‘प्राणाचार्य’ दादा वैद्य व कोट्टकलचे ‘वैद्यरत्नम्’ वरियार

0
1427

केरी-फोंडा गावचे प्रसिद्ध धन्वंतरी प्राणाचार्य दादा वैद्य व कोट्टकल-केरळचे वैद्यरत्नम् पन्नियन पव्ली शंकुनी वरियर हे गेल्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात भिष्गवर्य. ज्या काळी वाहतुकीची आधुनिक साधने नव्हती, प्रसारमाध्यमे नव्हती, त्यावेळी गोव्यापासून आठशे कि.मी. अंतरावर असलेल्या केरळमध्ये दादा वैद्यांशी विलक्षण साम्य असलेली, तशाच प्रकारे काम करणारी व्यक्ती घडावी हे आश्‍चर्यकारक आहे.

वरियर हे कोट्टकल-केरळ येथील धन्वंतरी, तर दादा वैद्य हे गोव्याचे भिष्गवर्य. वरियरना ७५ वर्षे व दादा वैद्यांना ८९ वर्षांचे आयुष्य लाभले. दोघेही समकालीन होते. दोघांचीही तीन मजली वाड्यासारखी प्रचंड मोठी घरे होती व आजही आहेत. दोन्ही ठिकाणे निसर्गरम्य अशा परिसरात. सुपारी, नारळ, केळी, मिरीच्या बागा जवळपास. दोघेही पंचवीस-तीस लोकांच्या एकत्र कुटुंबात वाढले, सुसंस्कारित झाले. वरियरनी १९०२ साली आयुर्वेदिक औषधे निर्माण करण्याकरिता कारखाना काढला. पूर्वी काढा करणे, पुड्या बांधणे, वनौषधी कुटणे आदी वेळकाढू जिकिरीची कामे रोग्याला वा इतरांना करावी लागत, पण वरियर गुरुकुल पद्धतीने आयुर्वेद शिकले. पाठशाळा काढली. पुढे तिचे रूपांतर कॉलेजमध्ये करून कालिकत युनिव्हर्सिटीशी संलग्न केले. आज त्यांनी स्थापन केलेल्या आर्य वैद्यशाळेचा प्रचंड विस्तार झाला असून संस्थेतर्फे पाच इस्पितळे, वीस शाखा, १२०० अधिकृत वैद्य, काष्ठौषधी बाग, दोन हजार एकर, संशोधन व विकास केंद्र, तसेच पुस्तक प्रकाशन केंद्राची स्थापना केलेली आहे.
आर्य वैद्यशाळेची भारतभर तसेच विदेशांत केंद्रे आहेत. दोन वर्षांपूर्वी मी मस्कत, ओमनमध्ये शोहर नावाच्या छोट्या शहरात मुलाकडे काही दिवस राहायला गेलो होतो, तिथेसुद्धा आर्य वैद्यशाळेचे वैद्य व औषधालय होते. वरियरचे कार्य हे वैद्यकीय क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते. ते उत्तम वैद्य, विद्वान कवी-नाटककार, संगीतकार, उद्योजक, दानशूर गृहस्थ होते. त्यांनी ‘धन्वंतरी’ मासिक काढले. आयुर्वेद वैद्य समाजाची स्थापना करून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी ते वार्षिक संमेलने घेऊ लागले. ‘अष्टांग शरीरम्’ हे पुस्तक संस्कृतच्या आधारावर मल्याळम्‌मध्ये लिहिले. वरियरना संतान नव्हते. वयाच्या ३७ व्या वर्षी १९०७ मध्ये त्यांची पत्नी गरोदर राहिली होती. वंशाचा दिवा पेटणार असे वाटत होते, पण जन्मतः मूल निष्प्राण निपजले. याच दुःखाने थोड्यांच दिवसांत तिने प्राण सोडला.
