प्रत्येकामधील वैज्ञानिक जागा व्हावा

0
79
  • – कु. अवनी औदुंबर शिंदे
    (धारगळ- पेडणे)

रमण प्रभावाच्या या शोधामुळे व या शोधाला नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे भारताचे नाव उंचावत गेले. या रमण प्रभावाचा शोध ज्या दिवशी प्रकाशित झाला तो दिवस २८ फेब्रुवारी १९३०. हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचा मूळ उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना विज्ञान आणि विविध वैज्ञानिक उपक्रमांबद्दल सदैव सतर्क करणे व आकर्षित करणे होय.

अनेक राष्ट्रीय किंवा जागतिक दिवस थोर व्यक्तींच्या जन्मतिथी किंवा पुण्यतिथीनिमित्त साजरे केले जातात. २८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस. या दिवशी कुणा वैज्ञानिकाचा वाढदिवस किंवा पुण्यतिथीही नाही. मग का साजरा केला जातो हा दिवस?
भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी आपल्या जीवनात अनेक वैज्ञानिक शोध लावले. पण त्यांचा अत्यंत गाजला तो शोध म्हणजे ‘रमण प्रभाव’ शोध. या शोधाला १९३० सालचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. हा शोध प्रबंध दि. २८ फेब्रुवारी १०३० रोजी प्रकाशित झाला होता. तोच दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून पाळला जातो. खरे पाहता वैज्ञानिक सी. व्ही. रमण सरांनी हा शोध १९२८ साली लावला होता. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे असलेल्या इंडियन असोसिएशन ऑफ द कल्टीव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेत सर सी. व्ही. रमण १९०७ ते १९३३ पर्यंत कार्यरत होते. या काळात त्यांनी भौतिकशास्त्रातील अनेक शोध लावले.

आकाशाचा रंग निळाच का? समुद्राचे पाणी निळे का दिसते? हा मोठा प्रश्‍न जगातील वैज्ञानिकांना पडला होता. आकाशाचा रंग निळा म्हणून कदाचित समुद्राचे पाणी निळे दिसत असावे असा सर्वसामान्यांचा समज होता. मग आकाश निळे का?.. याचे कोडे काही सूटत नव्हते. हे कोडे सोडवण्यासाठी सर सी. व्ही. रमण झटत होते.

प्रिझम या काचेच्या पारदर्शक तुकड्यातून प्रकाश किरण आरपार गेल्यावर त्या पांढर्‍या किरणांचे रुपांतर इंद्रधनूच्या सात रंगात होते याचा शोध पूर्वीच लागला होता. या रंगाचा क्रम ठरलेला. काचेच्या तुकड्याचे आकार बदलले किंवा प्रकाश किरणांमध्ये बदल घडवला तरी इंद्रधनूचे सातच रंग दिसतात व त्यांचा क्रम ठरलेला असतो. असे का याचा शोध लावण्यासाठी त्यांनी हा सात रंगांचा इंद्रधनूचा झोत भिंतीवर घेतला आणि प्रत्येक रंगाच्या पट्‌ट्यांचे आकारमान तसेच प्रखरता मोजली. इतर रंगांपेक्षा निळा रंग विचित्र वागतो, हे त्यांच्या लक्षात आले. इतर रंग ज्या दिशेला पसरतात आणि निळा रंग ज्या दिशेला पसरतो या दोन्ही दिशा भिन्न असल्याचे त्यांच्या लक्षात आले व प्रकाश किरणातील निळ्या रंगाच्या विचित्रपणामुळे आकाश निळे आहे. कारण त्याची दिशा इतरांपेक्षा वेगळी असल्याने तोच निळा रंग आकाशात भरून राहतो, हे त्यांनी जगाला सांगितले. समुद्राचे पाणी हे आकाशाचा निळा रंग परावर्तीत झाल्यामुळे नसून समुद्रही प्रिझम म्हणजे काचेच्या तुकड्यासारखा वागतो आणि या समुद्रातून आरपार होणारा प्रकाशझोत निळा रंग वेगळ्या दिशेला पाठवतो. ज्या कारणामुळे आकाश निळे आहे. त्याच कारणामुळे समुद्रही निळा आहे. एवढेच नव्हे तर सामान्य डोळ्यांना न दिसणारे अनेक रंग पण आहेत ते कदाचित पक्षीप्राण्यांना दिसू शकतील याची कल्पना त्यांनी मांडली. आपल्या या शोधाला त्यांनी ‘निळ्याचा परिणाम’ असे नाव दिले होते. पण आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक केमिकल लँडमार्क या संस्थेने या शोधाचे नामकरण ‘रमण प्रभाव’ असे केले. या संशोधनाला १९३० सालचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. या संशोधनाचा फायदा फक्त आकाशाच्या निळ्या रंगाचे कोडे सुटण्यापुरता नव्हता तर अजूनही या रमण प्रभावामुळे ब्रह्मांडातील इतर तार्‍यांमध्ये नेमके काय दडलेय याचा शोध वैज्ञानिक घेत आहेत. वेगवेगळे इंधन जाळले आणि त्यावेळी जो प्रकाश निर्माण होतो त्या प्रकाशाचे इंद्रधनूष्य वेगवेगळे असते. त्यातील निळाई गुपीत सांगून जाते. त्यामुळे सूर्यावर नेमके कोणते इंधन जळते म्हणून हा प्रकाश आपल्याला मिळतो याचा शोध लागला. प्रत्येक तार्‍याच्या प्रकाशावर रमण प्रभावाने शोध घेतला जात आहे व त्या तार्‍यांवर नेमके काय जळत आहे त्याचा शोध लावला जात आहे. तारे अगणित असल्यामुळे वैज्ञानिकांनाही ते आव्हानच आहे.
रमण प्रभावाच्या या शोधामुळे व या शोधाला नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे भारताचे नाव उंचावत गेले. भारतातील वैज्ञानिकही संशोधनात काही कमी नाहीत. आम्हीही विज्ञानात प्रगत आहोत हा संदेश जगासमोर गेला.
या रमण प्रभावाचा शोध ज्या दिवशी प्रकाशित झाला तो दिवस २८ फेब्रुवारी १९३०. हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचा मूळ उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना विज्ञान आणि विविध वैज्ञानिक उपक्रमांबद्दल सदैव सतर्क करणे व आकर्षित करणे होय.

