जय शिव शंभो सांब सदाशिव

0
116
  • – मीना समुद्र

महाशिवरात्र ही माणसाने मन शुद्ध, पवित्र आणि उन्मुक्त बनविण्याचे एक सहज सोपे आनंदसाधन आहे. शिवनाम मुखी ठेवून शिवरात्रीचे महात्म्य जपण्याची परंपरा आपणही चालू ठेवू आणि जीवनात सत्य-शिव-सुंदराचा वसा वसत राहू.

बर्‍याच वर्षांनी आम्ही बहिणी माहेरी एकत्र भेटलो होतो. तसाही सोमवार होता म्हणून जवळच्या मंदिरात शिवदर्शनासाठी गेलो. किती बदललं होतं सारंच. गावात ऐन वस्तीत असलेलं हे मंदिर नव्याने बांधलं होतं. पूर्वी आईबरोबर दर्शनाला येताना गंधफुलं, बेलाची पानं हे सारं बरोबर असे. मंदिरात प्रवेश करताना बाहेरच्या बाजूला असलेल्या पितळी कासवाला नमस्कार करून वरती टांगलेली घंटा वाजवून गाभार्‍याजवळ जायचं. हाताला न येणारी घंटा उडी मारून वाजवायची; त्या आवाजाने देव जागा होतो, आपल्याकडे लक्ष देतो असं वाटे. एरवी हे भोलानाथ आपले सदा समाधिस्थ! गाभार्‍यात त्यावेळी कुणाही भाविकाला विनासायास प्रवेश करता येई. शिवलिंगाला स्नान घालून गंधफुलांनी त्याची पूजा करता येई, डोके टेकता येई. आपल्या जवळच्या चंबूतले पाणी अभिषेकपात्रात ओतता येई. टिप् टिप् गळणार्‍या पाण्याने भिजत सदासर्वकाळ हा सदाशिव ओलेता कसा काय राहतो असा प्रश्‍न पडे. पण पुढे अमृतमंथनावेळच्या विषप्राशनाची कथा ऐकल्यावर अंगाचा दाह कमी करण्यासाठी असा सतताभिषेक हवाच हे कळले.

आता मात्र गर्भगृहात जाता आले नाही. पण पुजार्‍याने बांधलेली पूजा पाहताना मन आनंदून गेले. त्या भव्य शिवलिंगावर गंधाचे पट्टे होते आणि फुलांची सुंदर सुबक मांडणी केली होती. पांढरी शुभ्र मोगर्‍याची फुले, केवडा – त्यांचा आणि उदबत्त्यांचा, कापराचा सुगंध दरवळत होता. शिवपिंडीला विळखा घालून तिच्यावर छत्र धरलेला चकचकीत पितळी नागफणा अगदी जिवंत वाटत होता. गाभार्‍याबाहेर गणपती आणि हनुमान अशा मूर्ती कोनाड्यात उभ्या होत्या. त्यांनाही सुंदर फुलांची आरास केली होती. खोबरे, खडीसाखरेचे दाणे प्रसाद म्हणून घेऊन बाहेर येऊन टेकलो दगडी कठड्यावर. त्या सार्‍या बदललेल्या, नवख्या वातावरणात बाहेरचे पिंपळाचे झाड मात्र खूप खूप ओळखीचे वाटले. त्याने आपल्या अंगणभर पसरलेल्या विस्ताराने आमच्यावर छत्रछाया धरली आणि मायेने आमची विचारपूस केली. या प्रसंगाची आठवण झाली. कारण शिवरात्र अगदी दोन दिवसांवर आली. तशी दर महिन्यात अमावस्येच्या आधी एक किंवा दोन दिवस अशी ती येतेच. पण ही महाशिवरात्र मात्र माघ महिन्याच्या कृष्णचतुर्दशीला येणारी शिवरात्र. महाशिवरात्र हा एक मोठा पर्वकाळ मानला जातो.

कपिलाषष्ठी अर्धोदय संक्रमण | महोदय गजच्छाया ग्रहण |
इतुकेही पर्वकाळ ओवाळून | शिवरात्रीवरून टाकावे ॥

  • असे या शिवरात्रीचे महिमान श्रीधराच्या ‘शिवलीलामृता’त सापडते. ‘शिवरात्रीचा महिमा पूर्ण शेषही वर्णू शकेना’ असाही उल्लेख मिळतो. (शेषनाग हा सहस्त्रमुखे असलेला नाग असूनही त्याचेही वर्णन अपुरेच राहते.)
    शिव या नावातच पावित्र्य आहे. शंकर म्हणजे शं+कर – कल्याण करणारा. सार्‍या जगताचे कल्याण करणारा हा शिवशंकर अनंतरूपे, अनंतनामे भजला, पूजला जातो. ‘भाळी अर्धचंद्र माथी शुभ्र गंगा लिंपिले सर्वांगा चिताभस्म’.. असे त्याचे योगीरूप श्रीमती शांता शेळके यांनी किती सुंदर वर्णन केले आहे. ‘जटाजूट माथ्यावरी चंद्रकळा शिरी धरी, सर्पमाळ रुळे ऊरी, चिताभस्म सर्वांगास लिंपूनी राहे’ अशा या जन्मोजन्मीच्या योग्याने उमेबरोबर संसारही थाटलेला आहे. आणि हे पार्वती परमेश्‍वर जगत्कल्याणाची चिंता करीत आकाशमार्गाने फिरत असतात आणि जनांची दुःखे निवारण्यासाठी सतत सज्ज असतात. त्यांचे पुत्र श्रीगणेश आणि षण्मुख कार्तिकेय यांचा जन्मही विघ्नविनाशासाठीच झालेला आहे; मांगल्याच्या स्थापनेसाठी ते उद्युक्त आहेत. हा साराच शिवपरिवार किती आगळावेगळा. शिवशंकर हा देवाधिदेव महादेव. पण त्याला ना मुकुट ना कसले अलंकरण. स्मशानात त्याचा अधिवास. नररुंडमाळा, रुद्राक्षमाळा हे याचे अलंकार. व्याघ्राजिन हे वस्त्र. हाती त्रिशूळ हे शस्त्र आणि डमरू हे वाद्य. हा त्रिनेत्रधारी. क्रोधाविष्ट झाला की तिसरा डोळा उघडतो. त्यात त्रिभुवन भस्म करण्याची क्षमता आहे. याने तांडव केले की धरणीकंप होतो. उत्पत्ती- स्थिती- लय या विश्‍व चलनाच्या योजनेत हा संहारकर्ता असतो; पालनकर्ता विष्णू याचा मित्र. भस्मासुराला दिलेल्या शिववराने तो माजल्याने घातलेला धुमाकूळ आणि संहार थांबविण्यासाठी विष्णूने मोहिनीरूप धारण केले. देव-दानवांच्या अमृतमंथनसमयी विष प्राशून कर्पूरगौर शिव करुणावतार नीलकंठ झाला आणि तो असह्य विषदाह सुसह्य करण्यासाठी थंडगार नागसाप अंगावर खेळविले आणि शीतल चंद्र डोक्यावर धारण केला. आकाशातून पडणारा गंगेचा जलौघ पृथ्वीचे जीवन नष्ट करील म्हणून त्याने तो आपल्या जटाजूटेत अडविला. (भक्तावर प्रसन्न झाला की वर देऊन भक्ताला संतुष्ट करायचे आणि गर्वोन्नत दैत्यांनी सर्वसामान्यांना हैराण केले की इतर देवीदेवतांनी येऊन त्यांचे दमन, शमन करायचे ही एक शिवलीलाच!)
    अशा या भोलेनाथाचे स्मरण सर्वत्र दिसते. श्रीधर म्हणतो-
    न कळता घडे शिवस्मरण | परी सकळ दोषा होय दहन |
    वसिष्ठ विश्वामित्रादि मुनीश्वर, सुरगण गंधर्व किन्नर,
    सिद्ध, चारण, विद्याधर | शिवरात्रिव्रत करिताती ॥
    आणि हे शिवरात्रिव्रत या पुण्यदिवशी या पर्वकाळी कसे करावे? – तर नदी. झरे, जलाशय, समुद्र, विहिरी अशा जलस्थली जाऊन स्नान करून शुद्ध व्हावे. सतत ‘शिव शिव’ नामघोष मुखी असावा. शुचिर्भूत होऊन शिवध्यान, शिवस्मरण, त्रिकाळ शिवपूजा करावी. ‘नमः शिवाय’ हा पंचाक्षरी किंवा ‘ॐ नमः शिवाय’ हा षडाक्षरी मंत्र जपावा. शरीरशुद्धीसाठी आणि आंतरिक शुद्धीसाठी नामजपाबरोबरच शक्यतो निराहार, निर्जळी उपवास करावा आणि एकाग्रतेने शिवस्तोत्र, शिवलीला, शिवमहिमा यांच्यासह कथा- पुराणे वाचावीत. तसेच शिवध्यान करत सार्‍या अमंगलाला दूर ठेवून स्वतःचे आणि इतरांचे कल्याण साधावे. इतकी साधी अपेक्षा या व्रतात असते. पांढरी शुभ्र फुले आणि बिल्वदले भक्ताच्या प्रेमश्रद्धायुक्त अंतःकरणाची साक्ष म्हणून शिवप्रिय आहेत. भस्म हे सर्व विकार जळून गेल्यावर उरणारे लेपन आणि रुद्राक्ष म्हणजे शिवाचे करुणामय अश्रूच जणू! कापूर, चंदन ही सुगंधी द्रव्ये, फुले आणि आरोग्याला उपकारक असे बिल्वपत्रे, पंचामृताच्या नैवेद्याचे सेवन हे सारेच मानवी जीवनाला उपकारकच. ‘शिव शिव म्हणता वाचे मूळ न राहे पापाचे’.. अशा प्रकारे वाणीही शुद्ध होऊन जाते. दुष्ट विचार पळून जातात आणि अपूर्व शांतीचा अनुभव येतो.
    आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशीसारखीच महाशिवरात्र हा भारतातील बहुसंख्य जनांचा एक अत्यंत प्रिय असा उत्सव आहे, पर्वणी आहे. त्यामुळे तो असंख्य ठिकाणच्या अगणित मंदिरातून मोठ्या उत्साहाने सार्वजनिक स्वरूपातही साजरा होतो. शिवशंभूची बारा ज्योतिर्लिंगे अतिशय प्रसिद्ध आहेत. सौराष्ट्रात सोमनाथ, श्रीशैल्यं इथला मल्लिकार्जुन, उज्जयिनीचा महांकाल, ॐकारेश्वरचा ममलेश्वर, परळीचा वैजनाथ, डाकिनी येथला भीमाशंकर, सेतुबंधाचा रामेश्‍वर, दारुकावनातला नागेश, वाराणशीतला विश्‍वेश, गौतमीतटीचा त्र्यंबक, हिमालयात केदारनाथ, शिवालयात घृष्णेश अशी ही ज्योतिर्लिंगे. त्यांच्या दर्शनासाठी शिवरात्रीला सारी स्थाने गजबजून गेलेली असतात. ‘शंभो हर हर महादेव’, ‘जय जय श्री शंकर’, ‘बं बं भोलानाथ’, ‘शिव शंकर शंभो, हर हर महादेव’ अशा गजराने शिवस्थाने गर्जून उठतात. ‘कैलासराणा शिवचंद्रमौळी फणिंद्रमाथा भ्रुकुटी झळाळी कारुण्यसिंधू भवदुःखहारी, तुजवीण शंभो मज कोण तारी|’ .. म्हणत कुणी शिवउपासक त्याची करुणा भाकत असतात. महेश, उमेश, मंगेश, नागेश, ईश्‍वर, महेश्‍वर, विश्‍वेश्‍वर, रामेश्‍वर, अर्धनारीनटेश्‍वर, उमापती, भवानीपती, पार्वतीपती, विश्वंभर, विश्वनाथ, उमानाथ, रामनाथ, बदरीनाथ, केदारनाथ, केशवनाथ, वैजनाथ, महाकाळ, रुद्र, त्र्यंबक अशा अनेक नामांनी पुकारा करत असतात. चित्तात आनंदकल्लोळ आणि अंतरात प्रीतीचा उमाळा आणि भक्तीचा मळा फुललेला असतो. त्या पंचवदन, पंचवक्र, पंचाननाची चंद्रमौळी, गंगाधर ज्योतिर्मय मूर्ती डोळ्यांपुढे साकार होत असताना हदयात दाटलेला सुगंध अनिवार होत जातो. एक प्रकारची तल्लीन बेहोषी मनाला प्राप्त झालेली असते आणि त्या बेभान अवस्थेत शिवसंगतीने अशिव, अपवित्र असे सारे काही पळून जाते.

