Home Featured महिलेच्या खून प्रकरणी संशयिताला ठाणे-मुंबई येथेे अटक

महिलेच्या खून प्रकरणी संशयिताला ठाणे-मुंबई येथेे अटक

0

कुडणे-साखळी येथे मंगळवारी शैला संजय घाडी या महिलेचा खून करून फरार झालेल्या सागर रमेश राऊळ (34 वर्षे, रा. मलईवाडी, शिरशिंगे, सावंतवाडी) याला ठाणे-मुंबई येथे ताब्यात घेण्यात डिचोली पोलिसांना यश आले. खुनाच्या घटनेनंतर अवघ्या 24 तासांत डिचोली पोलिसांनी सागर याला ताब्यात घेतले. त्यानंतर ट्रान्झिट रिमांडवर त्याला गोव्यात आणले जाणार आहे.

सविस्तर माहितीनुसार, मंगळवारी दुपारच्या सुमारास चिकणे-कुडणे येथील शैला संजय घाडी नामक महिलेचा खून झाल्याची माहिती डिचोली पोलिसांना मिळाली. सागर राऊळ याने केलेल्या बेदम मारहाणीत सदर महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर संशयिताने घरातील सोनसाखळी आणि मृत महिलेचा मोबाईल फोन घेऊन पळ काढला होता. एवढेच नव्हे तर संशयिताने मृत महिलेच्या मोठ्या मुलीला फोन करून खून केल्याची माहिती दिली. तसेच तिला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली.

फरार झालेल्या सागर राऊळच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक विजय राणे सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथके स्थापन करण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक विराज धाउसकर आणि आकाश परवार यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी सावंतवाडी, कोल्हापूर आणि मुंबई परिसरात शोधमोहीम राबवली.

तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि महाराष्ट्रातील मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या क्राइम ब्रांच युनिट-4 यांच्या मदतीने संशयिताचा माग काढण्यात आला. त्यात संशयित ठाणे परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

डिचोली पोलीस, महाराष्ट्र क्राइम ब्रांच आणि स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने संयुक्त कारवाई करत सागर रमेश राऊळ याला 20 मे रोजी ठाणे जिल्ह्यातील चेना ब्रिजजवळील द्वारका हॉटेल परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
यानंतर काशीगाव पोलीस ठाण्यात सायंकाळी 5.30 वाजता त्याला अधिकृत अटक करण्यात आली. त्याला 21 मे रोजी मीरा-भाईंदर, ठाणे येथील न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संशयिताला लवकरच गोव्यात आणण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विविध कलमांखाली गुन्हा दाखल
या प्रकरणी शुभम संजय घाडी यांच्या तक्रारीवरून डिचोली पोलिसांनी गुन्हा क्रमांक 64/2026 नोंदवत भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 332(अ), 103, 309(4) आणि 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल केला.