Home Featured युगास्त

युगास्त

0

हिंदी चित्रपटसृष्टीचा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र अखेर आपल्याला सोडून गेला. बारा दिवसांपूर्वी उतावळ्या प्रसारमाध्यमांनी त्याच्या निधनाची बातमी खातरजमा न करता पसरवली त्यानंतर बारा दिवसांनी काल त्याची प्राणज्योत मालवली. कला वा क्रीडाक्षेत्रातील ‘सेलिब्रिटी’ व्यक्तिमत्त्वाचा बहुधा एकेरी उल्लेख केला जातो, कारण ती व्यक्ती आपलीच आहे, आपल्या घरच्यांपैकी एक आहे, असा जिव्हाळा तिला जनसामान्यांकडून लाभलेला असतो. धर्मेंद्रलाही जनतेचे हे प्रेम उदंड लाभले. त्याच प्रेमाच्या बळावर तर हा अभिनेता तब्बल सहा दशके बेभरवशाच्या चंदेरी दुनियेत तग धरून राहू शकला. चित्रपटसृष्टीचे रंग ह्या काळात दिवसेंदिवस बदलले, नाना ऋतू बदलले. कृष्णधवल चित्रपटांपासून सामाजिक चित्रपटांपर्यंत, मग सत्तरच्या दशकातील मल्टीस्टारर चित्रपट, देशभक्तीचे मध्ये आलेले वारे, मग आलेले ॲक्शनपट.. चित्रपटसृष्टी बदलत गेली, परंतु ह्या बदलत्या काळातही हा रांगडा गडी आपल्या तितक्याच तरल अभिनयाच्या बळावर तग धरून राहिला. शैलीदार नाट्यमय संवादफेकीने त्याने चित्रपटरसिकांना सदैव शिट्ट्यांचा दणदणाट करायला लावले. एकेकाळचा भरभक्कम देहयष्टीचा हा पंजाबी अभिनेता तितक्याच कोमल, हळुवार भूमिकांमध्येही शोभूनच दिसे. मुळात त्याचे ह्रदय कवीचे हेोते. तो ऊर्दू शायरीही करायचा. लुधियाणाजवळच्या एका खेड्यात वाढलेला हा शेतकऱ्याचा मुलगा धर्मेंद्र केवलकृष्ण देओल दिलीपकुमारला पडद्यावर पाहत पाहत आपणही ह्या क्षेत्रात येण्याची स्वप्ने पाहात होता. त्याकाळी त्याने चणेफुटाणे खाऊन, गॅरेजमध्ये राहूनही दिवस काढले. छोटीमोठी कामे केली. शेवटी चित्रपटसृष्टीत उतरायच्या निर्धाराने त्याने 58 साली ‘फिल्मफेअर’ मासिकाने आयोजित केलेल्या स्पर्धेत भाग घेतला. विजेत्याला चित्रपटामध्ये संधी दिली जाणार होती. त्याने विजेतेपद पटकावले, पण तो चित्रपट काही बनलाच नाही. शेवटी त्यानंतर दोन वर्षांनी अर्जुन हिंगोरांनींच्या ‘दिल भी तेरा, हम भी तेरे’ मध्ये संधी मिळाली. मग यशाची कमान हळूहळू चढत गेली. भक्कम देहयष्टीचा पण हसरा, भावूक दिसणारा हा अभिनेता बघता बघता प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला. शोले, यादोंकी बारात, मेरा गाव मेरा देश, चुपके चुपके, फूल और पत्थर अशी हिट चित्रपटांची फटाक्यांची माळच त्याने लावली. चाहत्यांना वेड लावलेच, पण भारताची तेव्हाची ‘ड्रीम गर्ल’ हेमामालिनी त्याच्या प्रेमात पडली आणि दुनियेची पर्वा न करता त्याने तिला स्वीकारले. पण एवढे करूनही त्याने स्वतःची प्रतिष्ठा कायम राखली आणि त्याची चित्रपट कारकीर्दही अबाधित राहिली. धर्मेंद्रच्या वागण्याबोलण्यातील साधेपणा आणि चेहऱ्यावर कायम विलसणारे सुहास्य ह्यामुळे आयुष्याच्या उत्तरकाळातही त्याची लोकप्रियता टिकून होती. हिरोपदाला ओहटी लागताच नव्वदच्या दशकात त्याने चरित्र अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीला नवे वळण दिले आणि प्रकृती साथ देत नसताना कालपावेतो आपल्या प्रसन्न हसऱ्या व्यक्तिमत्त्वाने आणि बोलक्या डोळ्यांनी चित्रपटसृष्टीतील आपला आब कायम राखला. अलीकडे हेमामालिनीने भाजपची मथुरेची खासदार म्हणून राजकारणात पाऊल टाकले, परंतु ते मोदी लाटेवर स्वार होऊन. त्याच्या दहा वर्षांआधी कोणतीही लाट नसताना धर्मेंद्रने बिकानेरमधून भाजपतर्फे लोकसभेची निवडणूक लढवून जिंकली होती. परंतु संसदेतील अनुपस्थितीमुळे त्याच्यावर टीका झाली आणि राजकारण हा आपला प्रांत नव्हे हे कळून चुकल्याने त्याने त्या क्षेत्राला वेळीच रामराम ठोकला. नंतरच्या काळात तऱ्हेतऱ्हेच्या रिअलिटी शोमध्ये त्याला बोलावणी यायची आणि त्याच्या नुसत्या तेथील उपस्थितीने वातावरण भारून जायचे. कलाकारांच्या येणाऱ्या पिढ्यांना त्याने खूप काही शिकवले. त्याला पाहूनच सलमान खान बॉडीबिल्डिंगकडे वळला होता. योग्य वेळी धर्मेंद्रने आपली दुसरी पिढीही आपल्या क्षेत्रात उतरवली. सनीला त्याने ‘बेताब’ मधून वाट मोकळी करून दिली, तर त्यानंतर बारा वर्षांनी ‘बॉबी’ला ‘बरसात’मधून पडद्यावर आणले. मुलांचे सोडा, पण धर्मेंद्रचा करिष्मा मात्र कायम राहिला. अगदी कालपरवापर्यंत त्याने चंदेरी पडद्यावरील आपल्या अस्तित्वाने पडदा व्यापून टाकलेला दिसे. त्याचा अखेरचा चित्रपट ‘इक्कीस’ येत्या नाताळला येणार आहे. त्यात अमिताभचा नातू अगस्त्या नंदा मुख्य भूमिकेत आहे. पन्नास पन्नास वर्षे एखाद्या क्षेत्रामध्ये टिकून राहणे हे मुळीच सोपे नाही आणि कलाक्षेत्रामध्ये तर जवळजवळ अशक्यप्राय आहे. काळ बदलतो, समाज बदलतो, त्याच्या आवडीनिवडी बदलतात. परंतु हे सगळे बदल होत असतानाही धर्मेंद्र नावाचा हा पहाड चंदेरी पडद्यावर भक्कमपणे उभाच होता. आता तो आपल्यात नसेल, पण त्याची ती धिप्पाड अंगयष्टी, परंतु बोलके डोळे आणि मुलायम हास्य त्याची आठवण कायम ठेवील.