Home Featured पेपरफुटीमुळे एनटीएकडून ‘नीट’ परीक्षा रद्द

पेपरफुटीमुळे एनटीएकडून ‘नीट’ परीक्षा रद्द

0

देशभरातील 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी होणार

वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नीट’ (यूजी) परीक्षा काल अखेर रद्द करण्यात आली. ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) केंद्र सरकारच्या मान्यतेने घेतला आहे. 3 मे रोजी झालेला नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पेपरफुटीच्या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आहेत. या निर्णयामुळे देशभरातील 22 लाख 79 हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. दरम्यान, पेपरफुटीचा प्रकार समोर आल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह अनेकांनी मोदी सरकारवर टीकास्त्र चालवले आहे.

देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी नीट (यूजी) परीक्षा सर्वात महत्त्वाची मानली जाते. या परीक्षेतील गुणांवरुन वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवता येतो. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) 3 मे रोजी देशभरात नीट 2026 ची परीक्षा घेण्यात आली होती. मात्र या परीक्षेचा पेपर फुटल्याचे दावे केले जात होते. राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने (एसओजी) केलेल्या तपासात एक धक्कादायक वास्तव समोर आले. परीक्षेच्या तब्बल 42 तास आधीच प्रश्नपत्रिका टेलिग्राम आणि व्हॉट्सपवर फिरत होती.

या परीक्षेचा पेपर फुटल्याचे स्पष्ट होताच एनटीएने केंद्र सरकारच्या परवानगीने 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याची घोषणा काल केली. आता ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून, त्याच्या तारखा नंतर जाहीर केल्या जाणार आहेत. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी करावी लागणार नाही. तसेच 3 मे रोजी जिथे परीक्षा दिली तिथेच विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येईल, असे सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांकडून नव्या परीक्षेसाठी शुल्क घेतले जाणार नाही, मात्र नव्या परीक्षेसाठी नवे ओळखपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थी,पालकांनी फक्त एनटीएच्या सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन केंद्राकडून करण्यात आले आहे.

राजस्थानमध्ये 13 जणांचा चौकशी
सीबीआयकडून हे प्रकरण गंभीरतेने घेण्यात आले असून तातडीने कारवाईची चक्रे फिरली आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 13 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंतच्या तपासानुसार, जयपूरमध्ये अटक करण्यात आलेला मनीष हाच या संपूर्ण प्रकरणामागील मुख्य सूत्रधार असल्याचे दिसून आले अहे.

10 लाखांचा पेपर 15 लाखांना विकला
तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, 1 मे रोजीच हा पेपर फुटला होता. शुभम खैरनारने 10 लाख रुपयांना ही प्रश्नपत्रिका विकत घेतली आणि ती पुढे 15 लाख रुपयांना विकल्याचा संशय आहे. या व्यवहारानंतर ही प्रश्नपत्रिका इन्स्टाग्रामवर लीक झाली आणि 22 लाख विद्यार्थ्यांचे कष्ट वाया गेले.

नाशिक ते हरियाणा
नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची पहिली कॉपी नाशिकमध्ये लीक झाली, तिथून ती हरियाणात पोहोचली. हरियाणात या पेपरचे 10 संच तयार करण्यात आले आणि त्यानंतर बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीरपर्यंत ही साखळी पसरली. या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून 16 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, राजस्थानचा मनीष हा या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे मानले जात आहे.

एनटीएने काय म्हटले आहे?
एनटीएने 12 मे रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, तपास यंत्रणांनी सादर केलेल्या अहवालात नीट परीक्षेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. 3 मे रोजी झालेल्या परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता उरली नसल्याचे आणि परीक्षेची गोपनीयता भंग झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. परीक्षेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही परीक्षा रद्द करणे आवश्यक असल्याचे ‘एनटीए’ने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. फेरपरीक्षेमुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना होणाऱ्या त्रासाची संस्थेला जाणीव आहे. मात्र, परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींकडे दुर्लक्ष करणे हे शैक्षणिक व्यवस्थेसाठी अधिक घातक ठरले असते, असेही एनटीएने म्हटले आहे.

सीबीआय चौकशीचे आदेश
या संपूर्ण नीट पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी आता सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभाग) कडे सोपवण्यात आली आहे. एनटीएने या प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणातील कथित अनियमिततेची आणि आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी भारत सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. एनटीए या चौकशीत पूर्ण सहकार्य करेल आणि सर्व आवश्यक कागदपत्रे व पुरावे उपलब्ध करून देणार आहे.

पेपरफुटी प्रकरणी नाशिकमधून एकास अटक
नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणात नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने नाशिकमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. संशयित आरोपीने बीएचएमएसचे शिक्षण घेतले असल्याची माहिती असून तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील रहिवासी आहे. सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. काल दुपारी 12 च्या सुमारास संशयिताला अटक करण्यात आली. शुभम खैरनार असे संशयिताचे नाव असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.

असा रंगला अटकेचा थरार
पोलिसांपासून वाचण्यासाठी शुभमने चक्क आपले संपूर्ण केस कापून टक्कल केले होते आणि कपडेही बदलले होते. मंगळवारी तो देवदर्शनासाठी जात असताना पोलिसांनी रस्त्यातच सापळा रचला. सुरुवातीला नवीन ‘लूक’मुळे तो ओळखू आला नाही, मात्र पोलीस अंमलदारांनी त्याला शिताफीने ओळखले आणि अवघ्या एक तासात त्याला ताब्यात घेतले.

आता पुढे काय?
सविस्तर नियमावली

  1. पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही : ज्या विद्यार्थ्यांनी मे 2026 च्या परीक्षेसाठी आधीच नोंदणी केली होती, त्यांचा डेटा आणि उमेदवारी फेरपरीक्षेसाठी जशीच्या तशी ग्राह्य धरली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्याची किंवा नोंदणी करण्याची अजिबात आवश्यकता नाही.
  2. परीक्षा केंद्र बदलणार का? : विद्यार्थ्यांनी मे महिन्यातील परीक्षेसाठी जी केंद्रे निवडली होती, तीच केंद्रे फेरपरीक्षेसाठी कायम ठेवली जाणार आहेत. केंद्रांच्या बाबतीत कोणताही बदल करण्यात येणार नाही.
  3. शुल्काबाबत मोठा निर्णय : एनटीएने विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. फेरपरीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी यापूर्वी भरलेले परीक्षा शुल्क पूर्णपणे परत केले जाणार आहे. फेरपरीक्षेचा संपूर्ण खर्च एनटीए स्वतःच्या अंतर्गत निधीतून करणार आहे.
  4. फेरपरीक्षा कधी होणार? : परीक्षेची नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. फेरपरीक्षेचे वेळापत्रक आणि नवीन प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याबाबतची माहिती लवकरच अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.