अंतिम चित्र स्पष्ट; भाजप-काँग्रेस-आपमध्ये चुरस; उमेदवारांकडून प्रचाराला वेग; जाहीर सभांचेही आयोजन; 9 एप्रिलला मतदान
गोवा विधानसभेच्या फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार असल्याचे काल स्पष्ट झाले. या पोटनिवडणुकीसाठी 9 एप्रिल रोजी मतदान होणार असून, भाजपतर्फे रितेश नाईक, काँग्रेसकडून केतन भाटीकर व आपतर्फे गितेश नाईक हे रिंगणात उतरले आहेत. या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होत आहे.
फोंडा मतदारसंघातील समस्या सोडविण्याचे आश्वासन प्रत्येक उमेदवार देत आहे; पण मागील इतिहास पाहता काही समस्या अजूनपर्यंत सुटलेल्या नाहीत. फोंडा मतदारसंघात विकासकामांना चालना देण्यासाठी दूरदृष्टी असलेल्या स्व. रवी नाईक सतत प्रयत्न केला. रवी नाईक यांच्या निधनामुळे मतदारांना पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागत आहे.
या पोटनिवडणुकीत आखाड्यात उतरलेल्या तिन्ही उमेदवारांनी प्रचाराला सध्या जोर दिला आहे. पुढील काही दिवसांत जाहीर सभांचे आयोजन सुद्धा होणार आहे.
फोंडा मतदारसंघात मलनिस्सारण प्रकल्पाचे काम 2015 साली पासून सुरू आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाले तरी अधिकांश घरांना अजूनपर्यंत जोडणी देण्यात आलेली नाही. प्रकल्प सुरू झाल्यास मतदारसंघातील नाल्यांची स्थिती सुधारणार आहे.
फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात आवश्यक सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना गोमेकॉत पाठविण्यात येते. गेल्या काही वर्षांपासून स्थानिक लोक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करीत असले तरी सरकारने अजूनपर्यंत गांभीर्याने विचार केलेला दिसून येत नाही. त्यामुळे पोटनिवडणुकीत उपजिल्हा इस्पितळात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रचार उमेदवार करीत आहे. त्यामुळे आता मतदार कोणाला कौल देतात त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
काँग्रेसला आरजीपी व गोवा फॉरवर्डची साथ
फोंडा पोटनिवडणुकीत रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष (आरजीपी) आणि गोवा फॉरवर्ड या दोन्ही पक्षांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. मतविभाजन टाळण्यासाठी या दोन्ही पक्षांनी पोटनिवडणुकीत उमेदवार उभे न करण्याचा घेतला होता. गोवा फॉरवर्डच्या तुलनेत फोंड्यात आरजीपीची ताकद जास्त आहे.
भाजपला मगोचा पाठिंबा
फोंड्याच्या पोटनिवडणुकीत सत्तेत सहभागी असलेल्या मगो पक्षाचा पाठिंबा लागला आहे. ही पोटनिवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मंत्री तथा मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. तसेच ही पोटनिवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले होते. परिणामी मागील विधानसभा निवडणुकीत मगोकडून निवडणूक लढलेले केतन भाटीकर यांनी मगोला रामराम ठोकत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि उमेदवारीही मिळवली.