मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा; तुयेतील सरकारी इस्पितळाचे लोकार्पण
हल्लीच गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी (गोमेकॉ) संलग्न केलेल्या तुये येथील सरकारी इस्पितळ आणि संशोधन केंद्राचे कालमुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तुये येथे मेडिकल कॉलेज व नर्सिंग कॉलेज उभारण्याची घोषणा केली.
या लोकार्पण सोहळ्यास आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, धारगळ जिल्हा पंचायत सदस्य श्रीकृष्ण हरमलकर, तुयेच्या सरपंच अमिता साळगावकर, आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
हे इस्पितळ पेडणे तालुक्यातील नागरिकांसाठी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज करण्यात आले आहे. सहा महिन्यांच्या आत येथे शस्त्रक्रिया विभाग (ओटी) सुरू करण्यात येईल. आजपासून सर्व प्रकारचे वॉर्ड आणि आवश्यक आरोग्य सेवा सुरू करण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. हे इस्पितळ संशोधन केंद्र म्हणूनही कार्य करणार असून विविध आजारांवर येथे संशोधन करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
तुये आरोग्य केंद्राशी जुना संबंध
2007-08 या काळात आपण तुये सामुदायिक आरोग्य केंद्रात डॉक्टर म्हणून सेवा दिली होती. त्या काळातील अनुभव आज या हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी आठवताना अभिमान वाटतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
भाजप सरकारचे योगदान
पेडणेकरांच्या आरोग्य सुविधेसाठी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या काळात या इस्पितळाची पायाभरणी झाली होती आणि नंतर माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या कार्यकाळात इमारत पूर्ण झाली आणि सध्याच्या भाजप सरकारने हे इस्पितळ कार्यान्वित केले, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आरोग्यमंत्री काय म्हणाले?
तुये येथील हे इस्पितळ म्हापसा जिल्हा रुग्णालयापेक्षाही मोठे आहे. येथे मेडिकल कॉलेज व नर्सिंग कॉलेज सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले.