पोटापुरते…

0
102

– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे
माझा नारळाचा धंदा आहे. मला नारळ रिवणहून आणावे लागतात. मी टेंपो घेऊन तिथे जातो. स्वतः गाडी चालवतो. मग ते नारळ गावोगावी विकतो. तेव्हा हा माझा पोटापुरता धंदा.. कसे ऽ बसे ऽ चालते! माझे लक्ष त्याच्या पोटाकडे गेले… त्याचे पोट तर गलेलठ्ठ होते!
दुपारची पावणेतीनची वेळ. डोळ्यावर झापड आली होती. दुपारी दीडला जेवण झाल्यावर थोडा वेळ शतपावली करायची. मग लॅपटॉपवर खेळून झाल्यावर थोडीशी झोप काढणे नित्याचेच काम बनले होते. रविवार असल्याने जेवणाचा बेतही फक्कड झाला होता. साहजिकच पोटाचे स्नायू ताणले गेले होते. डोळ्यावर झोपेची गुंगी चढायला लागलेली!
केवळ १५-२० मिनिटांनी दरवाज्यावरची बेल वाजली. पेशंट आला होता. चडफडतच स्वारीने पेशंटला आत घेतले. त्याने माझ्या कपाळावर पडलेल्या आठीकडे दुर्लक्ष केले. तपासणी झाली, तो गेला. आता ठरवले दरवाजा बंद करायचा. तरीदेखील बेल चालू होती ना!!गरजवंताला दरवाजा बंद करायचा म्हणजे काय? मी दरवाजा बंद केला नाही. कॉटवर जाऊन पहुडलो. पोटाचा घेर उतरला होता. डोळ्यावरची झापडही कमी झालेली.
बरोबर दहा-पंधरा मिनिटांनी परत एकदा बेल वाजली. मी जागाच होतो. तेव्हा यावेळी कपाळावर आठी न आणता मी दरवाजा उघडला. चांगल्या सुटाबुटात पेशंटची स्वारी खुर्चीवर बसली होती. तो बुटातच आत येऊ पाहात होता. मी त्याला थांबवले. स्वारी कुठल्यातरी लग्नाहून माझ्याकडे परस्पर आली होती. त्याचे मोठाले पोट तो भरपूर जेवून आल्याचे सांगत होते.
आल्या आल्या आमचा नायक आपल्या पोटापुरत्या धंद्याबद्दल बोलत होता. साहजिक माझे लक्ष त्याच्या पोटाकडे गेले. लग्नाचे जेवून त्याचे पोट ‘‘पोटापुरते’’ राहिले नव्हते. घेर चांगलाच ऐसपैस झाला होता. चांगल्या खात्यापित्या घरातील होता तो!
‘‘गेले पंधरा दिवस मला खोकला येतोय!’’
वाटलेच त्याला पोटाचा विकार नव्हता. तो बोलतच होता. ‘‘रात्री खोकला झोपू देत नाही. गेल्या पंधरा दिवसात तीन वेळा मी डॉक्टरी सल्ला घेतला’’.
पहिला डॉक्टर म्हणे त्याचा मित्रच होता. त्याच्या औषधाने आराम पडला नाही. दुसर्‍या डॉक्टरीण बाईकडे दोन वेळा जाऊन आला. खोकला चालूच होता. कुणीतरी म्हणे त्याला माझे नाव सांगितले. म्हणाला, ‘ते डॉक्टर चांगले आहेत. त्यांच्याकडे जावा’. हे ऐकून शरीरावर मुठभर मास चढले..! मरगळलेला माझा चेहरा टवटवीत झाला. केलेल्या कौतुकाचा परिणाम मनावर झाला. तशी जबाबदारीही वाढली.
पहिला डॉक्टर आपल्या एअरगनने शुटिंग करत होता, तेव्हा त्याची ती छोटीशी गोळी रोगाच्या मर्मावर लागत नव्हती. तर दुसरी मॅडम डॉक्टर मशिनगननी रोगाची चाळण करत होती. म्हटल्यावर पहिल्या डॉक्टराच्या औषधाने तो रोगी बरा झाला नव्हता अन् मॅडमच्या औषधाने रोग बरा झाला नव्हता! याचा विचार करावाच लागणार होता.
