पित्याकडून दोन चिमुकल्या मुलांची हत्या

0
11

>> कांदोळी येथे पती-पत्नीतील वादामुळे घडली घटना

>> हत्येनंतर वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

ज्यो फर्नांडिस या ४२ वर्षीय पित्याने शनिवारी रात्री आपली पोटची मुलगी अनानिया फर्नांडिस (१३) व मुलगा जोझेफ फर्नांडिस (८) यांचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून त्यांची हत्या केली. त्यानंतर आपणही त्याच दोरीने घराच्या बाजूला गळफास घेत आत्महत्या केली. बार्देश तालुक्यातील कळंगुट मतदारसंघात येणार्‍या कांदोळी पंचायत क्षेत्रातील ओर्डा-सांताक्रूज वाड्यावर ही हृदय हेलावणारी घटना घडली.

ज्यो फर्नांडिस हे गोमंतकातील प्रसिद्ध तियात्रीस्ट होते. तर त्यांची पत्नी ही एका खासगी विद्यालयामध्ये शिक्षिका म्हणून काम करत आहे. मुलगी दोनापावला येथील एका नामांकित हायस्कूलमध्ये तर मुलगा जोझेफ फर्नांडिस हा पर्वरी येथील खासगी विद्यालयात शिकत होता. पत्नी ईरिनिया फर्नांडिस परेरा ह्या गावातील एका लग्नकार्याला गेल्या असताना ज्यो याने मुलांची हत्या करून आत्महत्या केली.

घरातील वादांमुळे कृत्य
नोकरी नसल्यामुळे ज्यो हा बेकार होता. त्यामुळे ज्यो फर्नांडिस आणि शिक्षिका पत्नी ईरिनिया फर्नांडिस-परेरा यांच्यात नेहमी उडणारे खटके, घरात होणारे वादविवाद हे दोन्ही मुलांच्या हत्येसाठी आणि ज्यो याच्या आत्महत्येसाठी मुख्य कारण ठरल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आढळून आले आहे. या वादातून त्रासलेल्या ज्यो यांनी पत्नीला अद्दल घडविण्यासाठी मुलांनाही संपवल्याचा निष्कर्ष चौकशीतून पोलिसांनी काढला आहे. मुलांची हत्या केल्यानंतर वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच शनिवारी रात्री मुलांची हत्या करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ज्योचा मृतदेह दाट झाडीत
ज्यो यांच्या भावाची पत्नी रविवारी सकाळी फर्नांडिस यांच्या घरालगत असलेल्या मूळ घराच्या मागील बाजूस गेल्या असता त्यांना बाजूच्या दाट झाडीत ज्यो यांचा मृतदेह लोंबकळत असलेला दिसला. याची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या मदतीने मृतदेह काढून शवचिकित्सेसाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.

दरम्यान उत्तर गोवा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन, निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी घटनास्थळी जाऊन तपासाच्या सूचना केल्या. रविवारी महानिरीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी घटनास्थळी भेट दिली.

पत्नी शिक्षिका
ज्यो यांची पत्नी ईरिनिया फर्नांडिस-परेरा या मेरशी येथील एका शैक्षणिक संस्थेत शिक्षिका आहेत. तर त्यांची दोन्ही मुले शिक्षण घेत होती. मुलगी नानीस इयत्ता ९ वीत शिक्षण घेत होती. ती शिक्षणात तसेच विविध कलाप्रकारात अत्यंत हुशार असल्याचे सांगितले जाते. तर मुलगा जोझेफ हा इयत्ता दुसरीत शिकत होता.
कांदोळीत घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधितांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवचिकित्सेसाठी पाठवून देण्यात आले आहे. त्या अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. या घटनेची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबीयांसमवेत चर्चा करण्यात आली आहे.

चौकशीअंती कारण स्पष्ट होईल अशी माहिती कळंगुट पोलिसांनी यावेळी दिली. या दोन्ही मुलांची हत्या शनिवारी दुपारी १२ वाजल्यानंतर झाली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दुपारी १२ वाजल्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद करण्यात आला होता. त्यावेळी काहीजणांना ज्यो फर्नांडिस अखेरचा दिसला होता. ज्यो फर्नांडिस यांनी काही वर्षांपूर्वी उत्तर गोवा जिल्हा पंचायतीची पोटनिवडणूक लढवली होती. त्यात त्यांना अपयशाचा सामना करावा लागला होता. ते बराच काळ तियात्र अकादमीवर सेवेत होते. नंतर त्यांनी तेथील कामाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सुमारे आठ ते नऊ वर्ष ते बेकार होते. मात्र, ते सामाजिक कामासाठी तत्पर असायचे असे स्थानिकांनी सांगितले. यावेळी माजी सभापती तोमाझीन कार्दोज यांनी घटनास्थळी भेट दिली.

पत्नी घरी परतल्यानंतर घटना झाली उघड

शनिवारी इरिनिया फर्नांडिस परेरा ह्या गावातील एका विवाह समारंभाला गेल्या व दुपारी ३ वाजता घरी परतल्या. मात्र त्यांना घराचा दरवाजा बंद असल्याचे आढळून आले. त्यांनी दरवाजा उघडण्यासाठी मुलांना हाका मारल्या. जवळपास तीन तास प्रयत्न केल्यानंतर घराच्या मागील बाजूला असलेला लोखंडी दरवाजा तोडून त्यांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी मुले घरांत मृतावस्थेत पडल्याचे त्यांना दिसले तर पती ज्यो हे घरातून गायब असल्याचे आढळून आले. याबाबत तातडीने कळंगुट पोलिसांना माहिती देण्यात आली. कळंगुट पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवचिकित्सेसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले. त्यानंतर ज्यो फर्नांडिस यांचा शोध सुरू करण्यात आला.