गोवा मराठी अकादमीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन
गोमंतकाचे आद्य ज्ञात ग्रंथकार कृष्णदास शामा यांनी आजपासून बरोबर पाचशे वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी श्रीमद्भागवताच्या दशमस्कंधावर ओवीबद्ध मराठी श्रीकृष्णचरित्र लेखनास प्रारंभ केला, त्या केळोशी येथील श्री शांतादुर्गेच्या मूळ मंदिराच्या ठिकाणी काल त्या ऐतिहासिक वारशाच्या स्मृती गोवा मराठी अकादमीने जागविल्या. गोव्यातील ज्येष्ठ पत्रकार व वाङ्मयीन अभ्यासक, दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश वासुदेव प्रभू लिखित व नोशन प्रेस, चेन्नई प्रकाशित ‘गोमंतकाचे आद्य ज्ञात ग्रंथकार कृष्णदास शामा’ हे पुस्तक स्थानिक केळोशीवासीयांच्या उपस्थितीत श्रीशांतादुर्गेच्या मूळ स्थानी अर्पण करण्यात आले. यावेळी गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत, उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत गवस, जिल्हा पंचायत सदस्य सुनील गवस, मराठी अकादमीचे पदाधिकारी तसेच स्थानिक केळोशीवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री. प्रभू यांनी कृष्णदास शामा यांच्याविषयी व त्यांच्या श्रीकृष्णचरित्राविषयी उपस्थितांना माहिती दिली. गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी गोवा मराठी अकादमी श्रीकृष्णचरित्र लेखनाच्या पंचशताब्दी वर्षामध्ये आयोजित करणार असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
तिथीनुसार वैशाख शुद्ध त्रयोदशी शके 1448 म्हणजेच तारखेनुसार दि. 25 एप्रिल 1526 रोजी केळोशी गावचे ग्रामस्थ असलेल्या शामराज ऊर्फ कृष्णदास शामा यांनी आपले गुरू ‘पंढरपूरनिवासी गोविंद’ यांच्या प्रेरणेने श्रीमद्भागवताच्या दशमस्कंधावर 3123 ओव्यांचा व 19 अवस्वर म्हणजे अध्यायांचा ओवीबद्ध मराठी ग्रंथ लिहिला. गोव्यातील हा सर्वांत जुना ज्ञात ग्रंथ असून त्याच्या तीन पोथ्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यापैकी एक प्रत लोलये (काणकोण) येथे एका विहिरीत सापडली, दुसरी प्रत उज्जैन येथील सिंधिया प्राच्यविद्या संस्थेत आढळली, तर तिसरी फादर थॉमस स्टीफन्स लिखित रोमी लिपीतील प्रत ब्राग येथील ग्रंथालयात आहे. ह्यापैकी सर्वांत जुन्या पोर्तुगालमधील मूळ प्रतीचा आधार घेऊन श्री. प्रभू यांनी ‘गोमंतकाचे आद्य ज्ञात ग्रंथकार कृष्णदास शामा’ हे पुस्तक लिहिले आहे.
कृष्णदास शामा यांनी ग्रंथात नमूद केले आहे की आपण श्रीकृष्णचरित्र केळोशी येथील शांतादुर्गेच्या मंदिरात बसून लेखनास प्रारंभ करीत आहोत. 1526 मध्ये हे कृष्णचरित्र त्या मंदिरात लिहिले गेले व त्यानंतर इ. स. 1560 साली इन्क्विझिशनच्या स्थापनेनंतर झालेल्या धर्मच्छळावेळी शांतादुर्गेचे ते केळोशी येथील मूळ मंदिर जाळण्यात आले. त्यापूर्वीच भाविकांनी तेथील मूर्ती तेव्हाच्या आदिलशाही प्रांतातील कवळे येथे स्थलांतरित केली होती. मूळ मंदिराच्या ठिकाणी 1966 साली थोर इतिहास संशोधक कै. पांडुरंग पिसुर्लेकर यांच्या प्रेरणेने स्मारक मंदिर उभे आहे. तेथेच हा अनौपचारिक सोहळा स्थानिक केळोशीवासीयांच्या उपस्थितीत साजरा झाला. कृष्णदास शामा यांचे नाव पणजीच्या मध्यवर्ती ग्रंथालयालाही देण्यात आले आहे.