पावसाने उडवली दाणादाण

0
12

>> रस्ते पाण्याखाली; सखल भागांत पाणीच पाणी;
>> राजधानी पणजीसह शहरे व ग्रामीण भाग जलमय

सोमवारी सकाळपासून कोसळणार्‍या मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. जोरदार पावसामुळे राजधानी पणजीसह विविध शहरे आणि ग्रामीण भागांतील रस्ते पाण्याखाली गेल्याच्या घटना घडल्या. सतत कोसळलेल्या पावसामुळे राज्यातील नदी, नाले, ओढ्यांनाही पूर आला. तसेच अनेक ठिकाणी शेतीत पाणी साचून राहिल्याचे पाहायला मिळाले. म्हापशात संरक्षक भिंत धावत्या कारवर कोसळल्याने एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

पैकुळ येथे रगाडा नदीवर तात्पुरता उभारलेला पदपूलही वाहून गेला. अनमोड घाटातही दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. दिवसभरात २.०७ इंच पावसाची नोंद झाली असून, सांगेत सर्वाधिक ४.८९ इंच पाऊस पडला.

४ जुलैपासून जोरदार पाऊस कोसळणार असून, त्याचा जोर ६ जुलैपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज रविवारीच हवामान खात्याने वर्तवला होता. हा अंदाज अखेर खरा ठरला. काल सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. त्यानंतर अवघ्या काही तासांतच सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर तास-दीड तास पावसाने उसंत घेतली आणि पुन्हा जोरदार बरसण्यास सुरुवात केली.

राजधानी पणजी जलमय
बांबोळी येथील भुयारी मार्ग पाण्याखाली गेल्याने गोमेकॉजवळ महामार्गावर पाणी साचून राहिल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. या भुयारी मार्गातील अतिउच्च दाबाच्या विद्युत पॅनेलजवळही पाणी पोहोचले होते. मात्र नंतर पाणी ओसरल्याने धोका टळला. पणजीतील १८जून मार्गावरही पाणी तुंबल्याने रस्ता पाण्याखाली गेला होता. पणजी बसस्थानक ते मेरशी जंक्शन मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू होती. त्यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मेरशी ते पणजी पायी प्रवास करावा लागला. तसेच पणजी बसस्थानक परिसरातही पाणी साचून राहिल्याने रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे त्या ठिकाणी देखील वाहतूक कोंडी झाली. बसमधील प्रवाशांना जीव मुठीत घेऊन गुडघाभर पाण्यातून रस्ता शोधत तो पार करावा लागला.

पाटो परिसराला नदीचे स्वरूप
पणजीतील पाटो परिसराला काल पुरामुळे नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. धो-धो कोसळणार्‍या पावसामुळे पाटो परिसर पूर्णपणे जलमय झाला होता. संस्कृती भवनसमोर तर पुरच आला होता. त्यामुळे लोकांना तेथून चालत जाणेही कठीण झाले होते.

घरांत शिरले पाणी
पेडणे, सत्तरी, काणकोण, सांगे, केपे या तालुक्यांत काही घरांत पाणी शिरून नुकसान होण्याच्या घटना घडल्या. मोपा विमानतळ पसिरातील घरांतही पाणी शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली.

नमोड घाटात दरड
अनमोड घाटातील दूधसागर मंदिराच्या जवळ दरड कोसळण्याची घटना काल घडली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबली. दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. या घाटात अन्य ठिकाणी देखील दरड कोसळण्याची भीती असून, सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

झाडे कोसळली, वीजप्रवाह खंडित
राज्यात कित्येक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी वीज तारांवर झाडे कोसळल्याने वीजप्रवाह खंडित होण्याच्या घटना घडल्या.

सांडपाणी प्रकल्पाची भिंत कोसळली
वास्कोतील काटे बायणा येथील सांडपाणी प्रकल्पाची संरक्षक भिंत जोरदार पावसाच्या तडाख्यात कोसळली. त्यात तीन दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. सुमारे २५ मीटर लांब इतकी संरक्षक भिंत रस्त्यावर आडवी झाली. उर्वरित भिंतही कोसळण्याच्या मार्गावर असून, त्याआधी उपाययोजना आखावी अशी मागणी होत आहे.

आजही जोरदार पावसाची शक्यता
मंगळवारी देखील राज्यभरात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. दि. ६ ते ८ जुलैपर्यंत काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दि. ५ व ६ जुलै रोजी गोव्याला नारंगी रंगाचा इशारा देण्यात आलेला आहे.

पैकुळचा पदपूल गेला वाहून
सत्तरी तालुक्यात गेल्या वर्षी आलेल्या महापुरावेळी पैकुळ येथे रगाडा नदीवरील पूल वाहून गेला होता. त्या ठिकाणी तात्पुरता पदपूल उभारण्यात आला होता. हा पूल देखील कालच्या जोरदार पावसामुळे पाण्याबरोबर वाहून गेला. त्यामुळे पैकुळच्या ग्रामस्थांवर संकट ओढवले असून, गावाचा इतर भागांशी संपर्क तुटला आहे. रगाडा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने मुरमुणे-गुळेली दरम्यानचा रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे मुरमुणे, पैकुळ, शेळ, धडा, मेळावली, मैगीणे आदी भागात जाणारे ग्रामस्थ गुळेली येथे अडकून पडले होते.

म्हापशात संरक्षक भिंत कोसळून महिला गंभीर

दत्तवाडी-म्हापसा येथील सेंट ब्रिटो हायस्कूलची संरक्षक भिंत सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान एका कारवर कोसळून वाहनाचा चक्काचूर झाला. या घटनेत अर्चना नाईक या वीज खात्यातील कर्मचारी गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना पेडे-म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेत सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले.
म्हापसा अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावरून म्हापसा वीज खात्यात काम करणार्‍या कर्मचारी अर्चना नाईक या आपल्या कारने (क्र. जीए-०८-ई-५०७६) जात असताना सेंट ब्रिटो हायस्कूलची भिंत कारवर पडली. त्यात कारचा चेंदामेंदा झाला. अर्चना नाईक यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले आहे.