भारत-चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांत सीमेवरील शांततेबाबत चर्चा

0
8

>> एससीओ बैठकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मंत्र्यांची भेट; पाकचे परराष्ट्रमंत्रीही दाखल

शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काल चीनचे परराष्ट्रमंत्री किन गँग यांच्याशी दक्षिण गोव्यातील एका तारांकित हॉटेलमध्ये द्विपक्षीय चर्चा केली. या बैठकीत सीमा भागात शांतता राखण्याबाबत चर्चा झाली.
दक्षिण गोव्यातील एका तारांकित हॉटेलमध्ये आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) दोन दिवसीय बैठकीसाठी सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांचे गोव्यात काल आगमन झाले. त्यात चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅवरोव्ह, उझबेकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बख्तियोर सैदोव, यूएईचे राजदूत अब्दुलनासर अलशाली आणि इतर आंतरराष्ट्रीय नेत्यांचा समावेश आहे. एस. जयशंकर यांनी एससीओचे सरचिटणीस झांग मिंग यांच्यासोबतही बैठक घेऊन विविध विषयावर चर्चा केली.
एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. चर्चेत प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्यावर आणि सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्था सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला. एससीओ बैठकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांनी एससीओ, जी-20 आणि ब्रिक्स यावर सविस्तर चर्चा केली.

एस. जयशंकर यांनी काल उझबेकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बख्तियोर सैदोव यांची देखील भेट घेतली आणि द्विपक्षीय भागीदारी वेगवेगळ्या क्षेत्रात वाढत जाईल, असा विश्वास व्यक्त केला. बैठकीदरम्यान जयशंकर यांनी भारताच्या एससीओ अध्यक्षपदासाठी उझबेकिस्तानच्या भक्कम पाठिंब्याबद्दल आभार मानले. तसेच, विविध क्षेत्रात दोन्ही देशांचे संबंध वाढण्याचा विश्वास व्यक्त केला.
एस. जयशंकर यांनी रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्गेई लावरोव्ह यांच्याशी चर्चा केली. युक्रेन संकटावर पाश्चिमात्य देशांसोबत मॉस्कोच्या तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर भारत-रशिया ‘विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी’चा व्यापक आढावा घेतला. एससीओच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांनी विविध विषयांवर तासभर चर्चा केली.

एससीओ बैठकीत सहभागाचा आनंद : झरदारी
पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची 2011 नंतरची पहिलीच भारत भेट आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीमध्ये पाकिस्तानी शिष्टमंडळात सहभागी होऊन त्याचे नेतृत्व करताना मला खूप आनंद होत आहे आणि मला ही बैठक यशस्वी होण्याची अपेक्षा आहे, असे पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी यांनी म्हटले आहे.