प्रेरक

0
29
  • – मीना समुद्र

हा चिमुकला पक्षी त्या पक्ष्याच्या कुळातला, जातीतलाही वाटत नव्हता. तरी त्याने इतक्या प्रेमाने त्याची भूक जाणून त्याच्याशी वर्तन केलं. नाहीतर आपण माणसं…! आपल्या जड झालेल्या आईबापाला त्यांच्या इस्टेटी, जन्मभरची कमाई हडप करून त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतो.

पक्ष्यांना आपण स्वर्गीचे दूत मानतो. स्वर्गधरेमधला तो एक अतिशय कोमल रेशिमबंध आहे, दुवा आहे. त्यांची इवली-इवली हालचालही आपले मन वेधून घेते, आणि त्यांची किलबिल, त्यांचे कुहूकणे, त्यांचा मंजूळ आवाज कानांची असोशी वाढवतो. पक्षी भित्रे असतात, चंचल असतात. त्यांना स्वातंत्र्य हे इतर कशाहीपेक्षा प्रिय असते. म्हणून तर पिंजर्‍यातला बंदिस्त पोपट ‘भाऊ भाऊ बोलतोस गोड, देतोस फोड, हळूच नेऊन मला रानात सोड’ असे पेरूची फोड भरवणार्‍या मुलाला सांगतो.

मुक्तता, मोकळेपणा हा कुठल्याही प्राण्याप्रमाणे त्यांनाही प्रिय असतो. स्वसंरक्षणाबाबत ते सतत अतिशय सावध, सतर्क, दक्ष असतात. त्यामुळेच एवढीशी चिमणीही अंगणात पडलेला दाणा खाताना मान वेळावून-वेळावून सगळीकडे पाहत असते. एवढ्याशा, अगदी हलक्याच्या चाहुलीनेही ती पटकन उडून जाते. कापूसकाळ्या चिंध्या वेचून पक्षी पिलांसाठी उबदार घरटी बांधतात. त्यांच्यातली एकतानता आणि काळीजमाया दिसते. पिलांसाठी चारापाणी आणायला दूर जाताना त्यांची उलघाल दिसते. ‘घार हिंडते आकाशी, तिचे चित्त पिलांपाशी’ अशी त्यांची अवस्था असते. त्यामुळे सतत त्यांना सतर्क राहावे लागते.
पोटाची भूक आणि पिलांना जन्म देणे एवढ्यापुरत्याच पक्ष्यांच्या नैसर्गिक प्रेरणा मर्यादित नसतात. आपल्याला वाटते तसे त्यांचे जीवन गाणी गात, भरारी मारण्यात- फक्त मनमौजी निश्‍चितच नाही. त्यांच्याही इवल्या काळजात पिलांची काळजी असते आणि त्यांच्या संवर्धनाच्या जबाबदारीची पूर्ण जाणीव असते. पिलाला पहिल्यांदाच उडायला शिकविणार्‍या एका पक्षिणीची घालमेल आणि शिस्त आम्ही एकदा पाहिली होती. झाडावरच्या घरट्यातून तिने थोड्या घाबरलेल्या, बावरलेल्या पिल्लाला ढकलले आणि ते पिल्लू पंख उघडून तरंगले. पण अजाणतेपणाने एकदम घाबरून खालच्या फांदीवर जाऊन घट्ट चिकटून बसल्यासारखे थरथरत बसले. पक्षीण त्याच्याजवळ आली आणि किलबिलाट करून त्याला उडायला सांगू लागली (असावी). पण ते पाखरू केविलवाणेपणे तिच्याकडे बघत राहिले तेव्हा चोनचार घिरट्या घालून ती त्याच्याजवळ आली. त्याच्या पिसात चोच खुपसून त्याला धीर दिला आणि तरी ते ढिम्म बसून राहिल्यावर मात्र तिने त्याला पुन्हा ढकलले. ते पिल्लू एकदम खालच्या मातीवर पडले. त्याला थोडा आधार वाटला असावा. लटपटते पाय स्थिर झाल्यावर त्याने इकडे-तिकडे टुण्‌टुण् उड्या मारल्या आणि पंख झटकले. मग पंखात हवा भरल्याचे त्याला भान आले असावे. पक्षिणीने त्याच्या मानेवर, डोक्यावर, पंखावर प्रेमाने चोच घासली आणि वरच्या फांदीवर झेप घेतली. तिथून त्याला ती बोलावू लागली. पाखरू आता थोडे सावरले होते. त्याने पंखांची उघडमीट केली. आपल्यातल्या स्वयंचलित चेतनायंत्राची त्याला कल्पना आली असावी. त्याने अंग फुलविले, पंख पसरले आणि त्याची माय बसली होती तिथे झेप घेतली. मग त्याला तो खेळ आवडला. त्याचाच चाळा लागल्यासारखा दोनतीनदा जमिनीवर येऊन त्यानं पुन्हा फांदीवर झेप घेतली. त्याच्या उडण्याची खात्री झाली तशी पक्षीण वरच्या फांदीवरच्या घरट्याच्या तोंडाशी बसून त्याला वर बोलावू लागली. आपल्या भाषेत त्याला धडे देऊ लागली. मग या फांदीवरून त्या फांदीवर असं टप्प्याटप्प्याने उडत-बसत ते पाखरू आईच्या कुशीत शिरलं. गच्चीवरून अतिशय उत्सुकतेनं आम्ही हा खेळ पाहिला आणि आमची संध्याकाळ तरल, रंगीत होऊन गेली.

