पूर्णवेळ राज्यपाल देण्याची कॉंग्रेसची राष्ट्रपतींकडे मागणी

0
106

गोव्याला पूर्णवेळ राज्यपालांची गरज असून राष्ट्रपतींनी गोव्यासाठी पूर्णवेळ राज्यपालांची नेमणूक करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. श्री. कामत व श्री. चोडणकर यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून ही मागणी केली. आज भाजप सरकारच्या बेजबाबदार व असंवेदनशील कारभारामुळे गोमंतकीयांची स्थिती दयनीय झाली आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी गोव्यासाठी पूर्णवेळ राज्यपालांची नेमणूक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

कोविडमुळे गोमंतकीय संकटात आहेत. त्यातच तौक्ते चक्रीवादळाचे संकट ओढवले. राज्यात १,५४,४१९ जणांना कोरोनाचा संसर्ग झालेला असून २५९७ जणांचा मृत्यू झाला असल्याचे पत्रात नमूद केले आहे. तौक्ते वादळामुळे राज्याचे सुमारे १४६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याची हवाई पाहणी करण्याचे टाळले आहे. तसेच गोव्यासाठी केंद्राने कोणतीच मदत जाहीर केलेली नसल्याचेही पत्रात म्हटले आहे.