शिवमंदिरे ही बहुतेकदा नदी, तलाव, जलाशयाकाठी, समुद्रकिनारी अशी शांत एकांत जागी वसलेली. काही घोर अरण्यात, स्वयंभू लिंगेही असतात. काही पर्वतावरही असतात. विजनवासात, एकांतात रमणारा पण लोकांचे हित साधणारा, कल्याण करणारा हा शुभंकर आद्यदेव. कालिदासासारख्या शिवभक्ताने मेघाला उज्जयिनीला थांबून महाकालाच्या आरतीला उपस्थित राहण्याविषयी सांगितले आहे.

महाशिवरात्र ही माणसाने मन शुद्ध, पवित्र आणि उन्मुक्त बनविण्याचे एक सहज सोपे आनंदसाधन आहे. मृगपक्षिघातक असा निर्दय निषाद मृगांच्या शपथा ऐकून आणि त्यांचे सत्यवचनी वर्तन पाहून त्या पशूंपुढे लोटांगण घालता झाला आणि शिवनाम घेतल्याने, शिवरात्रीच्या पुण्यदिवशी शिवस्मरण केल्याने उद्धरून स्वर्गलोकी गेला. सहज साधे सोपे शिवनाम मुखी ठेवून शिवरात्रीचे महात्म्य जपण्याची परंपरा आपणही चालू ठेवू आणि जीवनात सत्य-शिव-सुंदराचा वसा वसत राहू.