अष्टपैलू रवींद्र न्यूझीलंड कसोटी संघात

0
211

न्यूझीलंडने भारतीय वंशाचा अष्टपैलू रचिन रवींद्र याचा इंग्लंड दौर्‍यासाठी कसोटी संघात समावेश केला आहे. या दौर्‍यात न्यूझीलंडचा संघ भारताविरुद्ध आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामनादेखील खेळणार आहे. २० सदस्यीय संघात जेकब डफी व डेव्हॉन कॉनवे या कसोटी क्रिकेट न खेळलेल्या अननुभवी खेळाडूंचादेखील समावेश करण्यात आला आहे. २०१६ साली आपला शेवटचा कसोटी सामना खेळलेला जलदगती गोलंदाज डग ब्रेसवेल तसेच डावखुरा फिरकीपटू ऐजाझ पटेल यांना देखील संघाची दारे उघडण्यात आली आहेत. टी-ट्वेंटी विश्‍वचषक नजरेसमोर ठेवून जलदगती गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याची निवड करण्यात आलेली नाही.

इंग्लंडविरुद्धचे दोन कसोटी सामने झाल्यानंतर संघातील सदस्यांची संख्या २० वरून १५ पर्यंत कमी करण्यात येणार आहे. टी-ट्वेंटी तसेच एकदिवसीय कारकिर्दीला दणक्यात सुरुवात केल्यानंतर कॉनवे याचा कसोटी संघात स्थान मिळणार हे जवळपास पक्के होते. वेलिंग्टनचा २१ वर्षीय अष्टपैलू रचिन याच्यात भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचे न्यूझीलंडने ठरवले आहे. न्यूझीलंड ‘अ’ संघाकडून खेळताना वेस्ट इंडीज ‘अ’विरुद्ध केलेले शानदार प्रदर्शन. मोहम्मद अब्बास व शाहीन आफ्रिदीसारख्या गोलंदाजांचा समावेश असलेल्या पाकिस्तान ‘अ’विरुद्धचे अर्धशतक तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोलंदाजीत व फलंदाजीत दाखवलेले सातत्यामुळे निवड समितीने त्याला स्थान दिले आहे. वेगवान गोलंदाजीत अधिक वैविध्यता आणण्यासाठीच जेकब डफी व ब्रेसवेल यांना निवडण्यात आल्याचे न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी सांगितले आहे. इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना २ जूनपासून लंडन येथे व दुसरा सामना एजबेस्टन येथे १० जूनपासून खेळविला जाणार आहे. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८ ते २२ जून या कालावधीत होणार आहे.

न्यूझीलंड कसोटी संघ ः केन विल्यमसन, टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, कॉलिन डी ग्रँडहोम, जेकब डफी, मॅट हेन्री, काईल जेमिसन, टॉम लेथम, डॅरेल मिचेल, हेन्री निकोल्स, ऐजाझ पटेल, रचिन रवींद्र, मिचेल सेंटनर, टिम साऊथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग व विल यंग.