संशयिताची 4 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी
कुडचडे येथील कथित वासनाकांड (सेक्स स्कँडल) प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयित सोहम सुशांत नाईक (20 वर्षे, रा. मड्डेगाळ-काकोडा) याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश केपे येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने काल दिला. या कथित वासनाकांड प्रकरणी सुरुवातीला संशयिताच्या विरोधात पॉक्सो कलम लागू करण्यात आले नव्हते. राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी याबाबत आवाज उठविल्यानंतर त्याच्या विरोधात पॉक्सो कलम लागू करण्यात आले आहे. दरम्यान, या वासनाकांड प्रकरणातील चार पीडितांची ओळख पटली आहे. या प्रकरणात पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, या वासनाकांडाचा सखोल तपास केला जात आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
कुडचडे परिसरात गेल्या काही दिवसापासून कथित वासनाकांडाचा विषय चर्चेत आहे. तथापि, पोलीस यंत्रणेने या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी रविवारी आवाज उठवून या प्रकरणात संशयिताच्या विरोधात कारवाईसाठी 24 तासांची मुदत दिली होती. त्यानंतर कुडचडे पोलिसांनी कुडचडे नगरपालिकेच्या एका नगरसेवकाचा पुत्र सोहम नाईक याला रविवारी रात्री अटक केली.
या कथित वासनाकांड प्रकरणात संशयित आरोपींच्या विरोधात पॉक्सो आणि गोवा बाल कायद्याखाली कलमे लागू करण्यात न आल्याने नागरिकांत एकच खळबळ उडाली. सोमवारी सकाळी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, सामाजिक कार्यकर्त्या आवडा व्हिएगस आणि स्थानिक ग्रामस्थांनी कुडचडे पोलीस स्थानकावर धडक देत या प्रकरणात पॉक्सो कलम लागू करण्यात न आल्याबद्दल पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.
या वासनाकांड प्रकरणात पॉक्सो कलम आणि गोवा बाल कायद्यांअंतर्गत कलमे लागू करण्याची मागणी केली. त्यानंतर कुडचडे पोलिसांनी संशयित आरोपीच्या विरोधात पॉक्सो कलम लागू केले आहे.