फोंडा, साखळी पालिकेसाठी आज मतदान

0
7

>> दोन्ही पालिकांसाठी 74 उमेदवार रिंगणात; 21 हजार 203 मतदार ठरवणार उमेदवारांचे भवितव्य

बहुचर्चित फोंडा आणि साखळी या दोन्ही नगरपालिकांची निवडणूक आज (शुक्रवार दि. 5 मे) होत असून, सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान घेतले जाणार आहे. दोन्ही पालिकांसाठी 74 उमेदवार रिंगणात असून, दोन्ही पालिका क्षेत्रांतील 21,203 मतदार या उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. विशेष म्हणजे दोन्ही पालिका क्षेत्रांत महिला मतदारांची संख्या जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. सरकारी यंत्रणा या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी सज्ज झाली असून, मतदानासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रांचा ताबा घेतला आहे. पालिकांसाठीच्या मतदानासाठी मतपत्रिकेचा वापर केला जाणार आहे. तसेच कोविडबाधित मतदारांना मतदानासाठी संध्याकाळी 4 ते 5 असा 1 तास उपलब्ध करण्यात आला आहे.

फोंडा आणि साखळी नगरपालिका निवडणूक पक्षीय पातळीवर घेतली जात नसली तरी प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान विविध पक्षांनी आपल्या समर्थक उमेदवारांची नावे जाहीर केली होती. तसेच दोन्ही गटांकडून प्रचार यंत्रणा देखील जोरदार राबवण्यात आली होती. फोंडा पालिकेसाठी फोंडा नागरिक समिती आणि रायझिंग फोंडा अशी दोन पॅनल आहेत, तर साखळी पालिकेसाठी टुगेदर फॉर साखळी आणि भाजप समर्थित पॅनल यांच्यात लढत होत आहे.

या दोन्ही नगरपालिका क्षेत्रात मतदार असलेल्या सरकारी कर्मचारी, खासगी कंपन्या, खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दोन्ही नगरपालिका क्षेत्रातील मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक होणाऱ्या दोन्ही नगरपालिका क्षेत्रात जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. मतदान केंद्रांच्या 100 मीटर क्षेत्रातील सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. पोलिसांनी निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक बंदोबस्त तैनात केला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक आणि खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

फोंड्यात चुरशीच्या लढती अपेक्षित
फोंडा नगरपालिका क्षेत्रातील विविध प्रभागांत चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत. नगरपालिका निवडणूक पक्षीय पातळीवर होत नसली, तरी राजकीय पक्षांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. राज्याचे कृषिमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी नगरपालिकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी प्रचारयंत्रणा राबवली, तर केतन भाटीकर यांनी आपल्या समर्थक उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रणनीती आखत प्रचारकार्य राबवले होते.

साखळीतही जोरदार टक्कर
दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी नगरपालिकेवर वर्चस्व मिळविण्याच्या हेतूने भाजप समर्थित पॅनलमधील उमेदवारांसाठी प्रचार राबवला होता. त्यांना धर्मेश सगलानी यांच्या नेतृत्वाखालील टुगेदर फॉर साखळी गटाकडून तेवढीच लढत मिळत असून, आता या दोन्ही गटांतील उमेदवारांत चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत.

7 मे रोजी मतमोजणी
मतमोजणी येत्या रविवार दि. 7 मे रोजी सकाळी 8 वाजल्यापासून केली जाणार आहे. फोंडा नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी तिस्क फोंडा येथील सरकारी इमारतीच्या सभागृहात केली जाणार आहे, तर साखळी नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी बहुउद्देशीय सभागृह साखळी येथे केली जाणार आहे.

फोंड्यात 43 उमेदवार रिंगणात
फोंडा नगरपालिका क्षेत्रात 13 प्रभागांतून 43 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. फोंडा पालिकेच्या प्रभाग 7 आणि प्रभाग 13 या दोन प्रभागांतून उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता फोंडा नगरपालिका क्षेत्रातील 15 पैकी 13 प्रभागांत निवडणूक होत आहे. या 13 प्रभागांत 22 मतदान केंद्रे आहेत.

साखळीत 31 उमेदवार रिंगणात
साखळी नगरपालिकेच्या 10 प्रभागांतून 31 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. या नगरपालिकेच्या प्रभाग 5 आणि प्रभाग 8 या दोन प्रभागांतून उमेदवारांची बिनविरोध निवड झालेली आहे. आता या नगरपालिका क्षेत्रात 12 पैकी 10 प्रभागांत निवडणूक होत आहे.