Home Featured पणजी वगळता अन्य भागांतील पेट्रोलपंपांवरील गर्दी ओसरली

पणजी वगळता अन्य भागांतील पेट्रोलपंपांवरील गर्दी ओसरली

0

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचा विपरित परिणाम भारताला होणाऱ्या इंधन पुरवठ्यावर झाला आहे. एकीकडे स्वयंपाकाच्या गॅससाठी वितरण एजन्सींसमोर रांगा लागल्या आहेत, तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेलसाठी पेट्रोलपंपांसमोरही रांगा लागल्याचे चित्र बुधवारपासून पाहायला मिळाले होते. बुधवारी रात्री उशिरापर्यंत पेट्रोलपंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, तर काही पेट्रोलपंप इंधनाअभावी बंद पडले होते. यानंतर काल देखील सकाळपासून राजधानी पणजी शहरातील विविध भागांतील पेट्रोलपंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाळपई, पेडणे या भागात किंचित गर्दी दिसून आली, तर फोंडा, डिचोली, म्हापसा, मडगाव आणि वास्को भागांत पेट्रोलपंपांवर गर्दी नसल्याचे चित्र होते.

पेट्रोल टंचाईच्या अफवेमुळे पणजी शहरातील पेट्रोलपंपावर वाहनचालकांची बुधवारपासून गर्दी दिसून आली. वाहनचालकांकडून वाहनांच्या टाक्या फुल्ल केल्या जात असल्याने पेट्रोलपंपांवरील पेट्रोलचा साठा लवकर संपत आहे. बुधवारी मध्यरात्रीपर्यंत पेट्रोलपंपावर वाहन चालकांनी गर्दी केली होती. तसेच गुरुवारी सकाळपासून वाहनचालकांच्या पेट्रोलपंपावर रांगा लागलेल्या होत्या. पणजीतील दोन पेट्रोलपंपावरील पेट्रोलचा साठा संपल्याने नवा इंधनसाठा येईपर्यंत ते बंद ठेवण्यात आले होते. दुपारनंतर पेट्रोलचा साठा आल्यानंतर पेट्रोलची विक्री पुन्हा सुरू झाली.
पराज्यात बुधवार 25 मार्चपर्यंत सुमारे आठ दिवस पुरेल एवढा पेट्रोलचा साठा होता. बुधवारी रात्री इंधन घेऊन येणारे जहाज मुरगाव बंदरात दाखल झाल्याने आता पेट्रोलचा साठा 15 दिवसांवर पोहोचला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पेट्रोलप्रश्नी घाबरून जाऊ नये, असे ऑल गोवा पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष नरहर ठाकूर यांनी सांगितले.
पेट्रोल टंचाईच्या अफवेमुळे पेट्रोल पंपावरील पेट्रोलची विक्री वाढल्याने पेट्रोल लवकर संपत होते. त्यामुळे नवीन पेट्रोलचा साठा येईपर्यंत पेट्रोलपंप बंद ठेवावे लागत होते. वाहनचालकांनी पेट्रोल खरेदीसाठी गर्दी करण्याचे कोणतेही कारण नाही, असेही नरहर ठाकूर यांनी सांगितले.

चिंतेचे कारण नाही : पेट्रोलपंप मालक
पेट्रोल-डिझेलची टंचाई होणार असल्याच्या भीतीमुळे राज्यात सर्वत्र पेट्रोलपंपांवर वाहनचालकांच्या रांगा लागत असतानाच काल पणजीतील पेट्रोलपंपांच्या मालकांनी दै. नवप्रभाशी बोलताना राज्यातील वाहनचालकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.

येथील कंटक पेट्रोलपंपचे मालक अनुप कंटक म्हणाले की, तसे पहायला गेल्यास घाबरून जाण्यासारखी स्थिती सध्या तरी नाही. पश्चिम आशियातील युद्धजन्य स्थितीमुळे देशातील पेट्रोलिएम कंपन्या सध्या नियंत्रितपणे पेट्रोल, डिझेल आदीचा पुरवठा करीत असल्या तरी पुरवठा खंडित झालेला नाही. थोडी फार अडचण होत आहे. पण ती चिंता करण्यासारखी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्याकडे मागील दोन दिवस पेट्रोलचा किंचित तुटवडा होता. मात्र डिझेल उपलब्ध असल्याचे त्यानी सांगितले. वाहनचालक तुटवडा निर्माण होण्याच्या भीतीपोटी गाड्यांच्या टाक्या पूर्णपणे भरून नेऊ लागल्यानेच पंपांवर पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होत आहे व पुढेही होण्याची शक्यता असल्याचे अनुप कंटक म्हणाले.

राज्यात 15 दिवस पुरेल इतका पेट्रोल साठा
वाहनचालकांनी पेट्रोलटंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. राज्यात 15 दिवस पुरेल इतका पेट्रोलचा साठा उपलब्ध झालेला आहे, अशी माहिती ऑल गोवा पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष नरहर ठाकूर यांनी काल दिली.

राजधानीतील पेट्रोलपंपावर अधूनमधून थोड्या काळासाठी पेट्रोल टंचाई होत असली तरी ती चिंतेची बाब नाही. बहुतांश पेट्रोल पंपावर 12 हजार लीटर पेट्रोल व डिझेलचा एकत्रित साठा येत असतो. तो तीन दिवस आरामात पुरतो. मात्र, आता इंधनटंचाईच्या अफवेमुळे लोक गर्दी करून एकाच वेळी खरेदीसाठी येत असल्याने व टाक्या भरून जात असल्याने हा साठा आता एकाच दिवसात संपत असतो. जी टंचाई निर्माण होत आहे त्याला ग्राहकांची ही मानसिकता जबाबदार असल्याचे पंपमालकांनी सांगितले.