या दिवसामुळे वैज्ञानिकांना आपल्या संशोधनाचा दावा करण्याची एक चांगली क्लृप्ती मिळाली. एकाच विषयावर जगाच्या कानाकोपर्‍यातील वैज्ञानिक शोधकार्य करीत असतात. दोन वेगवेगळ्या देशात संशोधन करणार्‍यांना एकाच वेळी तोच शोध लागला तर शोध आधी कोणी लावला हे कसे गृहीत धरायचे यावर कुठलेच मार्गदर्शन नव्हते. त्यामुळे आपल्याला शोध लागला रे लागला की तो छापील पुस्तक रूपात प्रसिद्ध करायचा आणि मग दावा करायचा हे या दिवसापासून ठरले. नाही तर, हा शोध मी अनेक वर्षांपूर्वी लावला होता पण कोणाला सांगितले नव्हते. शोधकार्य गुप्त ठेवण्यात आले होते, असे आता कोणाला गुप्त ठेवता येत नाही. जशी वाङ्‌मय चोरी होते, साहित्य लिखाण चोरून आपल्या नावावर प्रसिद्ध केले जाते तसा प्रकार स्पर्धेत उतरलेल्या वैज्ञानिकांमध्येही होत असतो. त्यामुळे ज्याचा शोध आधी प्रकाशित झाला तो त्या शोधाचा मानकरी हे दि. २८ फेब्रुवारी १९३० पासून ठरले.
राष्ट्रीय विज्ञान दिन हा थोर वैज्ञानिक चंद्रशेखर वेंकट रमण यांचा वाढदिवस नव्हे की पुण्यतिथीही नव्हे. ‘रमण प्रभाव’ हा त्यांचा शोध या दिवशी लागला नव्हता तर त्या दिवशी त्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. भारतीय संशोधकांकडे जागतिक सायन्स जर्नल दुर्लक्ष करीत असत. त्यांचे संशोधन प्रसिद्ध करीत नसत. याचा फटका जगदिशचंद्र बोस यांच्यासारख्या वैज्ञानिकांना बसला. रेडिओचा शोध त्यांनी आधी लावला पण पुरस्कार मार्कोनी यांना देण्यात आला. वैज्ञानिकांना सतत सतर्क ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना वैज्ञानिक उपक्रमांबद्दल आकर्षित करण्यासाठी १९८६ साली विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी राष्ट्रीय विज्ञान परिषदेने २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित केला. या दिवशी दरवर्षी शाळा-महाविद्यालये, विद्यापीठ, संशोधन संस्था तसेच वैद्यकीय तसेच तांत्रिक शिक्षणसंस्थांमध्ये विविध उपक्रम राबवून हा दिवस साजरा केला जातो. विविध संशोधन केंद्रात नवनवीन शोधांचे प्रदर्शन भरवले जाते. नवीन प्रकल्प, सजीव प्रकल्प मांडले जातात. या दिवशी विज्ञान चित्रपटांची मेजवानी विद्यार्थ्यांसमोर ठेवली जाते. चर्चा, भाषणे, प्रश्नमंजुषा स्पर्धा, विज्ञान मॉडेल प्रदर्शन, आकाश दर्शन हे तर नेहमीचेच कार्यक्रम असतात. विज्ञान दिनाच्या निमित्ताने प्रत्येक व्यक्तीमधील वैज्ञानिकाला जागे करण्यासाठी उपक्रम राबवले गेले पाहिजेत.

स्वयंपाकघरात आई अन्न शिजवताना विज्ञानाचा वापर कसा करते हे मुलांना समजले पाहिजे. मोलकरणी आपले काम सोपे व सुरळीत व्हावे यासाठी कोणत्या क्लृप्त्याा काढून आपला आपण गॅझेट बनवते याकडे लक्ष गेले पाहिजे. दैनंदिन जीवनात विज्ञान कुठेकुठे लागते याची जाणीव करून देणारे कार्यक्रम झाले पाहिजेत. विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून मानवी कल्याणासाठीच नव्हे तर या चराचर सृष्टीच्या वापरासाठी कसा करता येईल यावर विचार विनिमय झाला पाहिजे.

राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी प्रत्येक वर्षी एक विषय ठरवला जातो. यंदाच्या २०२२ सालचा विषय आहे ‘दीर्घकालीन भविष्यासाठी विज्ञान आणि प्रौद्योगिकीकरणात एकात्मिक दृष्टिकोन तसेच शाश्‍वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा एकात्मिक दृष्टिकोन’ असा विषय निवडला आहे.