कोरोना विषाणूची ब्राझील व द. आफ्रिकेतील नवी रूपेही भारतात

0
193

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या रूपा पाठोपाठ भारतामध्ये आता ब्राझीलमध्ये तसेच दक्षिण आफ्रिकेत आढळलेले कोरोनाचे नवे प्रकारही अवतरले असल्याची कबुली भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने काल दिली. ब्राझीलमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या रूपाचा एक रुग्ण व दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या अवताराचे चार रुग्ण भारतात आढळून आले आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी ही माहिती दिली. ह्या रुग्णांना व त्यांच्या संपर्कात आलेल्यांना विलगीकरणाखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

सार्स – कोव्ह २ च्या दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या रूपांतराला वेगळे काढण्याच्या प्रयत्नात आयसीएमआरची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी असून कोरोनाच्या ब्राझिलीयन रूपाला वेगळे काढून विलगीकरण करण्यात आले आहे, असे डॉ. भार्गव यांनी सांगितले.

भारतात सध्या कोरोनाच्या ब्रिटनमध्ये आढळलेल्या रूपाचा संसर्ग झालेले १८७ रुग्ण असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, या रुग्णांपैकी कोणीही दगावले नसल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या सर्व रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून उपचार केले गेले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही वेगळे ठेवून तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. ब्रिटनमध्ये आढळलेल्या विषाणूपेक्षा दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये आढळलेल्या विषाणूंची ही नवी रूपे वेगळी आहेत का याचा अभ्यास केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या विषाणूचे रूप ४४ देशांत पसरले असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या चार रुग्णांमध्ये दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या रूपाचा संसर्ग आढळला, त्यापैकी १ अंगोला, १ टांझानिया व २ दक्षिण आफ्रिकेतून आले होते अशी माहिती त्यांनी दिली.

ब्राझीलमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या रूपाचा संसर्ग १५ देशांमध्ये झाला असून भारतात मात्र नुकताच त्याचा पहिला रुग्ण सापडल्याचे भार्गव यांनी सांगितले.
देशात आजपर्यंत ८७ लाख ४० हजार ५९५ जणांना कोरोनावरील लस दोन टप्प्यांत देण्यात आली असून ८५ लाख ६९ हजार ९१७ जणांना लशीचा पहिला डोस मिळाला आहे असे त्यांनी सांगितले. दुसरा डोस १ लाख ७० हजार ६७८ जणांनी घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.

चौदा राज्यांनी पहिला डोस ७० टक्के नोंदणीकृत आरोग्य कर्मचार्‍यांना दिल्याची माहिती यावेळी देताना, त्या राज्यांचे कौतुक व्हायला हवे असे आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले. दिल्लीमध्ये मात्र केवळ ४३ टक्के आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण होऊ शकले असल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्यातील १०० टक्के आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण
गोव्याने आरोग्य कर्मचार्‍यांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण केले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. इतर राज्यांत हे प्रमाण ६० टक्के असल्याचे ते म्हणाले. काही राज्यांत जेमतेम १० टक्के आरोग्य कर्मचार्‍यांचेच लसीकरण होऊ शकल्याची माहितीही त्यांनी दिली. देशात केरळमध्ये ६१,५५० आणि महाराष्ट्रात ३७,३८३ कोरोना रुग्ण असून एकूण रुग्णांच्या ७२ टक्के रुग्ण असल्याचे त्यांनी सांगितले.