Home बातम्या प्रस्तावित बुलेट ट्रेनचे संकल्पनाचित्र जारी

प्रस्तावित बुलेट ट्रेनचे संकल्पनाचित्र जारी

0

देशातील पहिल्या-वहिल्या बुलेट ट्रेनचे संकल्पनाचित्र समोर आले आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या वतीने या बुलेट ट्रेनचे संकल्पनाचित्र प्रसिद्ध केले आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद आणि मुंबई या दोन महत्वाच्या शहरांना जोडणार आहे. नवी दिल्लीतील रेल्वे मंत्रालयाच्या गेट क्रमांक 04 येथे बुलेट ट्रेनचे संकल्पनाचित्र लावण्यात आले आहे. या त्यात बुलेट ट्रेनचे डिझाईन स्पष्टपणे दिसून येत आहे.

मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांना जोडणारी बुलेट ट्रेन मोदी सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भाजप सरकार पुढील वर्षी म्हणजेच 15 ऑगस्ट 2027 रोजी या ट्रेनसेवेचे लोकार्पण करणार आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या शहरांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेनमुळे प्रवास वेळेचे मोठी बचत होणार आहे. मुंबई ते अहमदाबाद हे अंतर अवघ्या दोन तासांत गाठता येणार आहे.

508 किमी लांबीचा मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्प जपान सरकारच्या तांत्रिक आणि आर्थिक मदतीने तयार होत आहे. हा प्रकल्प गुजरात, महाराष्ट्र आणि दादरा व नगर हवेलीमधून जाईल. त्यासाठी मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमतीसह 12 स्थानके तयार केली जात आहेत.
या प्रकल्पात समाविष्ट असलेल्या 12 पैकी 8 स्थानकांच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये वापी, बिलिमोरा, सुरत, भरुच, आनंद, वडोदरा, अहमदाबाद आणि साबरमती यांचा समावेश आहे. 17 नद्यांवरील पूल पूर्ण झाले आहेत, तर नर्मदा, माही, तापी आणि साबरमती यांसारख्या 4 मोठ्या नद्यांवरील पुलाचे काम वेगाने सुरू आहे. महाराष्ट्रामध्येही 4 नद्यांवरील पुलांचे काम सुरू आहे.

या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग अंडर-सी बोगदा देखील आहे. सुमारे 21 किमी लांबीच्या या बोगद्याचे काम सुरू झाले आहे. यापैकी महाराष्ट्रातील घणसोली आणि शिलफाटा दरम्यान 4.8 किमी बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.