फोंडा पालिकेकडून क्रांतिमैदान सुशोभीकरणास परवाना नाही

0
81

क्रांतिमैदानाच्या विषयावर काल फोंडा पालिकेने घेतलेल्या तातडीच्या बैठकीत सुशोभीकरण करण्यासाठी परवाना न देण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, नव्याने आराखडा पालिकेकडे परवान्यासाठी आला तर तो स्वातंत्र्य सैनिक, तसेच ज्या संस्था संघटनांनी सुशोभीकरणास विरोध दर्शविला होता, त्यांच्यासमोर तसेच फोंड्यातील नागरिकांसमोर ठेऊन नंतर परवाना देण्याचा ठराव झाला. तो ९ विरुद्ध ५ मतांनी संमत करण्यात आला.
क्रांतिफैदानाच्या सुशोभीकरणात भ्रष्टाचार : कॉंग्रेस; दक्षता खात्याकडे तक्रार
फोंडा येथील क्रांती मैदानाच्या सुशोभीकरणाचे जे काम सुरू आहे त्यात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप काल कॉंग्रेसने केला. यासंबंधी कॉंग्रेसने दक्षता खात्याकडे तक्रार केली असल्याचे यासंबंधी माहिती देताना पक्षाचे प्रवक्ते दुर्गादास कामत म्हणाले.
या मैदानाच्या सुशोभीकरणाच्या कामाचा अंदाज खर्च हा ३ कोटी ६३ लाख रु. एवढा होता. प्रत्यक्षात मात्र आता त्यावर ४ कोटी २६ लाख रु. एवढा खर्च करण्यात येत असून तो १७ टक्के एवढा जास्त आहे. ही स्थानिक निविदा असताना हे कंत्राट राज्याबाहेरील म्हणजेच उडुपी येथील कंत्राटदाराला देण्यात आलेले असून ही गोष्ट आक्षेपार्ह असल्याचे ते म्हणाले. मैदानावर मगो पक्षाचे चिन्ह असलेल्या सिंहाच्या प्रतिकृती बसवण्यात येत असून ही कृतीही अयोग्य आहे. शिवाय प्रत्येक सिंहाच्या प्रतिकृतीवर १८ लाख रु. खर्च करण्यात येत असून हा खर्च खूपच जास्त असल्याचा दावा कामत यांनी केला. हे सार्वजनिक मैदान असल्याने तेथे सिंहाच्या प्रतिकृती बसवण्यात येऊ नयेत, असे कॉंग्रेसचे म्हणणे असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, फोंडा नगरपालिकेने या मैदानावर लाद्या घालण्यासाठीच परवानगी दिलेली असून सुशोभिकरणासाठी ती दिलेली नसल्याचे कामत म्हणाले. कॉंग्रेसने यासंदर्भात दक्षता खात्याकडे भ्रष्टाचाराची जी तक्रार केलेली आहे त्याबाबत त्यांनी चौकशी करावी, अशी मागणीही कामत यांनी केली आहे.