सापासारखा एखादा विजातीय शत्रू किंवा सजातीय शिकारी पक्षीही जेव्हा आजूबाजूला असल्याचा सुगावा लागतो तेव्हाचा पक्ष्यांचा चिवचिवाट, किलबिलाट, कर्कश कावकाव म्हणजे आपल्या बंधुबांधवांना सावधगिरीची सूचना असते. शेजारच्या बागेतून असा आवाज आला तेव्हा घरटी असलेल्या झाडाच्या आसपास साप सळसळत असलेला आम्ही पाहिला आहे. एका जखमी कोकिळेला मात्र कावळ्यांनी कोंडाळ्यात पकडून कावकाव चालवली होती, तेव्हा ते तिला दूर हुसकून लावत आहेत असे वाटले होते. तिला त्यांनी इजा करू नये, चोची मारू नयेत म्हणून कावळ्यांना हुसकून तिला दोन दिवस घरात आणून मुलांनी दवापाणी केले होते. वडाची लालचुटूक फळं आणून ती तिच्यापुढे ठेवल्यावर ती कशी गपागपा गिळत होती हे पाहून त्यांना खूप गंमतही वाटली होती. ती बरी झाल्यावर बाल्कनीतून उडून गेली तेव्हा हायसे झाले. मुलांना प्रथम थोडे निराश वाटले तरी ती तिच्या घरी जाईल म्हणून बरेही वाटले.