दादांनासुद्धा मूल नव्हते. १८९० साली दादांच्या पत्नी सरस्वतीबाई गरोदर राहिल्या, पण मूल आडवे आल्याने तीव्र प्रसूतीवेदना झाल्या. जन्मलेले बाळ अल्पजीवी ठरले. केवळ सोळा दिवस जगले. दादांनी किंवा वरियरनी याची खंत बाळगली नाही. आपल्या चुलत भावाची मुले हीच आपली मुले मानली. दादांनी पुतण्याला दत्तक घेतले. दादा अर्ध्या इस्टेटीचे मालक असले तरी घरातील बारा पुरुष मंडळींना समान वाटणी करून दिली. वरियरनीसुद्धा आपल्या संपत्तीची वाटणी पुतण्यांमध्ये केली. तसेच मोठा वाटा गरिबांसाठी, दानधर्मासाठी दिला.
दादा व वरियर चांगले साहित्यिक होते, नाटककार होते. स्थानिक कलाकारांना वाव मिळावा म्हणून त्यांनी नाटक कंपनी काढली. अनेक ठिकाणी नाट्यप्रयोग केले. दादांनी ‘मृत्युंजय’ नावाचे नाटक लिहिले होते. दादांचे साहित्य- काव्य तरंगिणी, प्रबोध सुधाकर, प्रकृती-विकृती, प्राचीप्रभा, हळदकुंकू, पथ्यबोध व कुंपणाने शेत खाल्ले असे अनेक स्फूट लेख.
वरियरनी मल्याळम् नाटकाला ऊर्जितावस्था आणली. त्यांनी संस्कृत ‘शाकुंतल’चे मल्याळममध्ये भाषांतर केले. त्यांनी काशीघाट, स्मशानघाट, हरिश्‍चंद्र चरित्र व पुराणकथांवर आधारित अनेक नाटके लिहिली. उन्हाळ्यात काष्ठौषधीचे काम कमी असल्याने कर्मचार्‍यांना पूर्ण काम नसे. यास्तव कर्मचार्‍यांना घेऊन नाटके बसवली. आवडीनुसार संगीत पदे घातली. उत्तरेकडच्या संगीताची आवड लक्षात घेऊन तिकडचे संगीत दिग्दर्शक आणले. वरियरमुळेच मल्याळम् रंगमंचाला चांगले दिवस आले. त्यांनी तिरूर, कालिकत, कोचीन, त्रावणकोर, मलबार आदी ठिकाणी, तसेच तामीळमध्येसुद्धा नाटके सादर करून वाहवा मिळवली.
दादांनी मित्रांच्या सहकार्याने (मुख्यतः सीताराम केरकर व विनायक सरज्योतिषी) १९११ साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर गोवा विद्याप्रसारक मंडळाची स्थापना करून शैक्षणिक प्रसारास सुरुवात केली. आज या संस्थेचा वटवृक्ष झालेला असून संस्थेच्या आधिपत्याखाली ए. जे. द. आल्मेदा हायस्कूल (पूर्वीचे कॉलेज आंतोनिय जुझे द आल्मेदा), के. जी. अँड प्रायमरी स्कूल, अगियार हायर सेकंडरी, बांदोडा येथील राजे सौंदेकर, बोरी येथील प्रगती, खांडेपार येथील खांडेपारकर, सावईवेरे येथील शेट्ये आदी विद्यालये तसेच रायतुरकर कॉलेज ऑफ कॉमर्स, दादा वैद्य कॉलेज ऑफ एज्युकेशन अशी अनेक विद्यालये येतात.
वरियरनी पण १९०७ साली विजयादशमीच्याच सुमुहूर्तावर आर्य शाळेची स्थापना केली. आजपर्यंत आर्य वैद्यशाळेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. जगभर औषधालये व तज्ज्ञ वैद्य आहेत. आर्य वैद्यशाळा स्थापन केल्यावर सर्वप्रथम नोकरीवर घेतलेल्या व्यक्तीचे नाव होते चेरियन विट्टील कन्हुनी. त्याच तोडीचा दुसरा कामगार चिन्मय मेनन. त्याने म्हातारपणातसुद्धा इमानेइतबारे नोकरी केली. वरियरांचा त्यांच्यावर पूर्ण विश्‍वास होता. त्यांचे अनेक सत्कार केले गेले. वरियर इहलोक सोडून गेल्यावर चिन्मय मेननने नोकरी सोडली व कोट्टकलही सोडले व परत कधीच तो कोट्टकलला आला नाही.
