Home बातम्या नीट पेपरफुटी प्रकरणी कोचिंग क्लासेसच्या संचालकास अटक

नीट पेपरफुटी प्रकरणी कोचिंग क्लासेसच्या संचालकास अटक

0

देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील ‘आरसीसी क्लासेस’ या कोचिंग क्लासेसचा संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) सोमवारी अटक करण्यात आली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रा. मोटेगावकर याला 9 दिवस सीबीआयच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले.
नीट पेपरफुटी प्रकरणात प्रा. मोटेगावकर याची रविवारी दिवसभर चौकशी करण्यात आली. पेपरफुटी प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेला मुख्य सूत्रधार आरोपी पी. व्ही. कुलकर्णी याच्याशी मोटेगावकर हा संपर्कात होता.

या पार्श्वभूमीवर प्रा. मोटेगावकर याचे लातूरमधील कार्यालय, तसेच निवासस्थानी सीबीआयच्या पथकाने छापे टाकले, तेव्हा रसायनशास्त्र विषयाशी संबंधित प्रश्नसंच सापडले. प्रा. मोटेगावकर याचे कार्यालय अणि निवासस्थानातून कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाईल संच जप्त करण्यात आले, असे ‘सीबीआय’च्या अधिकााऱ्यांनी सांगितले. या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न 3 मे रोजी पार पडलेल्या ‘नीट’च्या प्रश्नपत्रिकेत होते. पेपरफुटी प्रकरणात प्रा. मोटेगावकर सामील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली.

प्रा. मोटेगावकर याला अटक करण्यात आल्यानंतर पुण्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. मोटेगावकर याचे कार्यालय आणि निवासस्थानातून कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत. इलेक्ट्रॉनिक उपकरणाची तांत्रिक तपासणी करायची आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करायचा आहे. तपासासाठी मेोटेगावकर याला सीबीआय कोठडी देण्यात यावी, अशी विनंती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात केली. या प्रकरणात अटक केलेल्या मोटेगावकर याची प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) मिळवण्यात आली असून, पुढील तपासासाठी मोटेगावकर याला तपासासाठी दिल्लीतील सीबीआय कार्यालयात नेण्यात येणार आहे.

दरम्यान, जीवशास्त्राच्या अध्यापक मनीषा गुरुनाथ मांढरे हिला काही दिवसांपूर्वी सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. दिल्लीतील विशेष न्यायालयाने 14 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

23 एप्रिललाच मिळवली प्रश्नपत्रिका
शिवराज मोटेगावकरने 23 एप्रिल रोजी रसायनशास्त्राचा पेपर मिळवला होता, त्याच्या मोबाईलमध्येच फुटलेली प्रश्नपत्रिका सीबीआयला आढळून आली. तसेच, शिवराज मोटेगावकर हा सेवानिवृत्त प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णीसोबत पेपरफुटीत सहभागी होता, हेही निदर्शनास आले.

आतापर्यंत दहा आरोपी अटकेत
नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने देशातील वेगवेगळ्या भागांत छापे टाकले आहेत. कागदपत्रे, मोबाईल संच, तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली होती. जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, लातूर परिसरातून आतापर्यंत दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे.