पाच पालिका निवडणुकीसाठी आज होणार अर्जांची छाननी

0
138

>> एकूण ५३२ जणांचे अर्ज

राज्यातील मडगाव, मुरगाव, म्हापसा, सांगे आणि केपे या पाच नगरपालिका मंडळाच्या येत्या २३ एप्रिल २०२१ रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी एकूण ५३२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या उमेदवारी अर्जांची छाननी आज शुक्रवार दि. ९ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १० वाजल्यापासून केली जाणार आहे.

शेवटच्या दिवशी ९५ अर्ज
राज्यातील पाच नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी आणखी ९५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. म्हापसा पालिकेत एकूण १२२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मडगाव पालिकेत १३१ उमेदवारी अर्ज, मुरगाव पालिकेत १५७ उमेदवारी अर्ज, केपे पालिकेत ७६ उमेदवारी अर्ज आणि सांगे पालिकेत ४६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर एकंदर राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज १० एप्रिल रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ३ वाजेपर्यंत मागे घेतले जाऊ शकतात. त्यानंतर निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.

पोटनिवडणुकीसाठी १० अर्ज
दोन ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी एकूण १० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सर्वण कारापूर पंचायतीच्या प्रभाग २ मध्ये ६ उमेदवारी अर्ज आणि वेळ्ळी पंचायतीच्या प्रभाग ४ मध्ये ४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.