Home Featured येष्ठ अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन

येष्ठ अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन

0

>> वयाच्या 89 व्या वर्षी निधन; बॉलिवूड कलाकारांकडून शोक व्यक्त

31 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या काळात धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. ते गेल्या काही काळापासून वयोमानानुसार जडावलेल्या काही आजारांनी ग्रस्त होते. यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याची बातमी समोर आली होती. या काळात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अनेक बॉलिवूड कलाकार त्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. त्या दरम्यानच्या काळात त्यांच्या प्रकृती अस्वास्थापासूनच वेगवेगळ्या बातम्या माध्यमांमध्ये पसरत होत्या. अनेक अफवाही पसरलेल्या होत्या, ज्या त्यांच्या कुटुंबीयांनी नाकारल्या होत्या. त्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि डॉक्टरांनी त्यांना घरीच उपचार सुरू ठेवण्याचा सल्ला दिला; पण काल उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

धर्मेंद्र यांच्या जुहूमधील घराबाहेर दुपारी 1 वाजताच्या सुमारास एक रुग्णवाहिका आली. यनंतर घराबाहेर बॅरिकेडिंग आणि सुरक्षा वाढवण्यात आली. दुपारी 1.10 वाजता धर्मेंद्र यांचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत नेण्यात आले. त्यांच्यावर विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. देओल कुटुंबीयांनी आणि चाहत्यांनी साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याला निरोप दिला. सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी त्यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सलीम खान, संजय दत्त, आमिर खान, सलमान खान, अक्षय कुमार हे कलाकार धर्मेंद्र यांच्या अंत्यविधीला उपस्थित होते.

धर्मेंद्र यांना दोन पत्नींकडून एकूण सहा मुले आहेत. त्यात पत्नी प्रकाश कौर यांच्याकडून सनी देओल, बॉबी देओल, विजेता देओल आणि अजिता देओल, तर हेमा मालिनी यांच्याकडून ईशा देओल आणि आहाना देओल अशी मुले आहेत.

‘टॅलेंट हंट’मधून सुरू झाला प्रवास
धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी ब्रिटिश भारतातील पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव धरम सिंह देओल होते. त्यांचे वडील शाळेत मुख्याध्यापक होते. धर्मेंद्र यांनी एकदा सुरैयाचा ‘दिल्लगी’ हा चित्रपट एका चित्रपटगृहात पाहिला. त्यानंतर त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यांनी सलग 40 दिवस हा चित्रपट पाहिला होता. एकदा धर्मेंद्र यांना समजले की फिल्मफेअर नव्या कलाकारांच्या शोधात आहे. त्यांनी अर्ज भरला आणि टॅलेंट हंटमध्ये निवड झाल्यावर ते मुंबईत आले.

‘शोले’मधून लोकप्रियतेच्या शिखरावर
धर्मेंद्र यांनी 1960 च्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. धर्मेंद्र यांनी ॲक्शन, कॉमेडी, लव्ह स्टोरी अशा प्रत्येक शैलीतील सिनेमे केले आणि प्रेक्षकांची मने जिंकली. 1970 च्या दशकात धर्मेंद्र ‘ॲक्शन हिरो’ म्हणून इतके लोकप्रिय झाले की लोक त्यांना ‘ही-मॅन’ म्हणू लागले. 1975 मध्ये आलेला ‘शोले’ हा चित्रपट धर्मेंद्र यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. या चित्रपटाने त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली, त्याचबरोबर सिनेमातील ‘बसंती’ म्हणजेच हेमा मालिनी यांची त्यांच्या खऱ्या आयुष्यात एंट्री झाली. ‘सीता और गीता’ मधील त्यांची दुहेरी भूमिका असो वा ‘चुपके चुपके’ हा त्यांचा विनोदी चित्रपट असो; त्यांनी प्रत्येक भूमिका उत्तमरित्या वठवली. धर्मेंद्र यांनी प्रत्येक पात्राने लोकांची मने जिंकली.

300 हून अधिक चित्रपटांत अभिनय
धर्मेंद्र यांनी जवळपास 300 हून अधिक सिनेमांमध्ये काम केले होते. वयाची नव्वदी गाठली तरी ते बॉलिवूडमध्ये सक्रिय होते. 1960 साली अभिनयात पदार्पण केलेल्या धर्मेंद्र यांनी 6 दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. धर्मेंद्र हे ‘इक्कीस’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते. हाच त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. धर्मेंद्र यांचे अलीकडेच रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि तेरी बातों में ऐसा उलझा जिया हे दोन सिनेमे रिलीज झाले होते. दोन्ही सिनेमांना बॉक्स ऑफिसवर सुपरहिट यश मिळाले होते.

अनेक पुरस्कारांचे मानकरी
धर्मेंद्र यांना 2012 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. धर्मेंद्र वयाच्या 89 व्या वर्षीही चित्रपटसृष्टीत सक्रिय होते. धर्मेंद्र यांचे दोन चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेले नाहीत. ते ‘इक्कीस’ व ‘मैने प्यार किया फिर से’ मध्ये झळकणार आहेत.

सहा दशके प्रेक्षकांचे मनोरंजन
धर्मेंद्र यांनी आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीत अनेक बॉलिवूड सिनेमे केले. त्यांच्या अभिनयाने त्यांनी गेली सहा दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या जाण्यानं मनोरंजनसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे. धर्मेंद्र यांच्या फिल्मी कारकिर्दीबद्दल सांगायचे झाल्यास, ‘फिल्मफेअर’ मॅगझिनच्या पहिल्या टॅलेंट हंट स्पर्धेचे ते विजेते ठरलेले. मग त्यांनी अर्जुन हिंगोरानी यांच्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’मधून अभिनय करिअरची सुरुवात केली. नंतर 1961 मध्ये आलेल्या ‘शोला और शबनम’नंतर त्यांना चांगलीच ओळख मिळाली. त्यानंतर ते 1962 मध्ये आलेल्या ‘अनपढ’मध्ये दिसले. 1963 मध्ये ‘बंदिनी’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आले. धर्मेंद्र यांच्या करिअरमध्ये हा एक महत्वाचा टप्पा ठरला.

एका युगाचा अंत : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले असून, कुटुंबीयांसह चाहत्यांना संवेदना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले आहे की, धर्मेंद्रजींचे निधन हे भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत आहे. ते एक प्रतिष्ठित अभिनेता होते ज्यांनी प्रत्येक भूमिकेत वेगळी छाप सोडली. विविध प्रकारच्या भूमिका निभावत त्यांनी असंख्य लोकांची मने जिंकली. त्यांच्या साधेपणासाठी, विनम्रतेसाठी आणि स्वभावासाठीही ते तितकेच लोकप्रिय होते. या दु:खद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांप्रती, मित्रपरिवाराप्रती आणि लाखो चाहत्यांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना.