राज्यात सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ७०० पार

0
156

राज्यात चोवीस तासांत नवे ६९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून आणखी एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ७०४ झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ८०३ एवढी झाली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संख्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष चालविले आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची सध्याच्या संख्या ४००च्या आसपास आली होती. आता सध्याच्या रुग्णाची संख्येने सातशेचा टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्र व इतर राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन, रात्रीच्यावेळी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र गोव्यात परराज्यातून येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढत आहे. तसेच परराज्यातून येणार्‍यांवर कोणतेही बंधन अजूनपर्यंत घालण्यात आलेले नाही. परराज्यातून आलेले तिघे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५५,६७६ एवढी झाली आहे. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये डिचोली येथील एका ४९ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेले आणखी ३९ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण ५४ हजार १६९ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२७ टक्के एवढे आहे.

चोवीस तासांत नवीन १,७७८ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ३.८८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन ३० जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन १९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.

पणजीत १०७ रुग्ण
पणजीत उच्च आरोग्य केंद्राच्या कक्षेतील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १०७ इतकी आहे. मडगावातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ९६ झाली आहे. चिंबल आरोग्य केंद्राच्या कक्षेतील सध्याच्या कोरोना रुग्णांची ५८ झाली आहे. पर्वरीत सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ३७ रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ४१ रुग्ण, म्हापसा ४३ रुग्ण, वास्कोत ४३ रुग्ण, काणकोण २३ रुग्ण, कासावली ४३ रुग्ण, कुठ्ठाळीत २९ रुग्ण आहेत. आणखी १ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.