फखरची झुंज व्यर्थ; पाक पराभूत

0
150

>> दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ अशी बरोबरी

सामनावीर ठरलेल्या लढवय्या फखर झमान याने केवळ १५५ चेंडूंत १८ चौकार व १० षटकारांसह चोपलेल्या १९३ धावांनंतरही पाकिस्तानला दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून १७ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. यजमानांनी विजयासाठी समोर ठेवलेल्या ३४२ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला ९ बाद ३२४ धावांपर्यंतच पोहोचता आले.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून द. आफ्रिकेला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. परंतु, त्याचा निर्णय गोलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही. मार्करम व डी कॉक यांनी यजमानांना ५५ धावांची सलामी दिली. अतिआक्रमकता दाखवण्याच्या नादात मार्करम पहिल्या गड्याच्या रुपात परतला. डी कॉक व कर्णधार बवुमा यांनी दुसर्‍या विकेटसाठी ११४ धावा जोडत डावाला स्थिरता आणली. २६वे एकदिवसीय अर्धशतक झळकावून १६वे शतकाकडे वाटचाल करत असताना रौफने डी कॉकचा वैयक्तिक ८० धावांवर त्रिफळा उडवला. कर्णधार तेंबा बवुमादेखील शतकाच्या बाबतीत दुर्देवी ठरला. केवळ आपला आठवा एकदिवसीय सामना खेळणारा बवुमा दुसर्‍यांदा ‘नव्वदीत’ बाद झाला. त्यापूर्वी त्याने रस्सी वेंडर दुसेनसह तिसर्‍या गड्यासाठी १०१ धावा जोडल्या. रस्सीने टी-ट्वेंटाला साजेशी फलंदाजी करत अवघ्या ३७ चेंडूंत ६० धावा कुटल्या. मागील सामन्यात शानदार शतक झळकावलेल्या रस्सीचे हे आठवे एकदिवसीय अर्धशतक ठरले. संघातील सर्वांत अनुभवी मिलर याने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत पाकिस्तानी गोलंदाजांना झोडपून काढले. अवघ्या २७ चेंडूंत नाबाद ५० धावा कुटत त्याने संघाला ३४१ धावांपर्यंत पोहोचवले. १३४ सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या मिलरचे हे १६वे एकदिवसीय अर्धशतक ठरले.

दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी समोर ठेवलेल्या ३४२ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने ठराविक अंतराने गडी गमावले. फखरने एक टोक सांभाळून धरले. शतक होईपर्यंत त्याने शंभरच्या स्ट्राईकरेटने धावा केल्या. यानंतर मात्र त्याने गियर बदलत यथेच्छ धुलाई केली. आपल्या दुसर्‍या एकदिवसीय द्विशतकापासून मात्र केवळ सात धावांनी तो दूर राहिला. विशेष म्हणजे झमान व्यतिरिक्त पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकाच्यादेखील जवळपास जाता आले नाही. इतर फलंदाजांची अपेक्षित साथ न लाभल्याने फखरचे प्रयत्न थोडक्यात अपुरे पडले.

धावफलक
दक्षिण आफ्रिका ः क्विंटन डी कॉक त्रि. गो. रौफ ८० (८६ चेंडू, १० चौकार, १ षटकार), ऐडन मार्करम झे. आसिफ गो. फहीम ३९, तेंबा बवुमा झे. बाबर गो. रौफ ९२ (१०२ चेंडू, ९ चौकार), रस्सी वेंडर दुसेन झे. फहीम गो. हसनैन ६० (३७ चेंडू, ६ चौकार, ४ षटकार), डेव्हिड मिलर नाबाद ५० (२७ चेंडू, ३ चौकार, ३ षटकार), हेन्रिक क्लासें झे. रौफ गो. शाहीन ११, आंदिले फेहलुकवायो झे. फहीम गो. रौफ ३, कगिसो रबाडा नाबाद १, अवांतर ५, एकूण ५० षटकांत ६ बाद ३४१
गोलंदाजी ः शाहीन शाह आफ्रिदी १०-१-७५-१, मोहम्मद हसनैन १०-०-७४-१, फहीम अश्रफ ९-०-६२-१, हारिस रौफ १०-०-५४-३, शादाब खान ९-०-६४-०, दानिश अझिझ २-०-११-०
पाकिस्तान ः इमाम उल हक झे. मार्करम गो. एन्गिडी ५, फखर झमान धावबाद १९३ (१५५ चेंडू, १८ चौकार, १० षटकार), बाबर आझम झे. बवुमा गो. नॉर्के ३१, मोहम्मद रिझवान झे. क्लासें गो. नॉर्के ०, दानिश अझिझ झे. डी कॉक गो. नॉर्के ९, शादाब खान पायचीत गो. शम्सी १३, आसिफ अली झे. मार्करम गो. फेहलुकवायो १९, फहीम अश्रफ झे. डी कॉक गो. फेहलुकवायो ११, शाहीन शाह आफ्रिदी झे. व गो. रबाडा ५, हारिस रौफ नाबाद १, मोहम्मद हसनैन नाबाद १२, अवांतर २५, एकूण ५० षटकांत ९ बाद ३२४
गोलंदाजी ः कगिसो रबाडा १०-२-४३-१, लुंगी एन्गिडी ९-०-६६-१, आंदिले फेहलुकवायो १०-०-६७-२, ऍन्रिक नॉर्के १०-१-६३-३, तबरेझ शम्सी ७-०-६०-१, ऐडन मार्करम ४-०-१६-०