पुडुचेरीत बंड

0
186

कॉंग्रेसचा दक्षिण भारतातील एक बालेकिल्ला काल ढासळला. पुडुचेरीमधील कॉंग्रेस – द्रमुक आघाडीचे सरकार अल्पमतात गेले. काही दिवसांपूर्वी सरकारपक्षातील दोघा आमदारांनी राजीनामे दिले होते आणि परवा सोमवारी आणखी एकाने व लागोपाठ मंगळवारी दुसर्‍याने राजीनामा दिल्याने चार जण साथ सोडून गेल्याने मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांचे सरकार जवळजवळ कोसळल्यात जमा आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आजच पुडुचेरीच्या दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या भेटीच्या आधल्या दिवशीच तिथले त्यांचे सरकार अल्पमतात येणे हे नामुष्कीजनक आहे, परंतु राजीनामा देणार्‍यांपैकी दोघेजण भारतीय जनता पक्षात सामील झाले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या राजीनामानाट्याचे सूत्रधार कोण आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भारतीय जनता पक्षाने आपले विस्तारवादी धोरण काही लपवून ठेवलेले नाही. जास्तीत जास्त राज्ये आपल्या पक्षाच्या सत्तेखाली आणण्यासाठी भाजपाचा आटापिटा चालला आहे. सध्या पश्‍चिम बंगालवर त्या पक्षाने लक्ष केंद्रित केलेले आहेच, दक्षिण भारतामध्ये आपले अस्तित्व निर्माण करण्याचाही जोरदार प्रयत्न भाजपने गेल्या काही काळापासून चालवलेला आहे. पुडुचेरी हा छोटासा संघप्रदेश, परंतु तामीळनाडूला जोडून तो असल्याने त्या राज्यातील निवडणुकांबरोबरच पुडुचेरीतही निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजपाने छोट्याशा पुडुचेरीमध्येही चंचुप्रवेश करण्यावर लक्ष केंद्रित केलेले दिसते. अशाच प्रकारे ईशान्येतील विरोधकांची सर्व सरकारे भारतीय जनता पक्षाने बंडखोरी घडवून आणून आपल्या अमलाखाली आणली आहेत. परिणामी मेघालयात एनपीपीसोबत, नागालँडमध्ये एनडीपीपीसोबत, सिक्कीममध्ये एसकेएमसोबत, त्रिपुरामध्ये आयपीएफटीसोबत अशा प्रकारच्या आघाड्या करून तेेथे भाजप सत्तेत सामील आहे. आसाम, अरुणाचल आणि मणिपूरमध्ये तर पक्षाची सरकारे आहेतच.
छोट्या छोट्या राज्यांमध्ये, संघप्रदेशांमध्ये आधी तिथल्या प्रादेशिक पक्षाशी हातमिळवणी करायची आणि नंतर तो पक्ष संपवून स्वतःचा विस्तार करायचा ही भाजपची चाल फार जुनी आहे. गोव्यामध्ये मगो पक्षाला संपवून भाजपने असाच चंचुप्रवेश केला होता हेही सर्वज्ञात आहेच. त्यामुळे हीच नीती सर्वत्र अवलंबिण्याचे सत्र आजही सुरू दिसते. सध्या लक्ष केंद्रित केलेल्या पश्‍चिम बंगालमध्ये देखील भाजपने तृणमूल कॉंग्रेसमधील एकेका रथी – महारथीला आपल्याकडे वळवून घ्यायला, राजीनामे द्यायला लावायला सुरूवात केलेली आहे. भाजपचे मिशन बंगाल यावेळी जोरात आहे. यंदाच निवडणूक होणार असलेल्या तामीळनाडूमध्ये देखील भाजपने आक्रमक पावले टाकायला सुरूवात केलेली आहे. त्यामुळे शेजारच्या छोट्याशा पुडुचेरीतही निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी झाल्याने भाजपच्या ते पथ्थ्यावरच पडणार आहे.
राहुल गांधी कर्नाटकचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. शिवकुमार यांच्या कन्येच्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी तेथे जाणार आहेत. तत्पूर्वी त्यांची पुडुचेरी भेट पूर्वनियोजित आहे. परंतु राहुल यांच्या भेटीच्या आधल्या दिवशीच त्यांचे तेथील सरकार अल्पमतात गेल्याने त्यांच्यासाठी अनवस्था प्रसंग तेथे ओढवला आहे. पुडुचेरीच्या राज्यपालपदी असलेल्या किरण बेदी तर भाजपच्या हस्तक असल्यागतच वावरत आल्या आहेत. त्यांनी मध्यंतरी तेथे भाजपच्या तीन आमदारांना नियुक्त करून मताधिकारही दिले आहेत.
भाजपची विस्तारवादी पाऊले देशभरामध्ये पडत असताना महाराष्ट्र, पंजाब, केरळ, पश्‍चिम बंगाल, दिल्ली, उडिशा, राजस्थान, छत्तीसगढ अशी काही राज्ये अजूनही विरोधी पक्षांचे झेंडे फडकावीत उभी आहेत. त्यातील काही राज्यांतही सत्तांतरे घडवून आणण्याचे प्रयत्न झाले, परंतु ती सरकारने पुरून उरली आहेत. अर्थात आज भाजपची केंद्रात स्वबळावरची भक्कम सत्ता आहे. कॉंग्रेस जेव्हा केंद्रात सत्तेवर होती, तेव्हाही आपल्या एकाधिकारशाहीच्या बळावर सर्व राज्यांमध्ये बंडांळ्या, लाथाळ्या घडवून आणून तेथे आपली सरकारे प्रस्थापित करण्यात कॉंग्रेसची मंडळीही वाकबगार होती. त्यामुळे राजकारणात कोणी कोणाला दोष देण्यात काही अर्थ नाही वा आपले सरकार पाडले हो, म्हणून अकांडतांडव करणेही सहानुभूती मिळवून देणार नाही. परंतु अशा प्रकारे जेव्हा राजकीय अस्थिरता उत्पन्न केली जाते, तेव्हा जनतेने अशा गोष्टींचा विचार केला पाहिजे, जो दुर्दैवाने केला जात नाही. उगवत्या सूर्याला दंडवत हीच सर्वांची आज मानसिकता बनली आहे. त्यामुळे नीतीमत्ता, तत्त्वे, संकेत हे सगळे पायदळी तुडवून केवळ सत्ता हेच प्राधान्य बनते तेव्हा त्याला अटकाव जनतेने तरी कसा करायचा?