पुरावा लपवण्यासाठी सासूचाही खून

0
198

>> फातोर्डा खूनप्रकरणी संशयितांनी दिली कबुली

चंद्रावाडा, फातोर्डा येथील मिंगेल मिरांडा व त्यांची सासू कॅटरिना पिंटो या दोघांचा तीक्ष्ण हत्याराने खून केल्यानंतर पळून गेलेल्या रवीकुमार सादा, आकाश घोष व आदित्यकुमार या तिघा संशयित मारेकर्‍यांना गोव्यात आणल्यानंतर फातोर्डा पोलिसांनी खुनासाठी वापरलेला चाकू जप्त केला. तसेच मिंगेल मिरांडा यांचे चोरून नेलेले तीन मोबाइल संच, एक वालंकिणीचे लॉकेट असलेली सोन्याची साखळी हस्तगत केल्याची माहिती पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिली. दरम्यान, मिंगेल मिरांडा यांचा खून करताना कॅटरिना यांनी बघितल्यामुळे पुरावा लपविण्यासाठी त्यांचाही खून केला अशी कबुली संशयित आरोपींनी दिली. या खुन्यांना तात्काळ अटक करून आणल्याबद्दल या परिसरात पोलिसांच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, मिंगेल मिरांडा यांच्या मुलाची ४ बँक पासबुके, त्यात कॅनरा बँकेची दोन व बँक ऑफ इंडियाची दोन पासबुके, मिंगेल मिरांडाचे यांच वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, आधारकार्ड पोलिसांनी हस्तगत केली असून आरोपी आदित्यकुमार याचे सीमकार्ड जप्त केले आहे. ते तिघे संशयित आरोपी ठेकेदार मिंगेल मिरांडा यांच्याकडे कामाला होते. कामाचे पैसे देण्यात न आल्याने व वारंवार मागूनही ते न दिल्याने संतापून खून केल्याची कबुली आरोपी रवीकुमार, आकाश घोष व आदित्यकुमार यांनी पोलिसांसमोर दिली.
दरम्यान, मिंगेल मिरांडा व कॅटरिना पिंटो या दोघांना पोलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिले व दोघांवर दफनभूमीत अंत्यसंस्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले.