कोरोना लसीकरणासाठी नागरिकांत निरुत्साह

0
184

>> रविवार असूनही अल्प प्रतिसाद

गोव्यातील लोकांनी कोविडवरील लस टोचून घेण्यासाठी निरुत्साह दाखवलेला दिसून येत आहे. राज्यातील एकाही आरोग्य केंद्रावर ही लस टोचून घेण्यासाठी गर्दी उसळल्याचे चित्र अद्यापही पहावयास मिळालेले नाही.

गेल्या १ एप्रिलपासून राज्यात ४५ वर्षांवरील लोकांना लस देण्यास सुरूवात करण्यात आलेली असून लोकांकडून मात्र ही लस टोचून घेण्यास अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र गोवाभरात पहावयास मिळत आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी लस टोचून घेता यावी यासाठी काल लस देण्यासाठी सर्व आरोग्य केंद्रे व इस्पितळात लस देण्याची सोय केली होती. मात्र कालही या लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद दिला. रविवारी दिवसभरात गोमेकॉत केवळ ४४ जणांनी कोविडसाठीची लस टोचून घेतली.काही आरोग्य केंद्रांत अत्यल्प प्रतिसाद लक्षात घेऊन लसी खराब होऊ नयेत यासाठी युवकांनाही लस टोचली.

नावनोंदणी स्थगित
कोविड योद्ध्यांच्या नावे लसीकरणासाठी भलतेच लोक पुढे येत नावनोंदणीद्वारे लस टोचून घेऊ लागल्याचे दिसून आल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना कोविड योद्ध्यांसाठीची नावनोंदणी तूर्तास स्थगित ठेवण्याचा आदेश दिला आहे.