पाठीशी उभे राहा

0
156

काश्मीरमधील शोपियानमध्ये गेल्या शनिवारी लष्कराच्या ताफ्यावर स्थानिकांनी प्राणघातक हल्ला चढवला. स्वप्रतिकारार्थ लष्कराला गोळीबार करावा लागला, त्यात दोघे नागरिक ठार झाले. आता या गोळीबाराबद्दल लष्करी अधिकार्‍यांवर खुनाचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिले आहेत. काश्मीरमध्ये देशद्रोह्यांच्या तुष्टीकरणाचे अत्यंत घाणेरडे राजकारण कसे केले जाते याचे हे ताजे उदाहरण आहे. मेहबुबा मुफ्तींच्या पीडीपीची नीती अगदी सुरवातीपासून अशीच दुटप्पी राहिलेली आहे. सत्तेवर आल्या आल्या मसरत आलमची सुटका करणार्‍या पीडीपीकडून दुसरी अपेक्षा तरी काय करायची? येथे प्रश्न आहे भाजपाचा. राज्यात पीडीपीसोबत सत्ता उपभोगणार्‍या भाजपला मेहबुबांची ही कृती मान्य आहे काय हा खरा सवाल आहे. नुकत्याच मुफ्तीबाई संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशी या घटनेसंदर्भात बोलल्या आणि त्यांनी संबंधित लष्करी अधिकार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी केली. सीतारमण बाईंनी त्यांना या घटनेच्या चौकशीची आणि कारवाईची ग्वाहीही देऊन टाकली आहे. सरकारने असे बचावात्मक राहण्याचे कारणच काय? लष्कराचे मनोबल खच्ची करण्याचा हा प्रकार आहे आणि त्याचा देशभरातून निषेध झाला पाहिजे. पीडीपीच्या या देशद्रोह्यांच्या खुशामतखोरीच्या प्रयत्नांना कॉंग्रेस आणि माकपसारख्या राष्ट्रीय पक्षाने काश्मीरमध्ये साथ देणेही आश्चर्यकारक म्हणावे लागेल. अशाने देशाचे हात दुबळे होत असतात. देशाशी केली गेलेली ही घोर प्रतारणा आहे. शोपियानमधील घटनाक्रम तर स्पष्ट आहे. तेथे आधी लष्कराच्या वाहनांवर दगडफेक झाली. वाहनांच्या काचा फोडल्या गेल्या, एका जखमी जेसीओला ठेचून ठार मारण्याचा प्रयत्न झाला, वाहनांना आग लावण्याचा प्रयत्न झाला. जवानांचे प्राण संकटात आले तेव्हाच त्यांना गोळीबाराचे टोकाचे पाऊल उचलावे लागले. आजवर लष्करावर असे असंख्य हल्ले दगडफेक करणार्‍या स्थानिक गुंडांकडून झाले. प्रत्येकवेळी अत्यंत संयमाने लष्कराने त्यांना तोंड दिले आहे. प्रसंगी जवानांनी हकनाक आपले प्राण गमावले आहेत. ज्या पराकोटीच्या सहनशीलतेने लष्कर काश्मीरमध्ये हा देश अखंडित राहण्यासाठी झटत असते त्याला तोड नाही. लष्कराच्या प्रत्येक कृतीवर तेथे बारीक नजर ठेवली जाते. दोष शोधले जातात. त्याविरुद्ध रान पेटवले जाते. वर्षानुवर्षे हे चालत आले आहे. येणारा नवा दिवस आणि येणारा प्रत्येक नवा क्षण कसा असेल, आपल्यापुढे काय वाढून ठेवलेले आहे याबाबतच्या अनिश्‍चिततेच्या वातावरणामध्ये लष्करी जवान काश्मीर खोर्‍यातील नाक्यानाक्यावर, रस्तोरस्ती अहोरात्र, ऊन पावसात खंबीरपणे पाय रोवून उभे असतात. आपले शिर तळहातावर ठेवूनच ते तेथे वावरत असतात, याची जाणीव सरकारने ठेवणे आवश्यक आहे. केवळ काश्मीरमधील सत्ता वाचवण्यासाठी देशद्रोह्यांना साथ दिली जाऊ नये. लष्कराला विशेषाधिकार असतात, मग तरी त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा पोलीस कसा काय नोंदवू शकतात? पीडीपीने खोर्‍यातील दगडफेक करणार्‍यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णयही घेतला आहे. मेहबुबा आणि इतर काश्मिरी नेते पाकिस्तानच्या पाठबळावर आणि पैशांवर उड्या मारणार्‍या तेथील पत्थरबाज गावगुंडांचा उल्लेख नेहमीच ‘हमारे बच्चे’ असा करीत असतात. मोठमोठे दगड हाती घेऊन लष्करी जवानांचा जीव घ्यायला निघालेले ‘बच्चे’ कसले? मध्यंतरी मेजर गोगोईने एका पत्थरबाजालाच आपल्या जीपला बांधून निवडणूक अधिकार्‍यांचा जीव वाचवला. तेव्हाही त्याच्याविरुद्ध काश्मीरमध्ये रान पेटवले गेले. काश्मीरमधील देशद्रोह्यांकडून दुसरी अपेक्षा नाही, परंतु प्रश्न तेथील सत्ताधार्‍यांचा आहे. खुशामतखोरीची ही नीती त्यांना स्थानिक लोकप्रियता मिळवून देईल हा त्यांचा भ्रम आहे. हे भस्मासुर त्यांच्यावरच उलटायला वेळ लागणार नाही. त्यामुळे मेहबुबा मुफ्तींनी भलत्या भ्रमात राहू नये हे श्रेयस्कर. एकेकाळी अब्दुल्ला पिता – पुत्रांनी हेच चालवले होते. आजही त्यांचे हेच ढोंग चालले आहे. काश्मिरी नेत्यांमध्ये हा दुटप्पीपणा ठासून भरलेला आहे. काश्मीर प्रश्न बिकट करण्यात मोठे योगदान तर या ढोंगी नेत्यांचे आहे. त्यांच्या दबावापुढे किती झुकायचे आणि किती ठाम राहायचे याचा सारासार विचार भाजपा नेतृत्वाने आणि केंद्र सरकारने केला पाहिजे. आजच्या घडीस गरज आहे लष्कराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची. ज्या कठोरपणे दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम गेले वर्षभर चालली आहे, तेवढ्याच कठोरपणे या दगडफेक करणार्‍या पाक समर्थित गावगुंडांना कायद्याचा हिसका दाखवला गेला तरच त्यांचे हे जनआंदोलनाचे देखावे बंद पडतील.