हरमल पंचक्रोशी संघाला विजेतेपद

0
113

गोवा सरकारच्या क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाने आयोजित केलेल्या १४ वर्षांखालील पेडणे तालुका विद्यालयीन पातळीवरील क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद हरमल पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाने प्राप्त केले.हरमल पंचक्रोशी संघाने अंतिम सामन्यात व्हायकाउंट विद्यालय पेडणे संघावर ३२ धावांनी मात केली.

अंतिम सामन्यात पंचक्रोशी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली व १२५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना व्हायकाउंट विद्यालयाचा संघ सर्वबाद ९३ धावांपर्यंतच पोहोचू शकला. पंचक्रोशी संघाचा खेळाडू यतिश मोरजकर याने ५० धावा करत प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना दाद दिली नाही तर प्रणव इब्रामपूरकर याने ३ गडी बाद करून प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे मोडले. पंचक्रोशी संघाने या स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात सेंट जोसेफ विद्यालयाचा ३३ धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली होती. दुसर्‍या सामन्यात त्यांनी डॉन बॉस्को तुये संघावर थरारक लढतीत १० धावांनी निसटता विजय संपादन केला. त्यांची उपांत्य लढतही अटीतटीची झाली. उपांत्य सामन्यात त्यांनी पार्से विद्यालयाचा १० धावांनी पराभव करून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

या विजेतेपदासह हरमल पंचक्रोशी संघ जिल्हा पातळीवरील स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. विजेत्या संघात यतिश मोरजकर, देवेश तिळवे, उत्तम सोमजी, शिवम कांबळी, चिन्मय ठाकूर, मंथन टाककर, विनायक जोशी, मानस परब, प्रणव इब्रामपूरकर, नीरज कुडव, सोहम कोरगावकर, बाबू पोळजी, प्रणव मेथर, पुनीत कुडव, शुभम येंडे, गिरीधर तिळवे आदी खेळाडूंचा समावेश होता. सांघिक कामगिरीच्या जोरावर त्यांनी विजयश्री खेचून आणली. या विजयी संघाला विद्यालयाचे क्रीडा शिक्षक हेमंत नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.