या सगळ्या आठवणींना कारणीभूत झाला तो अशाच एका पक्ष्याचा व्हॉट्‌सऍपवर प्रसारित झालेला व्हिडिओ. अगदी हिरवंगर्द रान. त्या हिरवाईच्या पार्श्‍वभूमीवर मध्येच या झाडापासून त्या झाडापर्यंत गेलेल्या वाळक्या वेलीच्या वेणीसारख्या वळलेल्या फांदोर्‍यांनी जणू एक सेतू तयार केलेला. आणि त्या फांदोर्‍यांच्या मध्यावर एक पक्षी बसलेला. गुब्बा गुब्बा, वरून काळा आणि पोटाशी कबरी पिसं असलेला. फांदीला घट्ट धरलेला पायाचा पुढचा थोडा भाग. त्याला काही जखम झाली होती की त्याचे पाय फांदोर्‍यात फसले होते, काही कळत नव्हते. पण त्याला काहीतरी इजा झाली असावी. उडताही येत नसावं. अगदी केविलवाणा, हताश होऊन तो कबुतरासारखा पक्षी तिथं बसलेला. तेवढ्यात एक चिमणासा पक्षी चोचीत एक भुंग्यासारखा दिसणारा काळा किडा घेऊन आला. त्याच्या या अंगावरून डोक्यावर बसला. मग त्या अंगाला उडी मारली. पुन्हा डोक्यावर बसला. मध्येच एकदा शेपटाकडे गेला. पुन्हा उडी मारून पाठीवर आला. मग पुढे येऊन त्याच्याजवळ बसला आणि त्या भुकेल्या अगतिक पक्ष्याच्या चोचीत त्याने तो घास भरवला. पुन्हा डोक्यावर, पाठीवर असं उडताना तो त्याला कुठं काही लागलंय का हे अजमावत होता की काय कोण जाणे! पण त्या घुटुर्रघुम् पक्ष्याच्या आकाराच्या मानाने तो अगदी चिमणा, एक चतुर्थांश दिसणारा हा पक्षी खूपच धावपळ करत होता. मध्येच तो किडा चोचीतून खाली पडताना आपल्या चोचीत झेलून, घट्ट धरून त्याला स्वतः तुकडे करून खाऊ देत होता असे वाटले. पुन्हा तो किडा खाली पडल्यावर त्यानं जमिनीवर झेप घेतली. आपल्या आजारी बापाची किंवा आजोबांची काळजी त्याच्या मुलानातवानं घ्यावी तसं ते दृश्य वाटलं… अतिशय हृदयंगम!
हा चिमुकला पक्षी त्या पक्ष्याच्या कुळातला, जातीतलाही वाटत नव्हता. तरी त्याने इतक्या प्रेमाने त्याची भूक जाणून त्याच्याशी वर्तन केलं. नाहीतर आपण माणसं…! वृद्धाश्रमात अचानक आपल्या आजीला पाहून रडणार्‍या एका बालिकेचा व्हिडिओही होताच ना नुकताच पाहिलेला. आपल्याला नकोसे झालेले आईबाप, आपल्याला जड झालेले नातेवाईक… त्यांच्या इस्टेटी, जन्मभरची कमाई हडप करून त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतो किंवा रस्त्यावर अक्षरशः कचर्‍याच्या पेटीपाशी टाकून देतो. पण सेवाभावी संस्था, माणसे त्यांना आधाराचा हात देतात, माणुसकीचे दर्शन घडवतात.

माणसाइतका स्वार्थी जगात कोणी नाही. पक्ष्यांची अंडी घरट्यातून काढणं, त्यांची शिकार करणं, पिंजर्‍यात डांबणं अशा गोष्टी तो करत असतो; पण त्यांचं सुरेल संगीत, स्वच्छंद भरारी, झळाळते रंग, मुलायम स्पर्श, बारीकसारीक मनोरम हालचाली, गूढरम्य जीवन, सृष्टिचक्रातील त्यांचे स्थान जाणण्याचा प्रयत्न करतात ते पक्षिमित्र, पक्षिनिरीक्षक! यांची मात्र कमाल वाटते. पक्ष्यांचा व्हिडिओ अतिशय संयमाने, धीराने, कौशल्याने आणि खूप काळवेळ खर्च करून तयार करावा लागतो, तोही मनोरंजनासाठी, काही महत्त्वपूर्ण निरीक्षणांच्या नोंदीसाठी, अभ्यासासाठी आणि निसर्गचक्रातले त्यांचे महत्त्वपूर्ण स्थान जाणण्यासाठी. पक्ष्यांतील संवेदनशीलता आणि त्यांची करुणाशील मानसिकता व्यक्त करणारा असा व्हिडिओ मनुष्यजातीसाठीही काही संदेश घेऊन येतो, त्याला प्रेरक होतो हे मात्र नक्की! करुणा, प्रेम, सहृदयता यांचे दर्शन घडविणार्‍यांना सलाम!