कोरोनाने कर्ती व्यक्ती गेल्यास कुटुंबाला अर्थसाहाय्य

0
140

>> मुख्यमंत्र्यांची घटक राज्य दिनी घोषणा

>> कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी योजना

राज्यातील एखाद्या कुटुंबातील कमावती व्यक्ती वा आर्थिकदृष्ट्या मागास कुंटुबातील व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे अनाथ बनलेल्या मुलांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री अनाथ आधार योजना सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ३५ व्या घटक राज्य दिनानिमित्त जनतेला संबोधित करताना केली.

राज्यात कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होत आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांचा बळी गेला असून अनेक कुटुंबे संकटात सापडली आहेत. कोरोनामुळे झालेली जीवितहानी भरून काढणे सोपे नाही. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबांना साहाय्य केले जाणार आहे. राज्य सरकारने कुटुंबातील कमावती व्यक्ती, आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये आर्थिक साहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे. ही आर्थिक साहाय्य योजना लवकरच अधिसूचित केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री अनाथ आधार योजना
कोरोनामुळे संकटात सापडलेल्या मुलांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री अनाथ आधार योजना सुरू केली जाणार आहे. ही योजना महिला व बालकल्याण खात्याकडून राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अनाथ विद्यार्थ्यांना मासिक आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. याच योजनेच्या माध्यमातून १० वी आणि पुढील वर्गात शिक्षण घेणार्‍या अनाथ बनलेल्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिला जाणार आहे. बालसंगोपन केंद्रांसाठी १८ वर्षे वयोगटासाठी आर्थिक साहाय्य दिले जात आहे. त्यात दुरुस्ती करून आता २१ वर्षे वयोगटापर्यंत आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविडमुळे आर्थिक संकटात सापडलेल्यांना साहाय्य करण्यासाठी तयार केलेल्या सर्व योजनांची राज्यात अंमलबजावणी केली जाणार असून असून गरजूंना लाभ मिळवून दिला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

वादळातील नुकसानग्रस्तांच्या
आर्थिक साहाय्यास सुरूवात

तौक्ते या चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. या वादळाने तीन जणांचा बळी घेतला. शेती, बागायत, घरे, सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. वादळाने बळी घेतलेल्या तीन जणांच्या कुटुंबीयांना आर्थिक साहाय्य करण्यात आले आहे. घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना आर्थिक साहाय्य देण्याचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत साधारण ७० टक्के जणांना आर्थिक साहाय्य करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

चक्रीवादळ, कोरोना महामारीच्या काळात काम करणार्‍या आर्थिकदृष्ट्या मागास पंचायतींना ५० हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात काम करण्यासाठी पंचायतींना सामग्री खरेदी करण्याची मुभा दिली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

स्वयंपूर्ण गोवा योजना लवकरच कार्यरत
कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर स्थगित ठेवण्यात आलेली स्वयंपूर्ण गोवा योजना लवकरच पुन्हा कार्यान्वित केली जाणार आहे. राज्यातील मनुष्यबळाच्या विकासावर भर दिला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

१८-४४ वयोगटाचे ३ पासून लसीकरण
राज्यात येत्या ३ जून २०२१ पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यास प्रारंभ केला जाणार आहे. दोन वर्षाखालील मुलांचे पालक, या वयोगटातील इतर आजार असलेल्या नागरिकांना लसीकरणासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच, रिक्षा चालक, मोटरसायकल पायलट, टॅक्सी चालक, दिव्यांग, खलाशांना कोविड लसीकरणासाठी प्राधान्य दिले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.