Home Featured पाक लष्कर-‘बीएलए’मधील संघर्ष शिगेला

पाक लष्कर-‘बीएलए’मधील संघर्ष शिगेला

0

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा बंडाचा भडका उडाला आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) पुकारलेल्या ‘ऑपरेशन हेरोफ 2.0’ने पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणाच उघडी पडली आहे. बलुच बंडखोरांनी एकाच वेळी पाकिस्तानच्या अनेक शहरांवर हल्ले चढवले. पोलीस आणि लष्करी चौक्यांवर ताबा मिळवला. अनेक ठिकाणी तर पाक सैन्यावर पाठ दाखवण्याची वेळ आली. मजीद ब्रिगेड, फतेह स्क्वाड आणि स्टॉस या तीन युनिट्सनी एकत्रितपणे ही मोहीम पार पडली. खरे तर, ‘मजीद ब्रिगेड’ ही आत्मघाती हल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. या ब्रिगेडची या ऑपरेशनमध्ये सर्वात महत्त्वाची होती. महत्वाचे म्हणजे, यामध्ये महिला फिदाईनही मोठ्या प्रमाणावर आहेत. दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचाराला प्रत्युत्तर दिले असून, त्यात 145 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कर आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. शनिवारी पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये झालेल्या गोळीबारात आणि अनेक आत्मघाती बॉम्बस्फोटांत किमान 33 जणांचा मृत्यू झाला होता. बलुच बंडखोरांनी नागरिक, उच्च-सुरक्षा कारागृह, पोलीस स्थानक आणि निमलष्करी तळांना लक्ष्य केले. हवा बलोच आणि असिफा मेंगल या महिलांनी ग्वादर आणि नुश्की येथे आयएसआय आणि सीटीडीच्या ठिकाणांवर हल्ले केले. वाहनांना लावलेल्या बॉम्बच्या सहाय्याने हे हल्ले करण्यात आले. बलुचिस्तान प्रांतातील हल्ल्यानंतर पाकच्या सशस्त्र दलाने मोठी कारवाई केली आहे. आतापर्यंत या कारवाईत 190 हून अधिक लोक मारले गेले आहेत. मृतांमध्ये दहशतवादी, नागरिकांचा समावेश आहे.