पॅन-आधारकार्ड लिंक करण्यास मुदतवाढ

0
143

>> केंद्र सरकारकडून ३० जून २०२१ पर्यंत मुदत

आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडण्यासाठी केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा मुदत वाढवण्यात आली आहे. आयकर विभागाच्या अधिकृत सोशल मीडियावरून ही माहिती देण्यात आली असून ही मुदत ३० जून २०२१पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कोविड महामारीच्या काळात नागरिकांना येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन ही मुदतवाढदिली असल्याचे म्हटले आहे. ही मुदत अगोदर ३१ मार्च २०२१ पर्यंत होती. मात्र ती आता ३० जून २०२१ पर्यंत वाढवून दिली असून नागरिकांना कोणत्याही शुल्काशिवाय किंवा दंडाशिवाय आधार क्रमांक पॅन क्रमांकाला या तारखेपर्यंत जोडता येणार आहे.

दरम्यान, काल दि. ३१ मार्च हा कोणत्याही दंडाशिवाय आधार आणि पॅन क्रमांक एकमेकांना लिंक करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे नागरिकांची सरकारी अधिकृत वेबसाईटवर काल झुंबड उडाली होती. नागरिकांनी काल शेवटच्या दिवशी सायबर कॅफे, महा ई-सेवा केंद्र आणि इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणी पॅनकार्ड आधार जोडणीसाठी गर्दी केलेली दिसली. एकाच वेळी अनेक युझर्सनं लॉग इन केल्यामुळे आयकर विभागाचा सर्व्हर डाऊन झाला होता. त्यामुळे वेबसाईटवर आलेल्या नागरिकांना निराश व्हावे लागले होते. मात्र आयकर विभागाकडून पुन्हा एकदा मुदत वाढ मिळाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

अनेकदा मुदतवाढ
या अगोदरही केंद्राकडून आधार आणि पॅन क्रमांक लिंक करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली गेली होती. गेल्या मंगळवारी २३ मार्च २०२१ रोजी लोकसभेत संमत करण्यात आलेल्या वित्त विधेयक २०२१ मध्ये नव्या कलमानुसार याविषयीची तरतूद करण्यात आलीय. यानुसार, पॅन क्रमांक आधारला लिंक नसेल तर व्यक्तीला १००० रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. याशिवाय त्या व्यक्तीला पॅन क्रमांक अवैध घोषित झाल्यामुळे इतर अडचणींचा सामनाही करावा लागू शकतो. मात्र सध्या मुदतवाढ दिल्यामुळे अनेक नागरिकांनी सुस्कारा सोडला आहे.