वरियरना जसे जिवापाड प्रेम करणारे सेवक लाभले तसेच दादांना पण मिळाले. १९०५ च्या दरम्यान दादांनी औषधालय (हिंदू फार्मसी) विकत घेतले. सुरुवातीस हे औषधालय नुकसानीत चालत होते. त्याच काळात नगरगाव सत्तरीतील वासुदेव बळवंत दामले नावाचे सुशिक्षित गृहस्थ मलेरियावर औषधोपचार करून घेण्यासाठी दादांकडे आले होते. एक वर्षाच्या उपचारानंतर ते सुधारले व दादांच्या सांगण्यावरून दामले आपल्या घरी न जाता पणजीला फार्मसीत काम करू लागले. ते नाममात्र वेतन घेत. प्रामाणिकपणे व चिकाटीने काम करून कर्जाचा शेवटचा हप्ता फिटल्यावर ते कृतकृत्य झाले. मलेरिया व क्षयरोगावर दादांची औषधे अत्यंत गुणकारी ठरत. त्यांचा लौकिक पोर्तुगालपर्यंत पोचला होता. तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नर गार्दाल्य यांच्या मुलाला असाध्य रोगातून त्यांनी वाचवले होते.
वरियरनी कॉलरावर अत्यंत गुणकारी औषधे, गोळ्या बनवल्या होत्या व त्याना ‘विषुचिका’ हे नाव दिले होते. दादांचा केरी-फोंडा येथे मोठा चिरेबंदी वाडा आहे. तिथे एकत्र कुटुंब पद्धती नांदत होती. वेळेला तीस-चाळीस लोक घरचे व पै-पाहुणे जेवायला असत. वरियरनी पण केरळीय पद्धतीचे चार मजली कौलारू घर बांधले होते. त्यांच्याकडे पण एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यांच्याकडेही पाहुणे, सोयरेधायरे यायचे. त्यांनी घराला ‘कैलास मंदिर’ हे नाव दिले होते. दोघांनीही शहरापेक्षा कुळागरी गाव पसंत केले.
दादा वैद्य व वरियर दोघांनाही पोर्तुगीज वा इंग्रजी येत नव्हती. पाश्‍चात्त्य वैद्यकशास्त्राचे ज्ञान दोघांनाही नव्हते. कुठलेही वैद्यकीयशास्त्र परिपूर्ण नाही असे दादांचे म्हणणे होते. यास्तव दोघांनीही पाश्‍चात्त्य डॉक्टरांकडून ऍलोपथीचे कामचलाऊ ज्ञान मिळवले. ऍलोपथीचा अभ्यास करण्यासाठी दादा डॉ. नारायण जोगळेकर यांच्याकडे सावर्ड्यास जाऊन राहिले. त्याकाळी गोव्यात नवीन लोहमार्ग बांधण्याचे काम चालू होते व कामगारांवर उपचार करण्यासाठी डॉ. जोगळेकरांची नेमणूक करण्यात आली होती. दादा डॉ. जोगळेकरांजवळ वर्ष-दीड वर्ष राहिले. इथे त्यांनी शरीररचना विज्ञानाचा अभ्यास केला. डॉ. जोगळेकर नोकरी सोडून बेळगावला गेल्यानंतरसुद्धा दादा त्यांच्याकडे बेळगावला अधूनमधून जात असत व अत्याधुनिक ज्ञान प्राप्त करून घेत असत.
सुरुवातीस वरियरना इंग्रजी येत नव्हते. पण परिश्रमपूर्वक वयाच्या बाविसाव्या वर्षी शाळेत न जाता कोट्टकलच्या राजपुत्राबरोबर ते इंग्रजी शिकले. भाषेवर प्रभुत्व मिळवून ते उत्तम इंग्रजीत वाचू, लिहू, बोलू लागले. ऍलोपथीचा अभ्यास करण्यासाठी ते मंजेरी येथील हॉस्पिटलचे सहाय्यक सर्जन डॉ. वर्गीस यांच्याकडे चार वर्षे राहिले. ते बारीकसारीक शस्त्रक्रियाही करीत. गुंगीचे औषध देत. पण कोट्टकलच्या राजपुत्राने त्याना पदवीशिवाय पाश्‍चात्त्य औषधे व उपचार करण्यापासून कायदेशीर धोके असल्याने परावृत्त केले. पुढे केवळ आयुर्वेदिक उपचार करून वरियरनी हजारो रुग्णांना व्याधीमुक्त केले. प्रसिद्ध व्यक्ती माजी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी, जयप्रकाश नारायण आदींनी त्यांच्याकडे उपचार घेतले.
दोघांनाही रुग्ण देव मानत. दोघांनाही सामाजिक कार्यात रस होता. वरियर १९०९ पासून आर्य वैद्यांचे संमेलन भरवत. असा संमेलनात शोधपत्रिका वाचल्या जात. वेगवेगळ्या वैद्यकीय विषयांवर चर्चा होत. विघ्नसंतोषी लोकांनी दादा व वरियर दोघांनाही छळले. वरियरची लोकप्रियता सहन न होऊन काही दुष्ट लोकांनी निनावी पत्रे लिहून वरियर मोपला बंडखोरांना मदत करत असल्याचे सरकारला कळविले.
दादा वैद्यांनासुद्धा अशा लोकांशी सामना करावा लागला. आल्मेदा कॉलेजवर अनेकांनी टीका केली, आरोप केले. पण दादांनी चिकाटी सोडली नाही. या कॉलेजला दादांनी आपली इमारत विनामूल्य दिली व महिना रु. ६० भाडे ते कित्येक वर्षे देत असत.
दादा व वरियर दोघेही धार्मिक वृत्तीचे होते. वैदिक धर्माचे कट्टर अभिमानी होते. दादांची कुलस्वामिनी विजयादुर्गेवर निस्सिम श्रद्धा होती. कोणतेही कार्य करण्यापूर्वी गोमंतकातील प्रघाताप्रमाणे ते देवीचा कौल-प्रसाद घेत. पण अंधश्रद्धा नव्हती. आपल्या कार्याला आशीर्वादरूपी कौल ते मानत. प्रसाद घेतेवेळी तारतम्य बुद्धी वापरायला पाहिजे असे त्यांचे मत होते.
वरियरांची कुलदेवता विश्‍वंभर (विष्णू). विष्णूचे एक सुंदर मंदिर आपल्या घराशेजारी त्यांनी बांधून घेतले होते व त्याच्या व्यवस्थेची तरतूद केली होती. या दैवतावर त्यांची असीम श्रद्धा होती. दादा व वरियर दोघेही कर्मयोगी होते. ते कधी वेळ फुटक घालवत नसत. दिवसभर वैद्यकीय काम असल्यामुळे त्यांचे वाचन-लेखन रात्रीचे होत असे.
दादा वैद्य आयुर्वेद प्रसाराचे काम गोव्यात करत होते, त्याच काळात मुंबईला परशुराम वैद्य नावाच्या सद्गृहस्थाने १८९६ मध्ये आयुर्वेद प्रसारासाठी कॉलेज काढले. दादा वैद्यांचे काम पाहून वयाच्या ७९ व्या वर्षी मुंबईच्या पोपट परशुराम कॉलेजने दादाना ‘प्राणाचार्य’ ही पदवी देऊन गौरविले. वरियरना भारत सरकारने (ब्रिटिश व्हाइसरॉय) १९३३ साली ‘वैद्यरत्नम्’ ही पदवी देऊन गौरविले.
