Home Featured फोंड्यातून भाजप-काँग्रेस-आपच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल

फोंड्यातून भाजप-काँग्रेस-आपच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल

0

फोंडा मतदारसंघ पोटनिवडणूक : एकूण तीन अर्ज दाखल;

आज अर्जांची छाननी;

उद्या अंतिम चित्र स्पष्ट;

प्रत्येक पक्षाकडून विजय मिळणार असल्याचा दावा

गोवा विधानसभेच्या फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 3 उमेदवारी अर्ज दाखल झाले. भाजपकडून रितेश नाईक, काँग्रेसकडून केतन भाटीकर आणि आम आदमी पक्षातर्फे गीतेश नाईक यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे ही पोटनिवडणूक तिरंगी होण्याची दाट शक्यता आहे. उमेदवारी अर्ज भरताना भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र पोलिसांनी त्यावर नियंत्रण ठेवले. आज उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. दरम्यान, फोंड्यातील मतदार भाजप उमेदवार रितेश नाईक यांना विजयी करून स्व. रवी नाईक यांना श्रद्धांजली देणार आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले, तर काँग्रेसचे आमदार तथा विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी केतन भाटीकर यांच्या विजयाने पक्षाचे 4 आमदार होणार असल्याचे स्पष्ट केले.

फोंडा मतदारसंघात येत्या 9 एप्रिल रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीची अधिसूचना गेल्या सोमवारी जारी करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. मात्र पहिल्या चार-पाच दिवसांत एकही अर्ज दाखल झाला नव्हता.

रितेश नाईक यांनी भरला अर्ज

सोमवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी भाजपचे उमेदवार रितेश नाईक यांच्यासमवेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, आमदार गोविंद गावडे व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. नगरसेवक विश्वनाथ दळवी आणि रितेश नाईक यांच्यात काहीच मतभेद नसून, ते एकजुटीने प्रचार करणार असल्याचे सांगितले.
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी भाजप उमेदवार रितेश नाईक यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले. भाजप आणि मगो कार्यकर्ते एकत्रितपणे प्रचार करीत असल्याचे नमूद केले.

केतन भाटीकरांकडून अर्ज सादर

काँग्रेसचे उमेदवार केतन भाटीकर यांनीही काल उमेदवारी अर्ज भरला. यावेळी गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लुस फेरेरा, राजेश वेरेकर व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना अमित पाटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रवेशद्वाराबाहेर हाकलून लावले; पण भाजप कार्यकर्ते कार्यलयासमोर उपस्थित होते. यावरून सरकार निवडणुकीत दबाव टाकताना दिसून येत असल्याचा आरोप केला. काँग्रेस पक्षाचा विजय निश्चित असल्याने भाजप सरकार घाबरलेले आहे. त्यामुळे निवडणुकीवेळी सर्व सरकारी यंत्रणा भाजपबरोबर काम करण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

गीतेश नाईकांकडून अर्ज सादर

आम आदमी पक्षाचे उमेदवार गीतेश नाईक यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, आमदार व्हेंझी व्हिएगस, क्रूण सिल्वा व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजप सरकार अस्तित्वात असून सुद्धा उपजिल्हा इस्पितळात आवश्यक साधने सुविधा उपलब्ध करू शकलेले नाही. त्यामुळे मतदारांनी गीतेश नाईक यांना विजयी करावे, असे आवाहन आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी केले.

पोटनिवडणुकीला आव्हान; गोवा खंडपीठात याचिका

फोंडा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीला आव्हान देणारी एका याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात काल दाखल करण्यात आली असून, या आव्हान याचिकेवर मंगळवार दि. 24 मार्च रोजी सुनावणी घेतली जाणार आहे. राज्य विधानसभेच्या 2027 मधील सार्वत्रिक निवडणुकीला केवळ एक वर्षाचा कालावधी शिल्लक असताना फोंडा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येत असल्याने त्याला आव्हान देण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात ही आव्हान याचिका सोमवारी सुनावणीला आली. खंडपीठाने पोटनिवडणुकीच्या आव्हान याचिकेवर मंगळवारी सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला.