पाकिस्तान स्पर्धेबाहेर

0
119

>> दक्षिण आफ्रिकेने १७ धावांनी नमविले

महिलांच्या टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेत काल रविवारी भारताचा शेजारी पाकिस्तानचे आव्हान गट फेरीतच संपुष्टात आले. दक्षिण आफ्रिकेने पाकचा १७ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले. प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेने ६ बाद १३६ धावा करत पाकिस्तानचा डाव ५ बाद ११९ धावांत रोखला. गडी हातात असूनही पाकला विजयी लक्ष्य गाठणे शक्य झाले नाही.
द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. त्यांची सुरुवात मात्र अडखळत झाली. पाकने लिझेल ली व डॅन निएकर्क यांना झटपट बाद करत त्यांची २ बाद १७ अशी स्थिती केली. मिग्नॉन डुप्रीझ (१७) व मरिझान काप (३१) यांनी संघाचा डाव सावरत अर्धशतक फलकावर लावले.

पण, दहा धावांच्या अंतराने ही दुकली परतल्याने द. आफ्रिकेची २ बाद ५४ वरून ४ बाद ६४ अशी घसरगुंडी उडाली. अनुभवी लॉरा वुल्वार्ड हिने एक टोक सांभाळताना ३६ चेंडूंत ८ चौकारांसह नाबाद ५३ धावा कुटत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. पाककडून डायना बेगने २ तर अमिन, अन्वर, शाह व दार यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तानच्या फलंदाजांना आवश्यक धावगती राखण्यास सुरुवातीपासून संघर्ष करावा लागला. मोठ्या संख्येने निर्धाव चेंडू खेळल्यासा फटका त्यांना बसला. त्यातच उमैमा सोहेल (०) व निदा दार (३) यांचे अपयश संघाला आगीतून फोफाट्यात नेणारे ठरले. आलिया रियाझ (नाबाद ३९) व इराम जावेद (नाबाद १७) यांनी पराभवाचे अंतर कमी करण्याचे काम केले. द. आफ्रिकेकडून निएकर्क, इस्माईल व एमलाबा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. पाकचे दोन फलंदाज धावबाद झाले.