पुलवामा येथील चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा

0
46

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात काल शुक्रवारी सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या (एलईटी) एका जिल्हा कमांडरसह पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. तर लष्करातील एक जवान शहीद झाला, असे पोलिसांनी सांगितले.
या पिसरात दहशतवादी लपून बसल्याची खबर सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी राजपोरा परिसरातील हांजीन गावाला वेढा घालून शोधमोहीम हाती घेतली. सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्ांना शरण येण्यास सांगितले मात्र दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. या चकमकीत एक जवान जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता तेथे तो शहीद झाला.

त्यानंतर घटनास्थळी अधिक कुमक रवाना करण्यात आली आणि त्यानंतर झालेल्या धुमश्चक्रीत पाच दहशतवादी ठार झाले. हे दहशतवाही एलईटीशी संबंधित होते. चकमकीत ठार झालेला निशाझ लोने ऊर्फ खिताब हा जिल्हा कमांडर होता. या चकमकीत ठार झालेल्यांमधील एक दहशतवादी पाकिस्तानचा होता, मात्र अद्याप त्याची ओळख पटलेली नाही.

दहशतवाद्यांकडून द्रोनचा वापर
जम्मू-काश्मीरमध्ये द्रोनच्या माध्यमातून शस्त्रे, स्फोटके व अमली पदार्थ टाकण्यात पाकिस्तानची लष्कर ए तोयबा व जैश ए महंमद या संघटना सामील आहेत, असे जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी म्हटले आहे. साडेपाच किलो स्फोटकांसह जम्मूत दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. ही स्फोटके लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याने आणली होती व त्यात पाकिस्तानचा हात होता. त्याला पोलिसांनी जाबजबाबानंतर अटक केली असून गर्दीच्या ठिकाणी स्फोट करण्याचा हेतू त्यात होता असे स्पष्ट झाल्याचे सिंग यांनी सांगितले. काश्मीरातील स्थानिक तरुणांची दहशतवादासाठी भरती केली जात आहे पण पूर्वीपेक्षा ते प्रमाण कमी झाले आहे असे श्री. सिंग यांनी सांगितले. आम्ही युवकांना सकारात्मक दिशा देत असून दहशतवादात सामील युवकांची संख्या आणखी कमी होईल असे श्री. सिंग यांनी सांगितले. विविध भागात दहशतवादी गट कार्यरत असून दहशतवाद्यांना संपवण्यासाठी आणखी तीव्र मोहिमा राबवण्यात येतील असाही इशारा यावेळी श्री. सिंग यांनी दिला.