पाचही नगरपालिकांवर भाजपचा झेंडा ः तानावडे

0
174

मडगाव, मुरगाव, सांगे, केपे व म्हापसा या पाचही पालिकांवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचे प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
तानावडे म्हणाले की, मडगाव नगरपालिका क्षेत्र हे मडगाव, फातोर्डा व कुडतरी या तीन मतदारसंघांत येते. मात्र, वरील तिन्ही मतदारसंघांत भाजपचा आमदार नाही. पण तसे असले तरी मडगाव पालिकेवरही भाजप विजय मिळवणार आहे. मुरगाव, केपे व म्हापसा येथे भाजपचे वर्चस्व असून तेथे विजय मिळवणे पक्षाला कठीण जाणार नाही. सांगे येथे भाजपचा आमदार नसला तरी तेथेही भाजपचाच विजय होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
भाजपचा स्थापना दिन नुकताच साजरा करण्यात आल्याचे सांगून त्यानिमित्त आता १४ तारखेपर्यंत कार्यक्रम होणार असल्याचे ते म्हणाले.

पक्ष स्थापनादिनाचे औचित्य साधून या सप्ताहात पक्ष कार्यकर्त्यांनी राज्यातील सुमारे ५० हजार घरांवर भाजपचा झेंडा फडकवल्याचे तानावडे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील जास्तीत जास्त लोकांनी कोविड लस घेण्यासाठी पुढे यावे, म्हणून १४ रोजी भाजप कार्यकर्ते जागृती करणार असल्याचे तानावडे यांनी सांगितले.