Home Featured पाकिस्तानमध्ये आत्मघाती हल्ल्यात 16 जवान ठार

पाकिस्तानमध्ये आत्मघाती हल्ल्यात 16 जवान ठार

0

खैबर पख्तूनख्वामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात पाकिस्तानच्या बड्या अधिकाऱ्यांसह 16 जवान ठार झाले आहेत. शनिवारी रात्री उशिरा 100 हून अधिक दहशतवाद्यांनी अफगाणिस्तान सीमेजवळील बन्नू येथील पोलीस चौकीवर हल्ला केला. सुरुवातीला एका आत्मघातकी हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेली गाडी चौकीला धडकवली आणि त्यानंतर जोरदार गोळीबार केला. या दहशतवादी आत्मघाती स्फोटाने पाकिस्तान पुन्हा एकदा हादरला आहे.

बन्नू जिल्ह्यातील एका पोलीस चौकीला लक्ष्य करून हा आत्मघातकी हल्ला करण्यात आला. इत्तेहाद-उल-मुजाहिद्दीन पाकिस्तान या नवीन दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यात ड्रोन आणि स्फोटकांचा वापर करण्यात आला.

गाडीने धडक दिल्यानंतर भीषण स्फोट झाला व त्यात 16 जवानांचा मृत्यू झाला. यानंतर सशस्त्र दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी लहान ड्रोनचाही वापर केला. या स्फोटामुळे पोलीस चौकीची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.
या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जवान दबले जाऊन त्यांचा मृत्यू झाला तर काही जवानांचा गोळीबारात मृत्यू झाला.