डॉ. वरियर ज्याप्रमाणे आर्य वैद्य शाळेचा नफा सार्वजनिक कामासाठी देत, त्याचप्रमाणे दादा हिंदू फार्मसीचा नफा गोरगरिबांसाठी, समाजकार्यासाठी देत. वरियरनी परिचारिका तयार करण्यासाठी शुश्रूषालय काढले, तसेच दादांनी हिंदू धर्मातील मुलींनी सुईणीचे शिक्षण घ्यावे म्हणून नगरपालिकांनी पगारी सुईणी म्हणून नेमण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. ते धन्वंतरी नावाचे आयुर्वेदाशी संबंधित नियतकालिक चालवत. त्यांनी ‘अष्टांग शरीरम्’ हे पुस्तक लिहिले. त्यांचे ‘चिकित्सा संग्रह’ हे पुस्तक बरेच प्रसिद्ध आहे. दोघेही श्रद्धाळू असले तरी अंधश्रद्धाळू नव्हते. ब्राह्मण-ब्राह्मणेत्तरांमधील भेद नष्ट व्हावे म्हणून भट्टप्रभू ऐक्य परिषदेत सहभोजनात सहभागी झाल्याबद्दल घरच्या मंडळीचा दादांना रोष पत्करावा लागला.
वरियरनी केरळीय पद्धतीचे चार मजली भव्य घर बांधल्यानंतर घर प्रवेश, होम व इतर विधी करायच्या अगोदर केरळ साहित्य परिषदेसाठी लांबून आलेल्यांना जातिभेद न मानता त्या घरात राहायला दिले. हे शास्त्रबाह्य असल्याने त्यांना घरच्यांनी विरोध दर्शविला होता.
वरियरना पी. माधवन् नावाचा कर्तबगार पुतण्या होता. वरियरनी त्याला मिळवलेल्या मालमत्तेचा ट्रस्ट करून माधवनला प्रमुख ट्रस्टी व व्यवस्थापक नेमले. आपल्या कर्तबगारीवर त्यांनी आर्य वैद्य शाळेची, हॉस्पिटलची व इतर आस्थापनांची चांगली सुधारणा करून नावलौकिक वाढवला.
दादांचे पुतणेही डॉ. माधव (ऍलोपथी) नावाचे होते. त्यांनी कर्नाटक आरोग्यधाम घटप्रभेचे चालक व आधारस्तंभ म्हणून केलेले कार्य, गोरगरिबांची केलेली सेवा व तोच वसा त्यांचे कुटुंबीय चालवत आहेत, हे सर्वश्रुत आहे.
दोघेही शांत, निगर्वी, सरळ मनाचे, आदरशील, उत्साही, परोपकारी, राष्ट्र व संस्कृतीप्रेमी होते. दादांची देहयष्टी ठेंगणी, रुबाबदार चेहरा, भावदर्शी नजर व पाहणार्‍याचे चित्त ते आपल्याकडे वेधून घेत. डॉ. वरियर हे उजळ रंगाचे, उंच, तीव्र नजर असलेले व कोमल अंतःकरणाचे होते. दोघांनाही दीर्घायुष्य लाभले. दोघांनीही चातुर्थाश्रमात पोचल्यावर संन्यास घेण्याचे निश्‍चित केले. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता दोघांनीही विधियुक्त संन्यास स्वीकार केला.
दादा व वरियरना वार्धक्यानुसार कोणत्याही प्रकारचा दुर्धर रोग न होता, अंथरुणाला खिळून न पडता शांतपणे मृत्यू आला. दादा वयानुसार खंगत चालले होते. शेवटची घटी जवळ आल्याचे त्यांना जाणवले. ते ‘कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने| प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमोनमः’ हे व ‘श्रीराम जय राम जयजयराम’ या मंत्रांचा जप करू लागले. त्यांचा अनंताचा प्रवास सुरू झाला. नातेवाईक, मित्रमंडळी मध्ये मध्ये विचारपूस करीत. शेवटी अत्यंत शांत चित्ताने कोणत्याही प्रकारची गडबड न करता दादांची प्राणज्योत मालवली. त्याच रात्री त्यांना पणजीहून केरीस आणण्यात आले. दादांच्या निर्वाणाची बातमी वार्‍यासारखी सगळीकडे पसरली. अंत्यविधी व शेवटचे दर्शन घेण्यासाठी सर्व थरांतल्या लोकांची रीघ लागली. साश्रू नयनांनी सगळे शेवटचा निरोप देत होते. समाधिविधीची तयारी सकाळपासून चालू झाली होती. सर्व विधी पूर्ण झाल्यावर दादांना समाधिस्थ करण्यात आले.
