पुलवामा हल्ला हा काळा दिवस : सावईकर

0
167

>> हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण, मान्यवरांच्या प्रतिक्रिया

१४ फेब्रुवारी २०१९ या दिवशी जम्मू आणि काश्मीरच्या पुलवाम येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांना घेऊन जाणार्‍या सुरक्षा दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मद या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे ४० जवान हुतात्मा झाले होते. ही घटना म्हणजे भारतीय इतिहासातील एक काळा दिवस होता, अशी प्रतिक्रिया दक्षिण गोव्याचे माजी खासदार व भाजप नेते नरेंद्र सावईकर यानी काल दै. नवप्रभाशी बोलताना दिली.

या दुर्दैवी घटनेला रविवारी २ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते. पुढे बोलताना सावईकर म्हणाले की, पुलवामा हल्ल्यानंतर पाकवर हल्ला करून मोदी सरकारने आपली ताकद व कणखरपणा याचे दर्शन घडवले. पुलवामा हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने कणखर भूमिका घेत पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट शहरावर हवाई हल्ला करून तेथील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले अशी प्रतिक्रिया भारताचे माजी संरक्षणमंत्री व माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी दै. नवप्रभाशी बोलताना दिली. पुढे ते म्हणाले की, पुलवामा हल्ला ही एक अत्यंत दु:खद, धक्कादायक व भारताच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी घटना होती. त्यामुळे या हल्ल्याच्या तोडीस तोड असे उत्तर देण्याची गरज होती. आणि प्रत्युत्तरादाखल भारताने २६ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट शहरावर हल्ला करून तेथील कित्येक अतिरेक्यांना कंठस्नान घातले. या हल्ल्यापूर्वी ऊरी येथे १८ सप्टेंबर २०१६ रोजी काश्मीरमधील सुरक्षा दलांवर मोठा अतिरेकी हल्ला झाला होता. त्यानंतर भारताने प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानवर २८ सप्टेंबर २०१६ रोजी सर्जिकल स्ट्राइक केला होता असे सांगून पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या बालाकोट शहरावर हवाई हल्ले केले. याद्वारे भारताने पाकबरोबरच संपूर्ण जगाला आपली ताकद दाखवून दिली असे पर्रीकर म्हणाले.

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी, पुलवामा येथील हल्ला म्हणजे भारतीय सुरक्षेवरील हल्ला होता. आणि त्याला चोख असे प्रत्युत्तर देण्याची गरज होती व ते काम मोदी सरकारने बालाकोटवर हवाई हल्ले करून फत्ते केल्याचे सांगितले.
पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर म्हणाले की, देशावर सतत हल्ले होत आलेले आहेत. मात्र, मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी प्रत्युत्तर दिले.
माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनी, पुलवामा हल्ल्यानंतर मोदी सरकारने हवाई हल्ले करून पाकला जो धडा शिकवला त्याची नोंद अमेरिकेसारख्या देशालाही घ्यावी लागल्याचे सांगितले.