पेयजल व पर्यावरण रक्षणासाठी म्हादईचा प्रवाह निर्धारित हवा

0
92

>> गोव्यातर्फे लवादासमोर जोरदार युक्तीवाद

पिण्याच्या पाण्याबरोबरच जलसिंचन, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्यान व वन्यजीवांसाठी म्हादई व तिच्या उपनद्यांचे पाणी महत्त्वपूर्ण असून म्हादईचा प्रवाह निर्धारित ठेवण्यासाठी खास लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे मुद्दे काल गोव्याच्यावतीने आत्माराम नाडकर्णी यांनी जललवादासमोर ठासून मांडले. गोव्याला केवळ पिण्यापुरतेच नव्हे तर पर्यावरण व इतर गोष्टींसाठीही म्हादईचा प्रवाह अंत्यत गरजेचा असल्याचा युक्तीवाद ऍड. नाडकर्णी यांनी केला.
म्हादईप्रश्‍नी काल नवी दिल्लीत लवादासमोर सुनावणीला सुरवात झाली. गोव्याच्या साक्षीदाराची उलटतपासणी घेण्यात आली. दुपारी २ वाजेपर्यंत ती पूर्ण करण्यात आली. यावेळी लवादाने साक्षीदारासमोर काही प्रश्‍न उपस्थित केले असता त्याला समर्पक उत्तरे देण्यात आली. यावेळी महाराष्ट्राने मात्र कोणतेही प्रश्‍न विचारण्याचे टाळले.
भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऍड. आत्माराम नाडकर्णी यांनी गोव्याच्या बाजूने प्रभावी बाजू मांडताना काही प्रश्‍नांबाबत आक्षेप नोंदवला. गोव्यासाठी म्हादई व तिच्या उपनद्यांचा प्रवाह नियमित असणे किती महत्त्वपूर्ण आहे याबाबत त्यांनी सबळ पुराव्यानिशी लवादासमोर मुद्देसुदपणे भूमिका मांडली. २६७४ क्यूबीक से.मी. (सीएमएस) म्हादई व उपनद्यांचे पाणी हे पिण्याबरोबरच सिंचन व पर्यावरण जतनासाठी प्रवाह निर्धारित ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी लवादाला पटवून दिले. अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान व वन्यजीवांसाठी पाण्याची मोठी गरज आहे. पर्यावरणीय संवेदनक्षम असलेल्या या भागातील पाण्याची गरज आदी मुद्दे सर्वप्रथम लक्षात घेतले जावेत असा आग्रही युक्तीवाद नाडकर्णी यांनी यावेळी केला.