फ्रान्समध्ये दहशतवादी हल्ल्यात ८४ ठार

0
102

>> नागरिकांवर ट्रक चालवून केला हल्ला

 

फ्रान्स दहशतवादी हल्ल्याने पुन्हा एकदा हादरले असून गुरुवारी मध्यरात्री फ्रान्स क्रांतीदिनानिमित्त नीस शहरात आयोजित आतषबाजीवेळी एका ट्रक चालकाने नागरिकांवर ट्रक चालवून केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ८४ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जखमी झाले आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकोइश ओलांद यांनी हा दहशतवादी सदृश हल्ला असल्याचे म्हटले असून फ्रान्समधील आणीबाणी आणखी तीन महिन्यांसाठी वाढवली आहे.
निरपराध लोकांचे बळी घेणार्‍या ३१ वर्षीय नराधमाचे नाव महंमद लाहौज बौहलेल आहे. तो फ्रान्सचा नागरिक असून मूळचा ट्युनिशियन वंशाचा आहे. दरम्यान, नीसमधील सर्व भारतीय सुखरूप असल्याचे तेथील भारतीय दूतावासातील सूत्रांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
भारतीय वेळेनुसार गुरुवारी रात्री नीस शहरातील फ्रेंच रिव्हेरा रिसॉर्टमध्ये फ्रान्स क्रांतीदिनानिमित्त होणारी आतषबाजी पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळी अचानक एका ट्रक चालकाने जमलेल्या लोकांवर बेदरकारपणे ट्रक चालवल्याने अनेक लहान मुले, त्यांचे आई-वडील काय होते ते न कळताच रक्ताच्या थारोळ्यात पडले. ट्रक चालकाने निर्दयपणे सुमारे दोन किलोमीटर ट्रक लोकांवरून नेल्याने सर्वत्र मांस, अवयव व रक्ताचा सडा पडला. घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी ट्रकवर गोळीबार करून हल्लेखोराला ठार मारले. मात्र, तोपर्यंत ट्रकने अनेकांना चरडले होते.
हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व दारूगोळा पोलिसांना सापडला आहे. हल्ल्यावेळी एका दुचाकी स्वाराने ट्रकमध्ये चढण्याचा प्रयत्न करून चालकाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात त्याची गाडी खाली पडून तोच ट्रकखाली सापडला. हल्लेखोराला गोळ्या घालून ठार करण्यापूर्वी त्यानेही पोलिसांवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ही दुर्घटना किंवा अपघात नसून हा दहशतवादी हल्ला असल्याचे फ्रान्सच्या एका सुरक्षा अधिकार्‍यांनी म्हटले आहे. या हल्ल्यानंतर दिल्लीतील फ्रान्स दूतावासाबाहेरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. फ्रान्सचे दहशतवादविरोधी पथक या हल्ल्याचा कसून तपास करीत आहे. मात्र, अद्याप हा हल्ला कोणत्या दहशतवादी संघटनेने केला त्याबाबत माहिती उघड झालेली नाही. कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, इसिस समर्थकांनी सोशल मीडियावर या हल्ल्यानंतर जल्लोष केला आहे.
फ्रान्समध्ये गेल्या वर्षी ३० नोव्हेंबरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये १३० नागरिकांचे बळी गेले होते. त्यानंतर झालेला हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे.

हल्लेखोर मूळ ट्युनिशियाचा
भरधाव ट्रक लोकांवर घालून अनेकांचे बळी घेणार्‍या दहशतवाद्याची ओळख पटली आहे. तो मूळ ट्युनिशियाचा असून महंमद लाहौज बौहलेल असे त्यावे नाव आहे. सध्या तो फ्रान्सचा नागरिक आहे.