वैद्यरत्नम् वरियरांचा मृत्यूसुद्धा कोणत्याही प्रकारचा असाध्य रोग न होता वार्धक्याने झाला. तत्पूर्वी त्यांची वृद्ध मातोश्री अंथरुणाला खिळून होती. वैद्य रत्नमने तिची मनापासून आदराने सर्व प्रकारे सेवा केली. थोड्याच दिवसांत ती इहलोक सोडून गेली. वरियरना ही एक खंत होती.
शेवटी आयुष्यात न टळणारा दिवस उजाडला. २९ जानेवारी १९४१ रोजी वरियरांची प्रकृती बिघडली. त्यांचे एक पुतणे डॉ. रमण कट्टी वरियर यांनी नाडीपरीक्षा केली. अनियमितपणा होता. छातीत कफ भरला होता. पण रोजचा पत्रव्यवहार व्यवस्थितपणे हाताळला. रात्रीचे थोडे जेवण घेतले. रात्री दहा वाजता झोपण्यासाठी ते आपल्या खोलीत गेले. त्यांचा सदोदित साथ देणारा प्रामाणिक नोकर शंकुनी खोलीबाहेर झोपला, पण दोघांनाही शांत झोप लागली नाही. कफ सतावत होता. अनेकदा उठावे लागले. उत्तररात्री शंकुनीने कॉफी करून आणली. वरियरना हाक मारली. पण प्रतिसाद मिळाला नाही. शरीर अस्तव्यस्त पडले होते. जवळ असलेल्या डॉ. रमण वरियार यांना बोलावण्यात आले. डॉक्टरनी प्राणज्योत मालवल्याचे सांगितले. दादांप्रमाणे वरियरचीसुद्धा प्राणोत्क्रमणाची बातमी सगळीकडे त्वरित पोहोचली. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकच गर्दी केली. साश्रू नयनांनी शेवटचा निरोप घेत होते. प्राथमिक धार्मिक विधी झाल्यावर प्रचंड अंत्ययात्रा काढण्यात आली. झामोदिनच्या राजाने रेशमी शाल पाठवली होती, ती शवावर घालण्यात आली. शव समाधिस्थळावर ठेवण्यात आले. शास्त्रानुसार विधी करण्यात आले व वरियरच्या वाड्याजवळ समाधिस्थ करण्यात आले. त्यांनी करून घेतलेल्या मृत्युपत्राप्रमाणे विश्‍वस्तमंडळाची स्थापना करण्यात आली.
दादा वैद्य व वरियरसारख्या वैद्यांनी आयुर्वेदावरील विश्‍वास वाढविला. काही लोक- डॉक्टरसुद्धा- आयुर्वेदाचा परिणामच नाही तर दुष्परिणाम कुठले असणार? अशी चेष्टा करत होते. स्वातंत्र्यानंतर आयुर्वेदाला चांगले दिवस आले आहेत. मोदी सरकारने आयुष्य मंत्रालयासारखे स्वतंत्र मंत्रालय स्थापन केलेले आहे. बाबा रामदेव, बाळाजी तांबेसारखे असंख्य लोक चांगले कार्य करत आहेत. गोव्यात शिरोडा येथे आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटलचे कार्य सर्वश्रुत आहे. विस्तारत आहे.
गोव्यात पोर्तुगीज काळातसुद्धा कित्येक ऍलोपथी सेवाभावी डॉक्टरांनी रुग्णसेवा करून दुवा घेतलेला आहे. फोंडा पंचक्रोशीत सत्तर वर्षांपूर्वी डॉ. बाळकृष्ण सुखठणकर, डॉ. सखाराम गुडे, डॉ. प्रियोळकरसारख्या अनेकांनी उन्हातान्हातून, काट्याकुट्यांतून, रात्री अपरात्री सेवेकर्‍यांनी धरलेल्या कंदीलाच्या प्रकाशात रुग्णाला औषधांबरोबर धीर दिलेला आहे. शेवटी ‘सर्वेनः सुखिनो सन्तु, सर्वे सन्तु निरामयः’ अशी प्रार्थना करून सर्वांना दीर्घायुरारोग्य प्राप्त होवो, अशी सदिच्छा व्यक्त करूया.