कौल कोणाला?

0
10

अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेली साखळी आणि फोंडा नगरपालिकेची निवडणूक आज होत आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, तर दुसरीकडे कृषी, हस्तकला व नागरीपुरवठा मंत्री रवी नाईक या दोघांचीही प्रतिष्ठा अनुक्रमे या दोन्ही पालिकांमध्ये पणाला लागलेली आहे. विशेषतः गेल्या विधानसभा निवडणुकीत मतांच्या किरकोळ आघाडीने विजयी झालेल्या मुख्यमंत्री सावंत यांच्यासाठी तर आपला जनाधार सिद्ध करण्याची ही निर्णायक वेळ आहे. त्यांच्या मुख्यमंत्रिपदावर डोळा ठेवून असलेल्या पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांना पक्षश्रेष्ठींपाशी नेतृत्वबदलाची मागणी करण्याची संधी मिळू द्यायची नसेल, तर या निवडणुकीत सावंत यांना आपला वरचष्मा सिद्ध करावा लागेल. वास्तविक, नगरपालिका निवडणुका ह्या काही पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नसतात, परंतु सत्ताधारी पक्षानेच तो राजकीय आखाडा बनवून ठेवला असल्यामुळे पक्षीय राजकारणाच्या परिप्रेक्ष्यातूनही या निवडणूक निकालांना अतोनात महत्त्व प्राप्त झालेले आहे. स्वतः भाजपचे प्रदेश अध्यक्ष जातीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत लक्ष घालत आहेत आणि आमदार, खासदारांना प्रचारात उतरवले गेले आहे, यातून सत्ताधाऱ्यांवरील दबाव स्पष्ट दिसतो. फोंड्यात रवी नाईक यांच्यासाठी ही निवडणूक पक्षापेक्षाही वैयक्तिक प्रतिष्ठेची अधिक आहे. त्यांनी आपल्या दोन्ही पुत्रांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. रॉय हे प्रभाग क्र. 1 मधून निवडणुकीला उभे आहेत, तर रितेश हे प्रभाग क्र. 5 या इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या प्रभागातून ही निवडणूक लढवीत आहेत. रॉय उभे असलेल्या प्रभाग 1 मध्ये पाच उमेदवार रिंगणात आहेत, तर रितेशच्या प्रभाग 5 मध्ये तिहेरी लढत आहे. स्वतः रवी नाईक भाजपवासी झालेले असल्याने गेल्यावेळेपेक्षा यावेळी या निवडणुकीची समीकरणेच बदलून गेली आहेत. फोंडा पालिका निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रभाग क्र. 2, 9 आणि 15 हे तीन प्रभाग सोडले तर इतर सर्व प्रभागांमध्ये बहुरंगी लढती आहेत. सत्ताधारी भाजप आणि मगो नेते डॉ. केतन भाटीकर यांचा ‘रायझिंग फोंडा’ यांच्यात सामना आहे. उच्चशिक्षित युवा चेहरे हेही फोंड्याच्या या पालिका निवडणुकीचे ठळक वैशिष्ट्य म्हणता येईल. सर्वांत तरुण उमेदवार ही 23 वर्षांची आहे. शुभलक्ष्मी शिंक्रे, प्रियांका पाटकर, प्रतीक्षा नाईक, श्रावण नाईक, पद्मजा प्रभू नाईक, मनस्वी मामलेकर, आतिश वेरेकर, रितेश व रॉय नाईक असे नव्या दमाचे तरुण – तरुणी या निवडणुकीत आपले राजकीय भविष्य आजमावणार आहेत ही आश्वासक बाब आहे.
फोंड्यापेक्षा साखळीमध्ये चुरस मोठी आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील भाजप विरुद्ध धर्मेश सगलानी याच्या नेतृत्वाखालील टुगेदर फॉर साखळी यांच्यात येथे सामना आहे. एकूण बारा प्रभागांपैकी तब्बल चार प्रभागांत थेट लढती होत आहेत, त्यावरून सामना किती अटीतटीचा आहे याची कल्पना येऊ शकते. दोन प्रभागांत प्रत्येकी 3, तीन प्रभागांत प्रत्येकी 4, तर केवळ एका प्रभागात पाच उमेदवार उभे आहेत. साखळी पालिका निवडणुकीमध्ये दबाव, धमक्यांचा वापर झाल्याचे आरोप विरोधकांकडून झाले, तर सत्ताधाऱ्यांनी ट्रिपल इंजिनची भाषा केली. चुरशीच्या बनलेल्या या निवडणुकीत ‘सायलंट वोटिंग’ निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही नगरपालिकांमध्ये प्रत्येकी दोन उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. साखळीत दोन्ही गटांच्या दोन उमेदवारांनी आपले खाते खोलले आहे. फोंड्यात दोन्ही बिनविरोध जागांवर सत्ताधारी गटाने दावा केला आहे. आज या दोन्ही नगरपालिका क्षेत्रांतील मतदार सुज्ञपणे आपापला लोकप्रतिनिधी निवडतील अशी अपेक्षा आहे. शेवटी नगरपालिका हा काही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संगीतखुर्चीचा खेळ खेळायचा मंच नव्हे. शहरातील नागरी समस्यांच्या सोडवणुकीचे ते व्यासपीठ आहे आणि तसे असायला हवे. साखळी काय, फोंडा काय, या शहरांच्या नागरी समस्या राज्यातील इतर शहरांसारख्याच आहेत. रस्ते, पाणी, वीज, कचरा, वाहतूक कोंडी अशा सर्वसाधारण समस्यांनीच शहरे ग्रासलेली आहेत. त्यांचे निराकरण करायचे असेल तर पक्षबिक्ष या बाबी अलाहिदा; कोणत्याही दबाव, दडपणाना बळी न पडता निकोप मनाने कार्यक्षम, प्रामाणिक व धडाडीचे लोकप्रतिनिधी निवडले गेले पाहिजेत, तरच ते आपल्या शहराला न्याय देऊ शकतील. आपण जो लोकप्रतिनिधी निवडू, तो किमान आपल्या प्रभागाच्या समस्या सोडवू शकेल का, अडीअडचणीच्या वेळेला आपल्या पाठीशी उभा राहील का, याचा विचार करून, कोणत्याही दबावापुढे न झुकता आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून आपला मताधिकार बजावावा व कार्यक्षम लोकप्रतिनिधी निवडून आणावेत हीच अपेक्षा.