त्याची ती ‘पोटापुरती’ची वटवट चालूच होती. मी पूर्ण जबाबदारीने त्याची तपासणी केली…! कुठेतरी काहीतरी चुकल्याचा आभास होत होता. पूर्वीच्या डॉक्टरांनी दिलेल्या औषधांची प्रिस्क्रिप्शन त्याने आणली नव्हती. तरीही तपासणीनुसार रोगाचे निदान करत त्याला औषधे लिहून दिली. बाहेर त्याचा मुलगा बसला होता. माझे लक्ष त्या दोघांच्या बुटांकडे गेले. दोघांचेही बूट नवीन होते. मी लग्नकार्याला घालत असलेल्या बुटांपेक्षा फक्कड होते… महाग होते. मी ठरवले… तो जर आपल्या पोटापुरत्या धंद्यातून एवढे महागडे बूट घालू शकतो तर मी माझ्या पोटाकडे पाहून त्यानुसार चांगले बूट घ्यायला हवेच. मागे माझा मुलगा म्हणाला, ‘‘डॅडी, तुमचे ते बूट जुन्या वळणाचे, ते बदला. चांगले टोकदार बूट घ्या.’’ त्याच्या बुटांकडे बघत मी त्यावर फेरविचार करायचे मनाशी निश्‍चित केले.
चार दिवसांनी स्वारी परत आली. खोकला काही कमी झाला नव्हता. त्याच्या बोलण्यावरून वाटत होते, त्याचा माझ्यावरचा विश्‍वास कमी झाला होता. पण माझा माझ्यावर पूर्ण विश्‍वास होता. लगेच वेळ न दवडता मी त्याला ‘‘कान, नाक व घसा’’च्या ज्येष्ठ डाक्टरांकडे पाठवले. हे प्रकरण माझ्या हाताबाहेरचे होते. तो मला थोडासा मलूल वाटला.. थोडा थकलेला.. फिकट. त्या दिवशीचा गोरापान चेहरा काळपट वाटत होता. कुठल्याशा एका रोगाची झलक डोळ्यांसमोर आली. हो, कदाचित तो रोग असू शकेल!
व निदान तेच झाले. आता त्याचा घसा बसलेला होता. जबड्याखाली थोडी उभारी आली होती. त्याला घशाचा कँसर झाला होता. रोग अगदी पहिल्या पायरीवर होता. तडकाफडकी सगळ्या तपासण्या झाल्या. ऑपरेशनही झाले. लवकरात लवकर रोगाचे निदान झाल्याने धोका टळला. तो वाचला.
गेल्याच आठवड्यात तो भेटून गेला. येताना चांगले मोठाले पन्नास नारळ घेऊन आला. बरे झाले. देवाने वाचवला. उगाचच त्याचे श्रेय तो मला देत माझे आभार मानत होता. त्याच्या पोटाचा घेर बराच कमी झाला होता.
पोटापुरत्या धंद्याबद्दल तो परत एकदा सांगत होता. पण माझे लक्ष कुठेतरी दुसरीकडेच होते..! हल्ली मलाही खोकला येत होता. मी स्वतः औषधेही घेतली होती. दुसर्‍या डॉक्टरांकडे जायला हवे होते. पण माझे फॅमिली डॉक्टर ज्योतिर्लिंगाच्या भेटीवर होते. आजच ते परतणार होते. हो, वेळ न घालवता त्यांची भेट घ्यायला हवी.
मला थकवा जाणवत होता… थोडी मरगळ आल्यासारखी वाटत होती! पूर्वीचा सावळा चेहरा आरश्यात काळपट वाटत होता. सहज पोटाकडे लक्ष गेले.. पोटाचा घेर कितीतरी कमी झाला होता!!