोरोनावर पुढे काय? व्हॅक्सीन येणार… पण केव्हा महालक्ष्मीवर घोडे धावताहेत – रेस लागलीय… कोण पहिला?… व्हॅक्सीन कुणाचे येणार, कोण बाजी जिंकणार! व्हॅक्सीन इन्स्टिट्यूटचे ‘पुनावाला’ हल्लीच म्हणाले, ‘सर्वांना व्हॅक्सीन फक्त २०२४ नंतरच!’

हे ऐकून सगळ्या भारतीयांना धडकीच भरली. त्यांना तसे म्हणायचे नव्हते. व्हॅक्सीन भेटले तर ते कुणाला प्रथम देणार… तर ते पहिल्यांदा आरोग्य राखणार्‍यांना, त्यांचा लढा देणार्‍यांना, सरहद्दीवर लढणार्‍यांना, शास्त्रज्ञांना, राजकारणी लोकांना, व्हीव्हीआयपीना, व्हीआयपींना, भाजपाच्या सरपंच्यांना, पंचांना, कार्यकर्त्यांना, वगैरे वगैरे. राहता राहिलेले.. म्हातार्‍यांना, छोट्या मुलांना. बाकीच्यांना २०२४ नंतर! मला लवकर मिळेल, मी डॉक्टर. वर मीही एक म्हातारा.. मी आजोबा झालो!
वर व्हॅक्सीनचे मोल किती? कुणी म्हणाले ४०००, कुणी म्हणाले २००० तर सरकार म्हणते प्रत्येक भारतीयाला फुकट मिळणार… म्हणजे पैशे जनतेचेच. त्यावरची मलई… कोण खाणार ह्यावर हितगुज चालू आहे. औषधे येताहेत.

मध्येच कुणीतरी प्लाझमा ट्रान्स्फ्युजनचा शिरकाव झाला म्हणजे केवळ झाला नाही तर केला गेला. मशिनरी मशिन्स आणली गेली, कर्मचारी वर्ग नेमला गेला. राज्यभर वातावरणनिर्मिती झाली. सरकारने जाहीरही केले. जो प्लाझमा देणार त्याला व त्याच्या कुटुंबाला वर्षभर मोफत उपचार देणार हो… दवंडी पिटली गेली.. वाजवा रे वाजवा.. टाळ्या वाजवा.

प्लाझमा थेरपी जगावरच्या कुठल्याही शास्त्रज्ञाने ठामपणे हे सांगितलेले नाही की हा उपचार कोरोनावर एक उपाय आहे… त्याविषयीचे आकडे माहीत नाही. प्लाझमा दिल्याने कुणी बरा झालाय का?.. हे तो माणूस ६ ते १२ महिन्यानंतर समजेल. हे एवढे गुंतागुंतीचे आहे की त्यावर भाष्य न केलेले बरे! पण चंगळ चालू आहे. कालच कुणी मला म्हणाले, ‘प्लाझमाची एक बाटली ब्लॅकमध्ये ४००० रुपये फक्त’. तेव्हा त्यावर न बोललेले बरें! आम्ही रुपया रुपया मोजणारी माणसे… गोण्यांनी पैसे आम्ही दहा जन्म घेतले तरी होणार नाही. आमदार, मंत्री झालो तर पाच वर्षांची कमाई गोणीवर गोणी नक्कीच!
प्लाझमा थेरपी मरायला टेकलेल्या, कॉम्प्लिकेशन्स झालेल्या पेशंटवरच करतात. लक्षात ठेवा. मरायला टेकलेल्या पेशंटचे नातेवाईक तर अडलेले… म्हणाल तेवढे पैसे द्यायला तयार. सामान्य माणसांना गोमेकॉमध्ये प्लाझमा द्यायला कुणी माईचा लाल पैदा झालेला नाही.

राहता राहिल्या गोळ्या- इंजक्शने… एवढी महागडी की जन्मभर केलेली कमाई केव्हा संपली.. समजणार पण नाही. आता तर क्वारंटाइन केलेल्यांना हॉस्पिटलने चौदा दिवसांचे पॅकेजपण जाहीर करून टाकलेय. १ दिवसाचे औषधे सोडून फक्त ८०,०००/- औषधे गरजेप्रमाणे.

१ इन्जेक्शन फक्त २५०००/- हिशोब फक्त दर हजारांनी. ते तर सामान्याच्या खिश्यास परवडणारे नाहीच.
तोवर लोकांनी काय करायचे. …जनतेमध्ये दर तीन माणसांमागे एकटा हायपरटेन्शन, हार्ट व डायबीटीज पेशंट, मग त्यांनी मरायचे का? सरकार परत एकदा मूक.. मौन धारण केलेले.. मौनीबाबा झालेले.

  • आपण घरीच राहायचे.
  • बाजारात गर्दीत जायचे नाही.
  • हॉटेलात, बार-रेस्टॉरेंटमध्ये जायचे नाही.
  • मासे खरेदीसाठी नाही.
  • म्हातार्‍यांनी, रोगी लोकांनी, लहानांनी नाहीच नाही.
  • नोकरवर्गांनी सगळी खबरदारी घेऊनच जाणे.
    नाहीतर मराल हे निश्‍चित.
    लोक एवढे घाबरलेत, बिथरलेत की वेडे व्हायचे राहिलेत. माझ्या मते वर्षभरात हायपरटेन्शन, मधुमेह, हृदयविकार, वेडेपणा, डिप्रेशनचे रोगी वाढणार. वावटळ ही येणारच.
    स्वतःची काळजी घ्या. घरी रहा. चाकरमानी लोकांनी सांभाळायला हवे. दुसर्‍यांसाठी धोकादायक बनू नका.