73 विरोधी खासदारांचे राज्यसभेच्या सभापतींना पत्र
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी विरोधकांनी त्यांना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मांडला असून, या प्रस्तावात सुमारे 73 विरोधी खासदारांनी पक्षपाती वर्तन आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे गंभीर आरोप केले आहेत.
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांना पाठवलेल्या पत्रात खासदारांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि अन्य न्यायिक सदस्यांचा समावेश असावा, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत ज्ञानेश कुमार यांनी निवडणुकीशी संबंधित कामांपासून दूर राहावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
सदर पत्रात नमूद करण्यात आले आहे की, ज्ञानेश कुमारांच्या 15 मार्च 2026 नंतरच्या कृती आणि निष्क्रियता या गंभीर गैरवर्तनाचे उदाहरण आहेत. विरोधी पक्षांच्या मते, या घटनांमुळे निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासावर परिणाम झाला आहे.